खंड ७ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्‍गल कथा पुढती सांगती । दिति गणनाथास स्मरे चित्तीं । तन्मय विश्व अवलोकिती । भक्तिभावें ती सर्वदा ॥१॥
एकदां माघ मासांत । शुक्लपक्षीं चतुर्थी असत । सूर्य माध्यान्हीं येतां पूजित । मूर्ति दिती गणेशाची ॥२॥
त्या मूर्तीतून प्रकटत । गणाधीश चतुर्भुजांनी युक्त । अनंत सूर्यासम तेज फाकत । प्रजापते तयाचें तैं ॥३॥
त्यास पाहून भयभीत । कश्यपास स्मरे ह्रदयांत । स्वगुरूस तैसें गणेशास ध्यान । भक्तिभावें ती सती ॥४॥
गुरूच्या स्मरणमात्रें धरित । सौम्यरूप गणेश त्वरित । बालरूपधारी तो म्हणत । दितीस मेघगंभीर स्वरें ॥५॥
वरदान । प्रभावें तुझा सुत । झालों मीं जे सांप्रत । भिऊं नको माते पहा पुढयांत । बाळरूप तुझ्यापुढें ॥६॥
दिती आपुलें नयन उघडित । तेव्हां पाही बालगणेश पुढयांत । चतुर्भुज बाळ शुंडादंडयुक्त । परशु आदि असे करी ॥७॥
चंद्रशेखर लंबोदर । शेषनाभियुत एकदंत । त्रिनेत्र । शूर्पकर्ण नाना भूशणधर । गळयांत चिंतामणि विलए ॥८॥
अमूल्य वस्त्रें देहावरी । पाहून त्यास नमन करी । कश्यपासाहित ती नारी । पूजन करी प्रेमभरानें ॥९॥
विघ्नेशासी अथर्वशीर्षें स्तवित । कश्यप त्यास तैं प्रार्थित । बाळरूपधारी सांप्रत । ज्यायोगें लालन पालन करी ॥१०॥
धन्य मीं कृतकृत्य जगांत । मत्सम अन्य कोणी नसत । तूं माझा पुत्र अद्‍भुत । गणनायका ब्रह्मप्ते ॥११॥
जाच्या रोमांचरांत । कोटीं कोटि ब्रह्मांडें वसत । तो तूं माझ झालास सुत । अशक्यप्राय हें वाटतसे ॥१२॥
ऐसी त्याची प्रार्थना ऐकून । दितीची ही विनंती मानून । चतुर्भुजधर बाल होऊन । तत्क्षणीं आनंदवी मातापित्यांसी ॥१३॥
त्या गणाधीशा प्रणाम करून । हर्षयुक्त स्वकर्म करून । दितिसहित मुदितमन । बोलवी अन्य ब्राह्मणांसी ॥१४॥
तदनंतर गणेश त्यांच्या हृदयांत । माया निर्मी एकदंत । तेव्हां पुत्र मानून तयाप्रत । स्नान घालून प्रेमभरें ॥१५॥
दिती स्तनपान देत । काश्यप जातकर्मादि संस्कार करित । अत्यंत हर्षयुक्त । बाराव्या दिवशीं बारसें करी ॥१६॥
ब्राह्मण नामकरण । विधिस्तव । जमले त्यांचा हर्षं अपूर्व । कश्यप त्यांसी आदरभाव । दावून सत्करा करीतसे ॥१७॥
ते म्हणती कश्यपाप्रत । हा बालक प्रभावयुक्त । स्वर्गांत देवांस स्थापील निश्चित । मनुष्यांसी पृथ्वीवरी ॥१८॥
असुर नाग कूर्मादीस पाताळांत । स्थापील हा सत्तायुक्त । तत्त्वांचा चालक बळवंत । याचें नांव चतुर्भुज ॥१९॥
विविध चार तत्त्वांचा स्थापक । हा थोर विभूतिमय पावक । होईल सर्वां सुखदायक । ऐसा वाटे विश्वास ॥२०॥
कश्यप सुत दोन वर्षांच होत । तेव्हां प्रल्हादमुख्य असुर पळत । विष्णुमुख्य देव त्यांस ताडित । पाताळांत गेले दैत्य सारे ॥२१॥
देवांचें भय त्यांच्या चित्तांत । विष्णूचा क्रोध चित्तांत । इंद्रादी देवांसहित । चक्रधारी तो प्रतापी ॥२२॥
दैत्यनाशार्थ प्रवेशत । पाताळांत तो महाबलवंत । आपुलें चक्र सोडून मारित । अनेक दैत्य रणांगणीं ॥२३॥
कांहीं असुर दुःखमग्न । गेले केशवासी शरण । कांहीं गेले अन्यत्र पळून । छिन्नदेह व्याकूळमती ॥२४॥
तथापि त्यांचा पाठलाग करित । तयांसी मारी क्रोधयुक्त । असुरांचा संहार समस्त । करण्या उद्यत जनार्दन ॥२५॥
दैत्येंद्र भयभीत होऊन । दितीस जाती तेव्हां शरण । त्यांसी छिन्न भिन्न पाहून । दिती शोक करी मनीं ॥२६॥
गणनायकही क्रोध संतप्त । आपला परशु सोडित । तीक्ष्ण तें शस्त्र धावत । देवांस मारण्या त्वेषानें ॥२७॥
त्या परशूच्या तेजानें व्याप्त । पाताळ मंडळ समस्त । विष्णूचें चक्रादिक शस्त्रें होत । निष्फल व्यर्थरूप तेव्हां ॥२८॥
देव दाहदग्ध होऊन । पळती दशदिशांत । उन्मन । तेव्हां ब्रह्मदेव जाऊन । केशवास वृत्त सांगें ॥२९॥
पाताळलोक सोडून देव समस्त । सर्व देव स्वर्गी परतत । परशूच्या तेजानें संतप्त । हाहारव ते करिती ॥३०॥
तेव्हां शंभू सूर्य जनार्दन । ब्रह्मादि देव मिळून । त्या परशूचें करिती स्तवन । भयभीत ते मुनिगणांसह ॥३१॥
त्या स्तुतीनें होत शांत । जेव्हां परशु तैं जात । देवेंद्रक सर्वे चतुर्भुजाप्रत । भयोद्विग्न नमिती तैं ॥३२॥
पूजन करून हात जोडिती । चतुर्भुजासी ते स्तविती । काश्यपासी चतुर्भुजासी वंदिती । ढुंढीदेवा अनादिसी ॥३३॥
गणेशासी विघ्नेशासी । परेशासी परेशपतीसी । परमात्म्यासी विनायकासी । विप्रवरदा तुला नमन ॥३४॥
लंबोदरासी महोदरासी । सर्वांच्या उदरस्थासी । ज्येष्ठासी ब्राह्मणासी । क्षत्रांच्या क्षत्रधर्मासी नमन ॥३५॥
वैश्यरूपासी वैश्यप्रपासी । शूद्रांच्या शूद्रधर्मासी । वर्णहीनासी गजाननासी । देवा तुजला नमन असो ॥३६॥
गृहस्थांच्या गृहस्थासी । ब्रह्मचार्‍यांच्या ब्रह्मचर्यासी । वनस्थांच्या वानप्रस्थधर्मासी । संन्यस्तांच्या धर्मधारका नमन ॥३७॥
न्यासधर्मासी आश्रमहीनासी । चारातीत पंचमासी । हेरंबासी स्वानंदवासीसी । सिद्धिबुद्धिवरा तुज नमन ॥३८॥
एकदंतासी देवासी । असुरासी अनाथनाथासी । सनाथांच्या नायकासी । ईश्वरांच्या महेश्वरा तुज नमन ॥३९॥
ब्रह्मासी विष्णूसी भानूसी । शक्तिप्रदासी महादेवासी । देवांसी स्वपदें दात्यासी । पुनः पुनः नमितों आम्हीं ॥४०॥
किती स्तुति करावी चालका सांप्रत । चार देवांचा स्वामी बलयुत । म्हणून तुजला विनम्र वंदित । चतुर्भुजा प्रसन्न हो ॥४१॥
ऐसें बोलून पुनरपि नमित । देव मुनिगणांच्या सहित । तेव्हां तो प्रसन्न होऊन म्हणत । भजनप्रिय स्वभक्तांसी ॥४२॥
महादेवहो मुनिजन समस्त । वर मागा मनेप्सित । मी स्तोत्र ऐकून संतुष्ट । देईन तुम्हां निर्भंय व्हा ॥४३॥
तुम्हीं रचिलेलेलें हें स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद पवित्र । पाठका श्रोत्यां भयनाशक सर्वत्र । पुत्रपौत्रादिकप्रद सर्वदा ॥४४॥
धनधान्यादिक लाभून । अंतीं माझा लोक पावन । प्राप्त होऊन आनंदमग्न । मुक्त होतील ते सारे ॥४५॥
ऐसें त्याचें ऐकून वचन । देव मुनिसत्तम भयहीन । हर्षभरें करितो नमन । प्रर्थिती तेव्हां चतुर्भुजासी ॥४६॥
जरी प्रसन्नभावें वर देसी । तरी दृढ भक्ति दे आम्हांसी । तुझ्या पादपद्‍मी आम्हांसी । निरंतर पद देई देवा ॥४७॥
आज्ञा करी महाभागा सांप्रत । दितिज दैत्यांनी संत्रसित । आम्हीं जाहलों समस्त । वाचवी आम्हां तूचि आतां ॥४८॥
तेव्हां चतुर्भुज सांगत । आजपासून दैत्यांप्रत । पाताळ लोकीं राज्य आनंदांत । करूं द्यावें देवांनो ॥४९॥
त्या महासुरांची हिंसा न करा । हें वचन । ध्यानीं धरा । मीच स्थापिलें त्यांस न मारा । स्वस्थान पाताळ तयांचें ॥५०॥
स्वर्गांत देवांचे स्थान । पृथ्वीवरी राहती मानव प्रसन्न । पाताळांत दानव । असुरजन । स्वधर्मपालन सारे ॥५१॥
जरी कोणी मार्गभ्रष्ट । गर्वें देईल अन्यास कष्ट । तरी त्यांस लाभेल इष्ट । सिद्धि न लाभेल कदापि ॥५२॥
आम्हीं तैसेंच करूं आचरण । ऐसें चतुर्भुजासी वचन देऊन । देव गेले स्वस्थानीं विनतमन । युद्ध संपविलें तयांनीं ॥५३॥
पाताळांतून देवसेना परत । आली शांत होऊन स्वर्गांत । दैत्येंद्र झाले प्रमुदित । देव त्यांसी न मारिती तेथ ॥५४॥
चतुर्भुज सर्व सैत्येंद्राप्रत । आज्ञा देई बळवंत । तेही त्याचें वचन ऐकत । मर्यादा पालनीं वचन देती ॥५५॥
हर्षभरित । स्वस्थळीं जात । चतुर्भुज तैं अंतर्धान पावत । कश्यप दिति समवेत । शोक करी विरहातुर ॥५६॥
तेव्हां आकाशवाणी होत । चतुर्भुज मातापितरा सांगत । स्थापन करा माझी मूर्ति पुनीत । भजा तीस नित्य आदरें ॥५७॥
त्या आज्ञेनुसार स्थापित । कश्यप दिति ब्राह्मणहस्तें त्वरित । चतुर्भुजाची मूर्ति भक्तियुक्त । सर्व सुखद पूजकांस ॥५८॥
हृदयांत चिंतामणीसी ध्याती । बाहेर चतुर्भुज मूर्ति पूजिती । ऐसें भक्तियुक्त घालविती । जीवन दिति कश्यप सदा ॥५९॥
आसूर भाव सोडून । भक्तिपूर्ण चित्तीं होऊन । गाणपत्य स्वभावें पूजन । दिति करी चतुर्भुजाचें ॥६०॥
ऐसें हें चतुर्भुजाचें चरित । सांगितलें तुज पुनीत । विघ्नराजाचा कलारूप ज्ञात । अवतार हा गाणेशपंथीं ॥६१॥
जो हें चरित वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास भुक्ति मुक्ति लाभेल । तैसीच दृढ भक्ति विघ्नेश्वराची ॥६२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरितें चतुर्भुजावतारविक्रमवर्णनं नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP