खंड ५ - अध्याय ९
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
श्रीगणेशाय नमः । ब्रह्मदेव कथा पुढती सांगत । क्रोधासुर जाहला जेव्हां शांत । तेव्हां देवर्षि हर्षयुक्त । गणनायका पूजिती ॥१॥
विधानपूर्वक पूजा करून । लंबोदरासी नमिती विनम्र मन । पुनः पुन्हा करिती स्तवन । मान वाकवून भक्तीनें ॥२॥
जो सकलादि भूतप्रधान । पूर्ण अनंत श्रेष्ठ प्रसन्न । सर्वांतकर नित्य निज जात्मरूप पावन । लंबोदरा त्या आम्हीं नमितों ॥३॥
अचिन्त्य स्वयं बोधहीन । स्वसुखांत जो सदा निमग्न । बीजात्मक सांख्य अनंत पावन । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥४॥
अनंत वेद्य जो लाभत । विदेहयोगे जगतांत । जीव तैसा परेश असत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥५॥
परम आनंदमय देह विहीन । प्रकृतीचे जो लय स्थान । बोध स्वरूप तदात्महीन । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥६॥
सोहं स्वरूप भेद वर्जित । देहात्मयोग सकल अवभास युक्त । नित्य पुराण पुरुष जो गणेश असत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥७॥
बिंदुस्वरूप जो मन गम्य विलसत । पाद विहीनपरी चतुष्पाद असत । नाना आत्मभेद आश्रित एकदंत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥८॥
नादस्वरूप जो एकमेव गुणेश । सर्वत्र ज्याचे नयन विशेष । श्रवणें सर्वत्र ऐसा परेश । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥९॥
सर्वत्र ज्याची आननें कर । सर्वत्र पाद पद्य उदार । सुषुप्तित संस्थित आनंदकर । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१०॥
जो समभाव दाता द्वंद्व जाणत । द्विविध अवभास दाखवित । आद्य आनंदकंद तमांत विलसत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥११॥
सूक्ष्म स्वरूप जो अंतरीं निवसत । गणनायक सर्व ज्ञाता असत । विज्ञात कोशीं विहार करित । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१२॥
स्थूल स्वरूप सकल अभिमानी असत । श्रेष्ठ रजोयुक्त जो अनंत वर्तत । अन्नादि आत्मभोगात विहरत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१३॥
अध्यात्मरूप अंधकारातीत । द्रव्य प्रकाश परमार्थभूत । देहेन्द्रिय ज्ञानें जो ढुंढियुक्त । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१४॥
नित्य रजोदेह विकारी वर्तत । कर्मस्वरूप विविध इंद्रियांत । अप्रमेय जो अधिभूत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१५॥
ज्ञानस्वरूप सकल देवांत । सर्व इंद्रिय ज्ञानयुक्त । प्रभु जो महान् अधिदैवत । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१६॥
आकाशस्वरूप सकलावभास । नादप्रचुर सकलादि भूत सरस । भूतासंगें क्रीडाकरास । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१७॥
वायुस्वरूप जगताचा चालक । प्राणादिसंस्थ देहप्रचारक । दशनामयुक्त सकल आदि भूतपावक । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१८॥
तेजस्वरूप सकलावभास युक्त । द्वंद्व प्रचारीं जो स्थित जठरांत । संधि व्यापून विभाग करित । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥१९॥
जलस्वरूप रसयुक्त । पुष्टिप्रद षड्रस संयुक्त । नित्य स्नेहभाव प्रकाशवित । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२०॥
पृथ्वीस्वरूप सर्व अन्नमूल विलसत । धराधरेश विविध औषधींत । गजानन जो आकारयुक्त । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२१॥
विराट स्वरूपीं अनंत । सर्वत्र ज्याचे नेत्र असत । सहस्त्र शीर्ष सहस्त्र हस्त । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२२॥
सहस्त्र आनन चरणयुक्त । सृष्टिकर्ता जो रजोयुक्त । द्विजांचा जो आदिस्वरूप उदात्त । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२३॥
प्रपितामह जो जगताचा । समान भावे सर्वत्र ज्याचा । देवासुरांत निवास त्याचा । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२४॥
सत्त्वप्रचारी हरिरूपधर । तमोगुणसंगें झाला जो शंकर । जगदंबिका सूर्यादिरूपें अमर । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२५॥
ऐशा बहुविध भेदयुक्त । सर्वविहीन जो असत । शिवादि देवही स्तवनीं कुंठित । लंबोदरा त्या नमितों आम्हीं ॥२६॥
ब्रह्मदेव म्हणे ऐशी स्तुति । करून देवर्षि लंबोदरास नमिती । तेव्हां गजानन म्हणे तयांप्रती । सिद्धिदाता सुखकर्ता ॥२७॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र उत्तम । वाचका श्रोत्यांचे पुरवील काम । धर्म अर्थ काम मोक्षप्रद परम । साधन होईल सर्वकार्यी ॥२८॥
मारण उच्चाटनादि प्रभावहीन । होईल शत्रु कृत्यांचे निर्दालन । पुत्रपौत्रादिक लाभून । धनधान्य समृद्धी ॥२९॥
जो हें स्तोत्र वाचील । त्यास कलत्रादि सुखें मिळतील । कारागृहांतून मुक्ति लाभेल । अन्यही इच्छित प्राप्त होय ॥३०॥
एकवीस वेळा एकवीस दिन । स्तोत्राचें या आवर्तन । त्याचे मनोरथ पुरवीन । सर्वदा मीं निःसंशय ॥३१॥
देवांनो मुनींनो वरदान । मागा, झालों मीं प्रसन्न । दुर्लभ असले तरी करीन । पूर्ण मीं तें सत्वर ॥३२॥
ऐकून लंबोदराचें वचन । देवऋषि करिती नमन । आनंद मनीं दाटून । मुदित मनें ते म्हणती ॥३३॥
आनंदाश्रू नयनांत । तेव्हां त्यांच्या विलसत । लंबोदरास ते प्रार्थित । भक्ती दृढ करी गजानना ॥३४॥
क्रोध वर्जित भक्ती वाढावी । आपापल्या स्वकर्मात दृढ व्हावी । अधिकारपदे सांभाळावी । तुझ्या प्रसादें लंबोदरा ॥३५॥
क्रोधासुरास केलेस शांत । हाचि वर विश्वास उदात्त । भयमुक्त व्हावे जगतांत । सर्वप्राणी ऐसे करी ॥३६॥
याहून अन्य काय मागावें ? । तुज लंबोदरा कैसे स्तवावें । ऐसे बोलून नम्रभावें । नाचती सारे भावबळें ॥३७॥
लंबोदर तथास्तु म्हणत । अंतर्धान पावे क्षणार्धांत । तदनंतर देव द्विजादि रचित । शोभन मूर्ति गणेशाची ॥३८॥
सागराच्या पश्चिम तीरावर । मूर्ति स्थापिती अमरवर । चतुर्भुज जी मनोहर । पूजिती नंतर भक्तिभावें ॥३९॥
तेव्हांपासून प्रख्यात । लंबोदरक्षेत्र जगतांत । अंशरूपें अधिकार स्वपदीं निवसत । देवर्षि पूर्णभावें परी येथें ॥४०॥
विश्वामित्र वसिष्ठांप्रत । ब्रह्मदेवें कथिलें हें चरित । जेणें सर्व क्रोध शांत होत । लंबोदराच्या कृपेनें ॥४१॥
असत् ब्रह्ममय लंबोदर । स्वयंभू हा गणेश्वर । लीला दाखवी अपार । पर्वनातीत त्याचें रूप ॥४२॥
योगसेवेनें जो लाभत । संयोग अयोग रूप वर्तत । पूर्ण योगाचा महिमा दर्शवीत । संयोग अयोग उभयरूप ॥४३॥
त्याच्या उदरांतून संभवत । संयोग अयोगरूपें जगांत । म्हणोनि वेदज्ञ त्यास वर्णित । लंबोदर या नांवानें ॥४४॥
असित म्हणे ऐसें बोलून । ब्रह्मदेवें धरिलें मौन । वसिष्ठ त्यास प्रणास करून । गेला परतून स्वाश्रमीं ॥४५॥
विश्वामित्र बुद्धिमंत । निःश्वास सोडून स्वस्थळीं परतत । तेव्हां मी प्रेमें प्रार्थित । ब्रह्मदेवासी पुनरपि ॥४६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खण्डे गजाननचरिते लंबोदरदेवर्षिकृतस्तुतिवर्णनं नाम नवमोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP