खंड ७ - अध्याय १

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


अध्याय  १ ला

॥ गणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सूतासी । विकट चरित्र कथिलेंस आम्हांसी । हर्षित केलें मानसासी । ब्रह्मभूय प्रकाशाज्ञनें ॥१॥
जें जें कांहीं गणराजाचें चेष्टित । तें तें ब्रह्मसायुज्यप्रद निश्चित । व्यासशिष्या धन्य भाग्य वाटत । आम्हां समस्त मुनिजनांचें ॥२॥
कारण योगप्रदा तुझें दर्शन । साधुरूपा आम्हां होऊन । योगवृष्टिमयी गाथा ऐकून । तव मुखमेघांतून जी वर्षली ॥३॥
पिऊन सुधा न तृप्त । जैसा नर ना कधी होत । तैसें आमुचें चित्त । अद्यापि ना तृप्त झालें ॥४॥
आतां मम असुर विनाशपर । सांगावें विघ्नराजाचें चरित्र । जें निश्चित ब्रह्मप्राप्तिक्त । कृपा करून आम्हांसी ॥५॥
सूत म्हणे मुद्‍गलमुखांतून । पुण्यकथा विकटाची ऐकून । द्क्ष प्रजापति प्रमुदितमन । म्हणे धन्य जन्म कर्मादि माझें ॥६॥
ज्यायोगें तव समागम । जाहला अतीव मनोरम । योगदापूर्ण कथा अभिराम । सांगितलीस तूं मजला ॥७॥
आंतिरस कुळांत योगरूपधर । साक्षात्‍ तूं जन्मलास थोर । कुलतारक श्रेष्ठ मुनिवर । आतां विघ्नराज महिमा सांगा ॥८॥
विकटाचें माहात्म्य ऐकलें । परी माझें चित्त न धालें । मुद्‍गला पुनरपि पाहिजे कथिलें । गणेशाचें चरित्र मजला ॥९॥
कैसें ब्रह्म वर्तत । तें देहधारी कां होत । याचें कार्य काय असत । कुठें निवास गणेशब्रह्माचा ॥१०॥
तो विनायक या अवतारांत । विघ्नराजरूपें कोणास मानित । दैत्यवध कोठे करित । तें सर्व सांगा महात्म्या मजला ॥११॥
मुद्‍गल म्हणे हें ऐकून । योगिवंद्य होशील पावन । दक्षा गणेशकथा शोभन । ऐकतां प्रीति वाढली तुझी ॥१२॥
संक्षेपानें तुज सांगेन । विघ्नराजाचें चरित महान । ऐक तें श्रद्धाभाव ठेवून । कथा सर्व सिद्धप्रदायक ही ॥१३॥
येथ तुज इतिहास पुरातन । कश्यप दिती संवादरूप पावन । सांगेन तो ऐक प्रसन्न । अद्‍भुतरम्य हा वृत्तान्त ॥१४॥
दितीचें दोन सुत । हिरण्यकशिपु हिरण्याक्ष असत । हिरण्याक्षा वधी मायायुक्त । विष्णु देव प्राचीन काळीं ॥१५॥
तेव्हां अति शोकयुक्त । दिती कश्यपाकडे जात । त्याच्या सेवेत सदा निरत । भक्तिभावपरायणा ॥१६॥
ऐसा बहु काळ सेवा करित । कश्यप तेव्हां संटुष्ट होत । वर माग म्हणे भार्येप्रत । तेव्हां दिती त्यास म्हणे ॥१७॥
माझे दोन पुत्र वधिले । विष्णूनें इंद्रास्तव हें कृत्य केलें । म्हणून इंद्रास मारील ऐसें भलें । पुत्ररत्न दे कश्यपा मला ॥१८॥
तिचें तें ऐकून वचन । कश्यप शोकयुक्त मन । म्हणे साधुचरित्र स्त्रीही विश्वासार्ह न । कोणासीही कदापिही ॥१९॥
आतां काय करावें । धर्मपालका सुता इंद्रा कैसें वाचवावें । धर्मापालक जो स्वभावें । साधुगुणयुक्त स्वभावानें ॥२०॥
म्हणून विघ्नेश्वरासी स्मरून । प्रजापति तिजल बोले वचन । एक वर्ष करी व्रत प्रयत्नें करून । महादुष्टे यास्तव तू ॥२१॥
तेव्हां तुज जो होईल सुत । तो इंद्राचा वधकर्ता निश्चित । परी खण्ड पडूं न देई व्रतांत । विघ्न आलें तरीही ॥२२॥
ऐसें बोलून गणेशास ध्यात । तदनंतर तिच्या संगे रमत । वीर्य ओतून तिच्यांत । सुपुत्रद व्रत तें दिलें ॥२३॥
त्यास प्रणास करून । ती स्वगृहीं परतून । व्रत करी मनापासून । नियमपूर्वक प्रजापते ॥२४॥
हा वृत्तान्त इंद्रास ज्ञात । जाहला नारदमुखांतून त्वरित । तोही गणेशास मनीं ध्यात । निःश्वास सोडी भयानें ॥२५॥
तेव्हां त्याच्या हृदयांत । विघ्नराज जो सदा वसत । तो त्यास बुद्धी देत । इंद्र तेव्हां काय करी ॥२६॥
देवी मातेची करण्या सेवा उन्मन । इंद्र गेल उत्सुकमन । दितीस करी नित्य प्रसन्न । व्रतयुक्त जी होती ॥२७॥
प्रजानाथ छिद्रदर्शी तो भक्तियुक्त । प्रतापवंत इंद्र सेवारत । ऐसे नऊ महिने जात । तथापि छिद्र त्यास न मिळालें ॥२८॥
म्हणून सुरेश्वर झाला विव्हल । विघ्नराजास ध्याई निर्मल । सुराधिप तो चिंतेनें प्रबल । सेवी दितीस तन्मयत्वें ॥२९॥
एक वर्ष पूर्ण होण्यास । दहा दिवस कमी असतां विशेष । तो आतां काय होईल या भयास । चित्तीं बाळगून दुःखित झाला ॥३०॥
परी त्यानंतर अघटित घडत । विघ्नकर एक विघ्न आणित । दिती स्वयं होऊन मोहित । भ्रांत अत्यंत जाहली ॥३१॥
विचार करी आपुल्या मनांत । व्रतास संवत्सर पूर्ण होत । थोडेच दिवस न्यून असत । सिद्ध जाहली मम वांछा ॥३२॥
आतां इंद्राचें राज्य हिरावून । अखिल त्रैलोक्यीं सत्ता स्थापून । जो करील इच्छा पूर्ण । ऐसा सुत मज होईल ॥३३॥
मीं आतां कृतकृत्य होणार । यांत संशयास न थार । ऐशा विचारें निद्रापर । दिती झोपली त्याच ठायीं ॥३४॥
दोन जानूंमध्ये टेकित । मस्तक आपुलें ती त्वरित । दिवसा निद्रा येऊन भंगत । व्रत तेव्हां त्या सतीचें ॥३५॥
दोन गुघ्यांत होतें शिर । त्यांत दोन पडलीं छिद्रें । इंद्र तिज निद्रित पाहून मोदपर । गजाननाचें स्मरण करी ॥३६॥
वज्र हातांत घेऊन । मायेनें उदरीं तिच्या जाऊन । तेजःपुंज गर्भ पाहून । सात तुकडे करी वज्रानें ॥३७॥
देवनायक ऐसें वैर साधित । परी तो गर्भंना मरत । दितीचेम तेज उग्र असत । गर्भाचें रक्षण करी तैं ॥३८॥
तो गर्भ सप्तखंडांत । जरी भिन्न झाला तरी न मृत । तैसाच सप्त । खंडांत रडत । अत्यंत तेजस्वी गर्भ तेव्हां ॥३९॥
तें पाहून विस्मित चित्त । इंद्र विघ्नेश्वरा पुनः स्मरत । त्या एकेक खंडाचें करित । सात तुकडे वज्रधारेनें ॥४०॥
तथापि तो गर्भ पावन । न पावला मृत्यू तत्क्षण । देहधारी होऊन वचन । बोले रडत भयविव्हाल ॥४१॥
मघवंता इंद्रास गर्भ म्हणत । सुरेश्वरा कां मज मारण्या उठत । आम्ही भाऊ तुझे समस्त । यांत संशय मुळीं नसे ॥४२॥
त्यांचें तें वचन ऐकत । तेव्हां इंद्र तयांस म्हणत । वैरभाव सोडून व्हावें भविष्यांत । दिवौकसमुनें सर्वांनीं ॥४३॥
ते सारे तें मान्य करित । तेव्हां इंद्र बाहेर पडत । दितीची निद्रा भंग होत । दिवस निद्रेनें शोकमग्न ती ॥४४॥
त्याच अवधींत ती होत प्रसून । एकूणपन्नास सुतां जन्म देत । त्यांस पाहून ती इंद्रास म्हणत । इंद्रा बहु पुत्र कैसे झाले ॥४५॥
मी तर एकाचा संकल्प केला । परी हा काय प्रकार झाला । सत्य सांगे सुरेश्वरा मजला । जरी तुजला ज्ञात असे ॥४६॥
तेव्हां इंद्र सत्य सांगत । म्हणे मज होतें अवगत । तूं जें केलेंस व्रत । माझा नाश करण्यासाठीं ॥४७॥
तें जाणून तुझें ह्रद्‍गत । मीं हेतूनें आलों सेवेस्तव येथ । छिद्र पाहतां व्रताचरणांत । दिवानिद्रा तुज येतां ॥४८॥
मीं तत्क्षणीं तुझ्या जठरांत । मायेनें प्रवेश केला त्वरित । वज्रानें छेदिला सात खंडांत । गर्भ परी तो तैसाची ॥४९॥
नष्ट ना होत म्हणून । पुनरपि प्रत्येक खंड छेदून । केले एकूणपन्नास खंड लहान । नंतर बाहेर पडलों मी ॥५०॥
परी तुझ्या तपोबळानें जीवित । राहिले ते खंड समस्त । आतां प्राणयुक्त दिसत । ते सारे वायुरूप ॥५१॥
त्यास घेऊन समवेत । मधवा स्वर्गांत जात । ती त्यास शाप न देत । सत्य बोलला म्हणून ॥५२॥
त्या इंद्रावर संतुष्ट होत । परी दैत्यांस दीन पाहून येत । शोकपरायण अत्यंत । पुनरपि कश्यपासमीप ती ॥५३॥
त्यास प्रणास करी पतिव्रता । त्यास म्हणे अतिदुःखिता । विनयनम्र स्वार्थमोहयुता । स्वामी ऐका वृत्तांत ॥५४॥
दिती कश्यपांचा संवाद । पुढील अध्यायीं असे विशद । सातव्या खंडाचा प्रारंभ सुखद । या अध्यायें जाहलासे ॥५५॥
ओमितिश्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते दितिशोकवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP