खंड ७ - अध्याय ७
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप सांगे पुढील वृत्त । नारद ममासुरास भेटत । तेव्हां तो दैंत्य राजा पूजित । आदर सत्कार करी त्याचा ॥१॥
आगमन कारण विचारित । तैं नारद त्यास सांगत । आपद्धर्मविवेकें सांप्रत । आराधिला गणेश देव ॥२॥
तो वरद देवांस सिद्धिप्रद । तुझ्या वधार्थ सर्वद । प्रार्थिला देवें विशद । त्यानें दिलें वरदान तें ॥३॥
त्यानें पाठविलें तुजप्रत । सामोपचार करण्या सांप्रत । माझें वाक्य ऐक एकचित्त । तेणें हित होईल तुझें ॥४॥
विघ्नें सत्तात्मक असत । त्यांची सत्ता त्रिविध ख्यात । सत्य संकल्या रूपा वर्तत । पराधीना भाविका तशी ॥५॥
सत्यसंकल्प सत्तेचा धारक । जे असती बह्मवाचक । तें परमेश्वर स्वाधीन निःशंक । प्रभाव त्यांचा अगम्य ॥६॥
अन्य नरादी ख्यात । सत्तावंत तेही असत । ते दैवाधीन समस्त । दैवसत्ता त्यांवरती ॥७॥
तूं वर लाभूर समर्थ । स्वसत्तायुक्त नसत । वरसत्तात्मक दैत्य येथ । पराधीन निःसंशय ॥८॥
पराधीन जे असती नर त्यांस सर्वदा भय घोर । वृथा विघ्न गर्व वाहून फार । अंती होती सत्ताहीन ते ॥९॥
मीच ब्रह्म या मोहानें मोहित । जगदीश्वर मानिती श्रेष्ठ । आपणांस म्हणती विश्व वर्तत । माझ्याचि आधारें सर्वदा ॥१०॥
आमच्याहून श्रेष्ठ नसत । अन्य कोणीही विश्वांत । ऐसें म्हणती ते तेव्हां होत । सत्ताहीन तत्क्षणीं ॥११॥
सत्यसंकल्प जयांची सिद्धि । आकर्षण करी विघ्नप आधीं । म्हणून विघ्नयुत प्रसिद्धि । द्विविध जाण ममासुरा ॥१२॥
सत्यासत्यमय असत । द्वंद्वमायाविमोहित । ते सर्व विघ्नयुक्त वर्तत । दैत्यराजा निःसंशय ॥१३॥
ब्रह्म तें आनंद परम । समात्मक द्वंद्वहीन अभिराम । द्वंद्वांत द्वंद्वभावें मनोरम । परी तें मोहवर्जित ॥१४॥
तेंच विघ्नराजाख्य वर्णिती । ब्रह्म वेदांत आणि श्रुती । देवें आराधिले भावभक्ती । देहधारी म्हणोनि झाला ॥१५॥
आतां तो देवागारांत । प्रकटला असे देव अद्भुत । त्यास शर्ण जा त्वरित । अन्यथा मरण ओढवेल ॥१६॥
स्वधर्मयुत विश्व समस्त । दैत्यपा होवो हें त्वरित । तूही स्वधर्मनिरत । जाई आपुल्या स्वकीय स्थानीं ॥१७॥
स्वर्गभोगकर देव ख्यात । मनुष्य भूमिस्थित ज्ञात । दैत्य पाताळ लोकांत । सुखानें राहात सर्वदा ॥१८॥
वर्णाश्रमयुक्त जन । राहोत नित्य धर्म पाळून । ऐसें आचरण करून । ममासुरा भोग भोगी ॥१९॥
एवढयांत आकाशवाणी होत । दैत्येंद्रा गर्व धरू नको चित्तांत । नारदाच्या आज्ञावश वाग त्वरित । अन्यथा मरण ओढवेल ॥२०॥
विघ्नपति अन्यथा कुपित । तुज वधील निश्चित । त्यासी शरण जा अविलंबित । सर्वंसिद्धिप्रदायक जो ॥२१॥
ममासुर ती दिव्य वाणी ऐकत । अशरीरिण जी अद्भुत । तेव्हां अत्यंत खेदयुक्त । शुक्राचार्यांसी भेटला ॥२२॥
त्याच्याशी विचारविनिमय । करी तो ममासुर वाटून भय । शुक्रही सांगे हितावह होय । शरण जाणें विघ्नेशासी ॥२३॥
शुक्रही तैसेच सांगत । तेव्हा तो असुरेश भययुक्त । नारदास वंदून म्हणत । हितकारक ऐसें वचन ॥२४॥
ममासुर म्हणे नारदा सांप्रत । तूं जें मज कथिलें हित । तेंचि शुक्राचार्य सांगत । देवांसी जें हितकारक ॥२५॥
त्या गजाननासी मी सेविलें । अति उग्र तपें स्तविलें । महामुने मज सोडून केलें । देवांसी कां जवळ त्यानें ॥२६॥
म्हणोनि आता न जाईन । गजाननासी मी शरण । मानी जन स्वीकारिती मरण । शरण न कदापि शत्रूसी ॥२७॥
त्याचें तें ऐकून वचन । नारद बोले सामवचन । चिंता दैत्येंद्रा न करी उन्मन । हा देव नसे पक्षपाती ॥२८॥
जेव्हां देव मदोन्मत्त । पूर्वीं वधिती दैत्य संघ प्रमुदित । दैत्याचें मूळ नष्ट करण्या जात । पाताळांत ते ज्य वेळीं ॥२९॥
त्या वेळीं हा वरद होऊन । दैत्यांसी देई समर्थ्य महान । देवांसी मदविहीन । करी पराजित करूनिया ॥३०॥
तूं मोहांत पडलास । गणपतीस त्यागिलेंस । कर्मनाश करून सर्व देवांस । मारण्या उद्युक्त जाहलास ॥३१॥
कर्मनाश होतां देव विनष्ट । विश्व निर्देव होईल अत्यंत । म्हणून तुज मारण्या येत । विघ्नराज महा असुरा ॥३२॥
जें जें स्वधर्मानुसार । राहताती जगीं थोर । त्यांना ब्रह्मनायक न विघ्नकर । त्यांचे हनन न करी तो ॥३३॥
सुर तैसे असुर हयांच्यांत । सिद्धिबुद्धि म्हणोन विहार करित । सिद्धिबुद्धीवाचून जगांत । काय करशील तें साग ॥३४॥
विघ्नराजाचे विघ्न सहत । ऐसा कोण असे समर्थ । त्यास विघ्न करण्यास शक्त । मूर्खभावें तूं नित्य ॥३५॥
ऐसें करतां मरशील निश्चित । आनंद ब्रह्म वेदप्रोक्त । सदसन्मय न तत्त्वसंयुत । दैत्या तो असे सर्वातीत ॥३६॥
तो न तत्त्वसंयुक्त न तत्त्वहीन । सर्वत्र योगभावें राहून । सर्व द्वंद्वांचें करी धारण । केवळ क्रीडा करावया ॥३७॥
जेव्हा देवांदिक प्राणी गर्व करिती । स्वधर्म सोडून मोहांत फसती । जेव्हां जन स्वच्छंदें वागती । सर्वत्र पसरे अनाचार ॥३८॥
तेव्हां हा देव देह धरित । मदनाशक अवतरत । गणेशाचा देह असनमय असत । सन्मय त्याचें मस्तक ॥३९॥
म्हणोनि हा गजमस्तक । झाला त्यास शरण जा निःशंक । नारदाचें वचन ऐकून पावक । शुक्राचा उपदेश स्मरे ॥४०॥
आकाशवाणीही आठवित । तेव्हां मनांत निश्चय करित । गणेश हा ब्रह्मरूप वर्तत । स्वानंदांत निवास त्याचा ॥४१॥
त्यास शरण मी जाईन । त्यायोगें स्वहित साधीन । विघ्नराजाचा अनादार करून । कोण जगूं शकेल ॥४२॥
सिद्धिबुद्धिपती प्रभूस । अवमानून मदयुक्त खास । विघ्नविहीनता कैसी त्यास । ब्रह्मांडमंडळीं सर्वंत्र ॥४३॥
स्वयं समस्त दैत्यांप्रत । हितावह वचन सांगत । ममासुर प्रसन्नचित्त । गणेशावरी जडे ममता ॥४४॥
ममासुर म्हणे दैत्याप्रत । कालमुख्यादि वीर हो सांप्रत । प्रिय मित्रांनो वचन हितयुक्त । ऐका लक्ष देऊनियां ॥४५॥
हा हितोपदेश नारदानें । तैसाचि केला दैत्यगुरूनें । तेंच सांगितलें आकाशवाणीनें । तैसेंचि मी करी आतां ॥४६॥
त्याचें ऐकून वचन । धर्म अधर्म बोलती विनीतमन । "जगदीश्वरा देवपक्षपात्यास शरण । जाणें अयोग्य वाटतसे ॥४७॥
रणांत मरण स्वर्गप्रद । ऐसें सांगती शास्त्रज्ञ सुखद । म्हणून लढूंया विशद । विघ्नेशासवें विशेषें ॥४८॥
देहधारी गजानन । काय करील सांगा विघ्न । ताता मायामोहीं फसवून । बुद्धिभ्रंश हा देव करिती ॥४९॥
नारद असे गणराजभक्त । त्याचा उपदेश कैसा संमत । दैत्येंद्रासह महामते सांप्रत । करितां आपण सारे अहो ’ ॥५०॥
नारदाचें मन राखण्यास । काव्य शुक्राचार्य आपणास । तोच करिती उपदेश । आकाशवाणी ही देवमाया ॥५१॥
ती सर्व वृथा असत । भय न बाळगावें मनांत । गजानन नाना तत्वयुक्त । स्वप्रतापें वधूं त्यासी ॥५२॥
दैत्यप्रपालका तुझें बल । कैसें झालें आज निर्बल । ऐसें बोलून ते दोन वीर दोन वीर बाल । देवांस मारण्या निघाले ॥५३॥
रथावरी आरूढ होती । अत्य्म्त गर्व त्याच्या चित्तीं । डोळ्यांत क्रोधज्वाला पेटती । ममासुर त्यांस थांबावी ॥५४॥
नका जाऊं ऐसें सांगत । परी त्याचें वचन न ऐकत । ते दूर्मद धर्माधर्म जात । गणेशास मारण्यासी ॥५५॥
तदनंतर गणेश्वराप्रत । नारद विप्र तैं जात । त्यास सांगे समग्र वृत्तान्त । गणेशही संतापला ॥५६॥
देवांस भयभीत पाहत । गणनायक तेव्हां सांगत । भय बाळगूं नका मनांत । ममासुरास मारीन मीं ॥५७॥
अमोघ शस्त्रबळयुक्त । स्वयं ममासुर जरी येत । तरी त्यास मारीन निश्चित । हें जाणा माझें आश्वासन ॥५८॥
ऐसें बोलून गजानन । आपल्या करातलें कमळ सोडून । ब्रह्मरूपक महास्त्र जें भीषण । असुर संहार इच्छितसे ॥५९॥
तें कमळ एका क्षणांत । दैत्य सैन्यावरी पडत । त्याचा सुवास पसरत । पृथ्वी तळावर झणीं ॥६०॥
गणेशाचा जे द्वेष करित । त्यांस तो सुवास ठार करित । परी द्वेषहीन जे असत । त्यासी तो अद्भुत वाट ॥६१॥
त्या कमलाचा सुवास घेती । धर्म अधर्म रणीं पडती । त्यांच्यासम पंचप्रधान मृत होती । हाहारव घोर माजल ॥६२॥
दैत्य पाताळांत पळती । कमल क्रुद्ध तें द्रुतगती । ममासुराजवळी युद्धक्षेंत्रीं । जाऊन सुवास त्यास देई ॥६३॥
त्यायोगे ममासुर मूर्च्छित । जाहला तेथ रणांगणांत । परी प्रहरार्धानें जागृत । सावधान तो झाला ॥६४॥
त्यानंतर तो काय करित । हें वाचा पुढील अध्यायांत । सीताराम भक्तिभावें अनुवादित । गणेशसुत हें गोड माना ॥६५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते ममासुर गर्वहरणं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP