श्रीदत्तात्रेयाचीं पदे - संग्रह २
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.
११. दत्त सबाह्य अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥
दत्तात्रय माझें मन । हरोनि नेलें मीतूंपण ॥२॥
मुळीं सिंहाद्रीपर्वतीं । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥
भक्तांमनीं केला वास । एकाजनार्दनीं विश्वास ॥४॥
१२. नाम निजभावें समर्थ । जेथें नाम तेथें दत्ता ॥१॥
वाचें म्हणतां देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥
दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाला ॥३॥
दत्तनामाचा निजछंद । नामीं प्रगटे परमानंद ॥४॥
एकाजनार्दनीं दत्त । सबाह्य स्वानंदें भरीत ॥५॥
१३. नाम मंगळ मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥
दत्त जीवीचें जीवन । दत्त करणां कारण ॥२॥
अनसूयात्मजा पाहीं । देहभाव उरला नाहीं ॥३॥
एकाजनार्दर्नी दर्शन । चित्त झालें समाधान ॥४॥
१४. नंदन जो अनसूयेचा । तो तूं कैवारी आमुचा ॥१॥
आमुचा तूं म्हणो जरी । भेट कां न देसी हरि ॥२॥
हरी माझी अंतर्व्यथा । पद दावी तुझे नाथा ॥३॥
नाथा आलों काकुळती । कळकळसी न का चित्तीं ॥४॥
का चित्तीं न ये दया । वासुदेवाची गुरुराया ॥५॥
१५. दत्ता कार्तवीर्य अर्जुन ये वेळां । आला कीं यदूला पाहिला कीं ॥१॥
कीं अलर्कभक्त कीं ये नित्ययुक्त । प्रल्हाद जो मुक्त सक्त पदीं ॥२॥
पदीं पायुराजा पडे की बा तुझा । विष्णुदत्त द्विजा भेटसी कीं ॥३॥
किंवा भार्गवराम पातला सुधाम । सोमकांत नाम राजा ये कीं ॥४॥
कीं अवघा पुसे कोठें जातां असें । दु:शकुन ऐसें मानसी कीं ॥५॥
की दुर्दैव माझें आड पुढें आलें । म्हणोनी न केले आगमन ॥६॥
पुरे हा संशय न होय निश्चय । वासुदेव पाय चिंती तुझे ॥७॥
१६. दत्ता धोपेश्वरीं करिसी की अंगीं । भस्मलेप वेगीं कां न येसी ॥१॥
न येसी भिक्षेसी गुंतूनियां दत्ता । कोल्हापुरीं आतां ताता कीं तूं ॥२॥
कीं तू पंढरीसी सुगंधी हुंगसी । पांचाळीं भुक्तीसी बससी कीं ॥३॥
बससी पश्चिमसागरीं निकाम । वासुदेवें नाम घेता दत्ता ॥४॥
१७. धरीं अवतार विश्व तारावया । अत्रीची अनसूया गरोदरा ॥१॥
ऋतु काळ हेमंत नक्षत्र रोहिणीं । शुक्ल पक्ष दिनीं पूर्ण तिथी ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव काळ ॥३॥
एकाजनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥
१८. दत्त वसे औदुंबरीं । त्रिशूल डमरू जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरीं नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूति ॥३॥
काखेमाजीं शोभे झोळी । अर्ध चंद्र वसे भाळीं ॥४॥
एकाजनार्दनीं दत्त । रात्रंदिन आठवित ॥५॥
१९. दत्त माझा दीनानाथ । भक्त लागीं उभा सतत ॥१॥
त्रिशूल घेऊनियां करीं । उभा असे भक्तद्वारीं ॥२॥
भाळीं चर्चिली विभूति । रुद्राक्षाची माळ कंठीं ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानूं ॥४॥
एकाजनार्दर्नी दत्त । रूप रहिलें ह्रदयांत ॥५॥
२०. हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागों माझें मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभूति । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 27, 2013
TOP