खंड ७ - अध्याय १०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ दिती म्हणे कश्यपाप्रत । ऐकलें विघ्नराजाचें चरित । पूर्ण सिद्धिप्रद समस्त । परी तृप्त न झालें मुनीश्वर ॥१॥
अहो विघ्नपति साक्षात । ब्रह्मभूत निःसंशय असत । तुझ्या वचनानुसार ज्ञात । विशेषें सांप्रत मजलागीं ॥२॥
विघ्नेशाचे अवतार मजप्रत । मुख जे ते सांगून पुनीत । तारी या भवार्णवांत । महायोगी हें ऐकून ॥३॥
कश्यप हर्षभरित तैं आलिंगित । प्रियेसी तदनंतर म्हणत । वचन जें हितयुक्त । तें मुद्‍गल सांगती दक्षासी ॥४॥
धन्य धन्य तूं दक्षपुत्रि भक्तियुक्त । ऐक विघ्नेश्वर चरित । तुझ्या मनीं रति संभवत । सार्थक होईल तव जीवाचें ॥५॥
विघ्नेशानें जग समस्त । महादेवि असन्मय सृजिलें अद्‍भुत । सद्रुप तें मायाद्वयांत । बिंबित करून प्रभु राही ॥६॥
त्याचें करून मिलन । द्विविध करून सर्जन । स्वतः परत । उत्थान । नंतर सोऽहं बिंदुक ॥७॥
चतुर्विध जगत त्यापासून । सृजिलें विशेषयुक्त पावन । स्थूल सूक्ष्म समात्माख्य शोभन । एक अनेकादि संयुत ॥८॥
ऐसें नानाविध ब्रह्म पावन । नानाविध विश्वही असून । आनंदानें परी विहीन । व्यापारवर्जित जाहलें ॥९॥
आपापलीं कार्यें न करिती । मोहयुक्त सर्व असती । तीं सर्व तत्त्वें खेदयुक्त होतीं । तप घोर करिती तदा ॥१०॥
एकाक्षरविधानें ध्यान करिती । विघ्नेश्वरातें पूजिती । ऐसीं दिव्य वर्ष सहस्त्रें जातीं । तपश्चर्या अविर्त चाले ॥११॥
तेव्हां विघ्ननायक प्रसन्न । होऊन प्रकटे ह्रदयीं पावन । नरकुंजरयुक्त रुपाचें दर्शन । तेव्हां घडवी ब्रह्मांसी ॥१२॥
प्रमुदित तीं ब्रह्में नमिती । विघ्नेशकृपेस पात्र होतीं । त्याच्या रुपज्ञानें लाभती । बोध अमल तेणें तुष्ट ॥१३॥
नंतर विष्णुरूपें वरद होत । विघ्नेश प्रकटून त्यांस म्हणत । वर मागा जो इच्छित । पुरवीन मीं निश्चयेंसी ॥१४॥
ब्रह्में त्यास पाहून विस्मित । गणेशज्ञान त्यास होत । बिंबात्मक प्रतापवंत । सर्वत्र हा विघ्नेश असे ॥१५॥
गजवक्त्रादि चिन्हयुक्त । स्वमहिम्यांत हा स्थित । हर्षयुक्त ब्रह्में भक्तियुक्त । नमून पूजिसी महाविष्णुसी ॥१६॥
ब्रह्में विष्णुरूप गणेशास स्तविती । मनोभावें स्तुती करिती । विघ्नेशासी गरुडध्वजासी । चतुर्भुजासी नमन असो ॥१७॥
सर्वांच्या पतोती चक्रपाणीसी । रमेशासी परात्परासी । हेरंबासी वैकुंठनाथासी । स्वानंदवासीसी नमन असो ॥१८॥
गजाननासी ढुंढीसी । अपारासी महेशानसुतासी । काश्यपासी शेषपुत्रासी । भक्तवत्सला नमन असो ॥१९॥
दैत्य दानव नाशकासी । शाड्‍र्गधरा गदाधरासी । देवासी वासुदेवासी । धर्मस्थापकासी नमन असो ॥२०॥
सदसन्मय रूपासी । आनंददिधारकासी । समासी सर्व भावांत शाश्वतासई । वागातीतरूपास नमन असो ॥२१॥
देहदेहि प्रचारकासी । बोधासी विदेहासी । विष्णूसी परेशानासी । नमन असो पुनः पुन्हा ॥२२॥
जेथ वेद झाले कुंठित । योगिजन मौन धरित । त्या तुज काय स्तवूं सांप्रत । महाभागा प्रसन्न हो ॥२३॥
ऐसें स्तवन करून । जनार्दनासी करितों वंदन । त्यांस उठवून म्हणे वचन । विष्णु तेव्हां हर्षानें ॥२४॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र पावन । भुक्तिमुक्तिप्रद शोभन । मुक्तिप्रद पाठका वाचका प्रसन्न । ब्रह्मदायक सर्वदा ॥२५॥
ब्रह्मांनी जें जें इच्छित । असेल तें मागा सांप्रत । देईन मीं तपतुष्ट । स्तोत्र प्रिय हें मजला ॥२६॥
ब्रह्में प्रार्थिती नाथा आम्हांप्रत । देई आनंदमय आणिक पुनीत । सौख्य जें स्वाभाविक श्रेष्ठ । सामर्थ्य आमुच्या कार्यांत ॥२७॥
सत्यसंकल्प संभव बळ देऊन । दृढ भक्ति तव पदीं निर्मून । योगशांतिभव पावन । ब्रह्मभूयप्रद सौख्य देई ॥२८॥
विष्णू म्हणे देईन प्रार्थित । ब्रह्मांनो सारें तुम्हांप्रत । सफळ कार्य करा सतत । आपापलें अति उत्तम ॥२९॥
ब्रह्मप्रद योग शांतिवर्णन । करीन तें करा श्रवण । भक्तियुक्त योगसेवनें शोभन । ब्रह्मांनो तुम्हीं सांप्रत ॥३०॥
पंचचित्तमयी बुद्धि असत । भ्रांतिकरी परम जगांत । सिद्धि जाणा सर्वत्र सतत । त्यांचा स्वामी गजानन ॥३१॥
संप्रज्ञातमय देह वर्तत । संप्रज्ञात्मात्मक शिरयुक्त । गजरूप त्यांच्या योगें घेत । देहधारी गजानन ॥३२॥
संयोगाख्य गकार । योगग तो णकार । त्यांच्या योगें गजवक्त्र । नामें ख्यात जाहला ॥३३॥
स्वसंवेद्य योगें होत । त्या गणेशाचें दर्शन पुनीत । त्यायोगें हा स्वानंदवासी स्मृत । रहस्य आणखी सांगतों ॥३४॥
असत्‍ रूप शक्ति ज्ञात । सद्रूप भानु ख्यात । मीं विष्णु समरूप जगांत । नेति भावें शंकर असे ॥३५॥
या चार ब्रह्मयाच्या संयोगें ख्यात । स्वानंद नामें बुध जाणत । स्वानंद मायेनें युक्त । ब्रह्मांच्या संयोगें होई ॥३६॥
अयोग ब्रह्मांचें मायाविहीनत्व । संयोग अयोग मिश्रत्व । शांतिरूपधर गणेश तत्त्व । त्यास भजा विशेषानें ॥३७॥
ह्रदयांत चित्तप्रचालक । तेणें ब्रह्मभूतत्व पावक । पावाल ब्रह्मांनो निःशंक । भक्तिकारणें हा योग कथिला ॥३८॥
जें जें जगताच्या रचनादिक । तत्त्वें करती क्रियात्मक । तें गणेशास समर्पून साधक । करा आपुल्या सर्व क्रिया ॥३९॥
ऐसें बोलून महाविष्णु होत । अंतर्धान क्षणांत ब्रह्में त्यास नमस्कार करित । स्वस्वकार्यीं रत झालीं ॥४०॥
क्रमशः ब्रह्मभूत होत । तीं ब्रह्में गणेशयोगें युक्त । हें दक्षनंदिनी आनंदयुक्त । क्रीडती सर्व चराचरांत तीं ॥४१॥
परस्परांसी क्रीडा करिती । जगासी आनंद देती । ऐसें हें वर्णिलें तुजप्रती । विष्णुरूप विघ्नराजाचें चरित ॥४२॥
देवि दिति हें परम शोभन । वाचील वा ऐकेल एकमन । तो नर स्वानंद लाभून । भुवितमुक्ति सर्वही लाभेल ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते विष्ण्ववतारवर्णनं नाम दशमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पनमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP