खंड ७ - अध्याय ८
मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥ कश्यप कथा पुढती सांगत । ममासुर जेव्हा सावध होत । समीप कमळ पाहून भयभीत । गर्वहरण त्याचें झालें ॥१॥
तो त्या कमळा करी वंदन । करपुट भीतीनें जोडून । स्तोत्र म्हणे भावयुक्त मन । ममासुर कमळास स्तवी ॥२॥
कमळा तुजसी माझें नमन । गणेशशस्त्रांत प्रमुख मान । तुजला असे शोभन । वासनांच्या परेशा वंदन तुला ॥३॥
सुवासधारकासी अभिवादन । विषयांत सुवास निर्मून । मोहविसी प्राणी संसारांत गुंफन । सुखदुःखयुक्त ते होती ॥४॥
जे योगवासनेनें युक्त । ते होती ब्रह्मभूत । वासनांचा भेद बहुविध असत । किती त्यांतले वर्णावे ॥५॥
त्यातल्या ब्रह्मस्वरूपासी । खेळकरा नमितों तुजसी । विश्व कमलसंभूत त्यासी । पद्याकार वर्णिती जन ॥६॥
शस्त्रोत्तमा तुझें वर्णन । करील पूर्णत्वें कोण । नमन करितों हो प्रसन्न । रक्ष मजला भयांतून ॥७॥
दैत्येश ऐसी स्तुति गात । तैं तें कमळ शांत होत । गणराजाच्या हातांत । परतलें तें प्रसन्नपणें ॥८॥
ममासुर प्रसन्नात्मा जात । शुक्रासहित विघ्नराजाप्रत । त्यास भक्तिभावें वंदित । पूजा करी तयाची ॥९॥
पुनरपि हात जोडून । स्तुती करी संतुष्टमन । ब्रह्मनायकाचें स्वरूप जाणून । ममासुर त्या समयीं ॥१०॥
विघ्नेशासी अनादीसी । सर्वसत्ता प्रचालकासी । परेशासी ब्रह्मेशासी । गणेशासी नमो नमः ॥११॥
गणांच्या चालकासी आनंदासी । सदा आनंददायकासी । हेरंबासी एकदंतासी । शूर्पकर्णासी नमन असो ॥१२॥
ढुंढीसी लंबोदरासी । भक्तपालकासी स्वानंदपतीसी । योगाकारस्वरूपासी । शांतिस्था तुज नमन । असो ॥१३॥
शांतींना शांतिदासी । ज्येष्ठराजासी पूज्यासी । सर्वांच्या सर्वनायकासी । विनायका तुज नमन असो ॥१४॥
देवदैत्यांस पालकासी । आदिपूज्यासी अव्ययासी । अन्तीं अवशिष्ट तूंच राहसी । सिद्धिबुद्धिपते नमन तुला ॥१५॥
चतुर्भुजासी नागेशध्वजसी । शेषावरी संस्थितासी । गजाननासी देवेशासी । दैत्येशरूपा तुज नमन ॥१६॥
भक्तांचीं विघ्नें हरण करिसी । अभक्तांसी विघ्नांनी ताडिसी । योग्यांच्या हृदयस्थ समभावासी । नानाभेदमया तुज नमन ॥१७॥
ब्रह्म असदृप वेदवादोक्त । भेदहीन सद्रूप ख्यात । त्यांच्या साम्यें तूं विलसत । सम स्वानंदसंस्थित ॥१८॥
त्या प्रभूस कोण सत्यार्थे जाणत । धन्य मीं एक जगतांत । जेणें गजानन पाहिला पुढयांत । प्रत्यक्ष महद्भाग्यानें ॥१९॥
गणेशा किती करूं स्तवन । वेदादीही जेथ धरिती मौन । योगिजन शांति लाभून । रममाण होतात स्वानंदीं ॥२०॥
ऐसी स्तुति करून । ममासुर करी नर्तन । रोमांचित शरीर अश्रुपूर्ण नयन । सौभाग्यशाली तो होत ॥२१॥
महाभक्तियुक्त तयाप्रत । विघ्नप्रनायक सांगत । महाबाहो वर माग इच्छित । देईन स्तोत्रें तुष्ट मीं ॥२२॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र उत्तम । नाना कामपूरक अभिराम । निष्कामांस महामोक्ष शोभन । मिळेल याच्या वाचनानें ॥२३॥
माझी भक्ति दृढ होईल । ह्रदयांत भाव ठसेल । ऐसें हें स्तोत्र विमल । ममासुरा जाण विश्चयें ॥२४॥
विघ्नेशाचें ऐकून वचन । ममासुर करी वंदन । भक्तिसंयुक्त हात जोडून । प्रार्थी देवा गजाननासी ॥२५॥
जरी प्रसन्न होऊन । वर देण्यास आला आनंदून । तरी स्थिर भक्ति देऊन । मायेचा नाश करावा ॥२६॥
गाणपत्यांचा सहवास । देई नाथा निरंतर भक्तांस । माझें स्थान भक्ष्यादिक सुरस । सांग ढुंढे मजला तूं ॥२७॥
मी गणाधीशा तुझा असत । अन्य वर मी न वांछित । तुझ्या दर्शनमात्रें ह्रदयांत । ज्ञानोदय जाहलासे ॥२८॥
विघ्नेश तेव्हां वर वेत । माझी दृढ भक्ति तुझ्या मनांत । सदैव नांदेल ममासुरा निश्चित । तूं होशील गाणपत्यप्रिय ॥२९॥
स्वस्थानीं निर्भय होऊन । मत्परायण राहून । जे कोणी स्वधर्मविहीन जन । कर्म त्यांचें भक्षण करी ॥३०॥
जेथ प्रथम न करिती माझें पूजन । अथवा माझें पुण्य स्मरण । ऐशा जनां मोहवून । राज्य करी त्यांच्या ह्रदयांत ॥३१॥
परी मज भक्तांसी दासत्वें रक्षण । करी तूं स्नेहभावपूर्ण । माझ्या भक्तिभावें विहीन । त्यांस ममताबद्ध करी ॥३२॥
ऐसें विघ्नेश्वराचें वचन । ऐकून आज्ञा उत्तम प्रसन्न । आनंदला ममासुर विनीतमन । म्हणे तव आज्ञा पाळीन ॥३३॥
त्यास प्रणास करून । मम असुर गेला परतून । आपुल्या स्थानीं राहून । शांति मानसीं धारण करी ॥३४॥
सर्वदा गणेशाच्या भजनांत । जाहला सर्वभावें रत । दैत्येश त्याचा संग सोडित । भयभीत सारे होऊनी ॥३५॥
ते सर्वही पाताळ विवरांत । पुनरपि तेव्हां प्रवेशत । त्यांचा वियोग होतां हर्षभरित । ममासुर जाहला ॥३६॥
ऐशापरी ममासुरास शांत । विघ्ननायक करी प्रेमयुक्त । स्वाधीन करोनि स्वस्थानीं स्थापित । दितिप्रिये त्या समयीं ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे सप्तमे खंडे विघ्नराजचरिते ममासुरशांतिवर्णनं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP