खंड ७ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । कश्यप कथा पुढची सांगत । मधुकैटभ दैत्य उन्मत्त । जाहले तेव्हां तप आचरित । विष्णु श्रद्धायुक्त मनानें ॥१॥
गणेशास तो आराधित । योगसेवेचें व्रत घेत । तेव्हां विघ्नेश प्रसन्न होत । वर देई जनार्दनासी ॥२॥
त्यायोगें नंतर करी हनन । त्या दोन असुरांचें जनार्दन । मधुकैटभ असुर परम दारूण । भय त्याचें नष्ट झालें ॥३॥
गणेशवरदानानें बलवंत । जनार्दन ऐसा यशोयुक्त । दिते तुझा सुत त्यास जिंकीत । हें कैसें शक्य होय ॥४॥
म्हणून स्वपुत्रासी ममता । त्यागून धरी समता । विघ्नेशासी भावें भजतां ॥ वंदनीय तूं होशील ॥५॥
जैसें गणराजानें रचिलें । देव असुर मानव-युक्त भलें । तैसेंच त्रिविध जग शोभलें । अद्यापिही हें समस्त ॥६॥
कश्यपाचें ऐकून वचन । हर्षयुक्त दिती बोले प्रसन्न । सुखप्राप्त्यर्थ उपाय शोभन । योगिवंद्या सांगा मजला ॥७॥
दिति म्हणे विघ्नराज चरित । पुनरपि सांगा मजप्रत । मुनिमुख्य तुम्हीं ज्ञानवंत । गणेशतत्त्व कोविद ॥८॥
कश्यप तेव्हां तिजला सांगत । धर्मघ्नाचा होता सुत । यज्ञध्रुक नाम असुर विख्यात । तो शैवी उपासना करी ॥९॥
पापनिश्चय तो करित । अति उग्र तप एकचित्त । पंचाक्षरविधानें तोषवित । शंकरासी बहुकाळ ॥१०॥
दिव्य वर्ष सहस्त्रें तप करित । शंकर तेव्हां संतुष्ट होत । वर देण्या तो प्रकटत । यज्ञध्रुक्‍ त्याची पूजा करी ॥११॥
शंकर प्रसन्नचित्त त्यास सांगत । वर माग जो मनेप्सित । तो मीं देईन तपतुष्ट । असुरा धन्य तूं भक्त माझा ॥१२॥
तेव्हां तो असुर पार्थित । जें जें असेल त्रिगुणें युक्त । त्यापासून मरण मजला जगांत । कधींही कुठेंही न यावें ॥१३॥
राज्य ब्रह्मांडाचें देई । आरोग्य सुख मजसी गेहीं । नित्य द्यावें ज्याची इच्छा होई । ते तें सफळ होवो देवा ॥१४॥
शंकर तथाऽस्तु म्हणून । त्वरित पावले अंतर्धान । तदनंतर स्वगृहीं परतून । दैत्यराज सुखावला ॥१५॥
तदनंतर सैन्य जमविलें । त्यानें विजयार्थ प्रयाण केलें । शंभुमुख्य देव पळाले । दशदिशांत त्या वेळीं ॥१६॥
भयभीत ते स्वलोक सोडित । तेथ तो दैत्यश्रेंष्ठांस स्थापित । यज्ञविनाशार्य झटत । सर्वयत्नें यज्ञध्रुक्‍ दैत्य ॥१७॥
यज्ञविध्वंसन करित । मुनींस ताडन करी क्रूरचित्त । तेव्हां यज्ञ सोडून पळत । भयभीत मुनिजन सारे ॥१८॥
वर्णसंकर सर्वत्र माजला । चराचरांत भ्रष्टाकार झाला । तेव्हां विष्णूच्या नाशार्थ त्या वेळीं । महाखल तो यत्न करी ॥१९॥
देवांचें मूळ करण्या नष्ट । दैत्य झटती घेऊन कष्ट । यज्ञ हाच विष्णु हें सांगत । वेदांत वेदवादी सदा ॥२०॥
यज्ञाचा नाश केला । तर विष्णू कोठें उरला । ऐसा विचार करून त्या वेळा । यज‘जभंजना असुर जाती ॥२१॥
त्रैलोक्य केलें यज्ञहीन । त्यायोगें विष्णु क्षुधापीडित होऊन । अस्थिचर्मं अवशेष दुःखमग्न । सर्वं देवांसहित तेव्हां ॥२२॥
गणनायकासी भावें स्मरत । म्हणे रक्षण करी तूं त्वरित । गणनाथा तूं कृपावंत । परम दारूण दैत्य झाले ॥२३॥
जरी न करसील रक्षण । अटळ असे आमुचें मरण । यज्ञनाश सर्वत्र होऊन । स्वाहाकार नष्ट झाला ॥२४॥
ऐसा मनीं विचार करिती । सर्व देव तप करिती । एकाक्षर विधानें तोषविती । विघ्नपासी भक्तीनें ॥२५॥
शंभर वर्षें ऐसीं जात । तप झालें श्रद्धायुक्त । गणनायक तुष्ट होत । वरद प्रसन्न विघ्नेश्वर ॥२६॥
देवांनी मागितला वर । माजला यज्ञधृक्‍ असुर । त्याचा नाश करा सपरिवार । वरदान तें देवें दिलें ॥२७॥
तदनंतर देवगणांसहित । यज्ञघ्नास मारण्या उद्युक्त । अत्यंत क्रोधयुक्त चित्त । तत्क्षणीं गेला विघ्नेश्वर ॥२८॥
महाघोर युद्ध करून । अंकुशाचा आघात भीषण । त्यायोगें यज्ञधृक्‍ असुरास मारून । मुक्तिनिर्वाण त्यास दिलें ॥२९॥
अन्य दैत पाताळांत । पळून गेले भययुक्त । तदनंतर मुनिगणांसमवेत । विष्णु स्तवी गणेशासी ॥३०॥
विघ्नराजासी विघ्नकर्त्यासी । महाविघ्नप्रशांतासी । देवदेवेशासी अनादीसी । परेशासी नमन असो ॥३१॥
सर्वप्रथम संस्तुतासी । सर्वांस वरदात्यासी । वरदासी विनायकासी । सर्वांच्या नायकासी नमन ॥३२॥
ढुंढिराजासी वेदादि ढुंढितासी । सर्वांस स्वसवें सुखदासी । परात्म्यासी आनंदासी । अप्रमेया ब्रह्मा तुज नमन ॥३३॥
गणांच्या पतीसी स्वानंदनाथासी । नाना गण सुरूपासी । सिद्धिबुद्धिपतीसी मुनीसी । ब्रह्मा विष्णु शिवरूपा नमन ॥३४॥
इंद्रादि देव कलांशासी । अससी क्षेत्ररूपा वंदितो तुजसी । क्षत्रवैश्यशूद्ररूपासी । पशुपक्ष्यादिरूपा नमन तुला ॥३५॥
वर्णाश्रम योजकासी । नागासी सुररूपासी सुररूपासी । राक्षसासी विहारीसी । चराचरमया नमन तुला ॥३६॥
शूर्पकर्णासी त्रिनेत्रासी । त्रिशूलधारकासी चक्रधरासी । पाशांकुशधर्त्यासी । हेरंबासी नमन असो ॥३७॥
परेशासी सर्वात्मकासी । सदैव बोधरूपासी । निरंजनासी अयोगासी । संयोगमया तुज नमन ॥३८॥
जनांस शांतिप्रदात्यासी । सर्व जगाच्या शरणधामासी । किती स्तवू गणाधीशा तुजसी । वेदही तेथें मौन धरित ॥३९॥
योगिजन होती विस्मित । तुझ्या वर्णनीं ते शांतिस्थ । शांतिरूपा तुज वंदित । संरक्षिलें तूं आज आम्हां ॥४०॥
स्वामी देवर्षी आम्ही समस्त । सर्वभावें तुज नमित । प्राणदाता तूं आम्हांप्रत । भक्ति दे तुझ्या पदांबुजाची ॥४१॥
गणाधीश तैसी दे अमल भक्ति । होऊ योगेशा बंधहीन जगतीं । ऐसें बोलून पुनरपि वंदिती । देव तैसे मुनिजन सारे ॥४२॥
त्यांची प्रार्थना मान्य करून । शूर्पकर्ण पावला अंतर्धान । त्याची मूर्ति तेथ स्थापून । पूजिती भक्तिभावें सर्वदा ॥४३॥
तदनंतर संतापयुक्त । ते जाती स्वस्थानाप्रत मुदित । आपापले आचारकर्म करित । चराचर सुव्यवस्थित झाले ॥४४॥
ऐशापरी विघ्नेशें हनन । केलें दैत्यांचें भीषण । असंख्य अवतार घेऊन । वर्णन त्यांचे शब्दातीत ॥४५॥
संक्षेपानें मी कथिले । यथामति मी कांहीं त्यांतले । भजन करी त्याचे सदैव भले । तेव्हां शांतिलाभ तुला ॥४६॥
ज्यापरी धूलियुक्त धान्य पाखडित । मानव तें सुपांत । तदनंतर भोजनादिकांत उपयुक्त । उत्तम धान्य तें होतसे ॥४७॥
तैसी त्या शूर्पकर्णाची उपासना । अत्यंत आवश्यक जनां । मायाविकारें युक्तांना । ब्रह्म नाहीं लाभणार ॥४८॥
शूर्पकर्णाचें गुण करिता श्रवण । ह्रदयस्थ मल त्यागून । नरास ब्रह्मलाभ महान । म्हणून शूर्पकर्ण नाम ख्यात ॥४९॥
सुपासम ह्रदय शुद्ध करित । मायेचा भुसा बाहेर टाकित । ऐसा हा ब्रह्मप्रद देव विख्यात । वेदांत असे वर्णिला ॥५०॥
त्याचें भजन करी विधानानुसार । तरी दिति तूं शांतियुक्त थोर । होशील यांत न संशय तिळमात्र । विघ्नेश्वर पूजन सर्वार्थप्रद ॥५१॥
शूर्पकर्णाचें हें चरित । यज्ञघ्नवधार्थ देव अवतरत । हें ऐकतां वा वाचतां लाभत । मानसेप्सित सारें सर्वदा ॥५२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते शूर्पकर्णावतारवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP