२१. दत्त माझा पिता दत्त माझी माता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारूं । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझें मन दत्त माझे जन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एकाजनार्दनीं दत्त हा विसावा । न विचारीत गांवा जावें त्याच्या ॥४॥
२२. ऐसी जगाची माउली । दत्तनामें यापुनी ठेली ॥१॥
जावें जिकडे तिकडे दत्त । ऐसी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वांठायीं ॥३॥
घाट आघात निवारी । भक्ता वाहे धरीं करीं ॥४॥
ऐशी कृपाळू माऊली । एकाजनार्दनीं देखियली ॥५॥
२३. आमुचें कुळीचें दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
हेंचि आमुचे व्रततप । मुखीं दत्तनाम जप ॥३॥
तयावीण हे सुटिका । नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥
एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥
२४. काय तरि बाई । अनसूये । तुझी चतुराई ॥धृ०॥
ब्रह्मा, विष्णु, शिव-शंकर । ज्यांचे सर्व देव सर्व किंकर । जाहलीं आई, तुझीं लेंकरं । उपकारा हीं ॥ अनसूये ॥१॥
त्रिभुवनीं पतिव्रता मिरविती । लक्ष्मी, सावित्री, पार्वती । करिती येऊनिया पर्वतीं । पदर-पसराई ॥ अनसूये ॥२॥
तुझ्यापुढे तिन्ही देव राबती । तिघेहि आज्ञेमधें वागती । तिघीजणी पति-दान मागती । देवदाराही अनसूये ॥३॥
दिधले जिचे तिचे तिला भर्तार । झाला दत्तात्रय अवतार । कृपाघन, जगद्गुरु, दातार तुझ्या या पायीं अनसूये ॥४॥
तीर्थे, देव, ऋषी, मालिका । ऋद्धि, सिद्धि, महालालिका । राहिली तुझ्या निकट रेणुका । एकवीरा ही । अनसूये ॥५॥
विष्णुदास म्हणे संकट निवारीं । धरिले पाय बळकट । दिनरजनीं माझी कटकट । नको दारा ही । अनसूये ॥६॥
२५. दयाळा, आलक, दत्ता, अवधूता । डमरू-कमंडलु-दंडपाणी, दिगंबरा, अमरा, श्रीधरा । शंकरा, जगत्प्राणनिर्माणकर्ता ॥ आलक द्त्ता० ॥धृ०॥
ब्रह्मा, विष्णु, शंकर, गुरुवर्या, आर्या, पवित्रा, विचित्रचरित्रा । पंकजनेत्रा, कोमलगात्रा अत्रि-मुनीअनसुयासुपुत्रा । मुगुट, कुंडल, माधवेंद्रा, त्रिपुंड्रगंधा, भालचंद्रा । रुंडब्रह्मांड-खंडमाळाअलंकृता, योगमुक्ता । आलक दत्ता० ॥१॥
दाता त्राता, तूं जनिता, निर्दोषा, त्रिशीर्षा । पुरुषावेषा, सुरेशा, अमलाभंगा, कलिमलभंगा । ब्रह्मप्रकाशितलिंगा, नि:संगा, नमो सद्गुरु नारायणा । नमो भक्तपरायणा ! नमो विष्णुदासनाथा, ! सुशोभित निगमपंथा ! आलक दत्ता, अवधूता । दयाळा ॥२॥
२६. तूं तो समर्थ दत्त दाता । नाम सोडिलें कां आतां ॥१॥
जगन्माते. लेंकुरवाळे । काय निघालें दिवाळें ॥२॥
कृपासिंधु झाला रिता । कोण्य़ा अगस्तीकरितां ॥३॥
सुकीर्तीची सांठवण । काय नाहीं आठवण ॥४॥
भागीरथी कां वाटली । कामधेनु कां आटली ॥५॥
चंद्र थंडीनें पोळला । कल्पवृक्ष कां वाळला ॥६॥
विष्णुदास म्हणे कनका । ढंग लाऊं नका नका ॥७॥
२७. गुरु, दत्तात्रय, अवधुता । ऐक अनसूयेच्या सुता ॥१॥
वाचें म्हणतों दत्तात्रय । भोगितों मी तापत्रय ॥२॥
प्रसादाची करितों अशा । विषयीं होईना निराशा ॥३॥
तुझा म्हणवितों शिष्य । नरकीं खर्चितों आयुष्य ॥४॥
तुझा म्हणवितों दास । सदा राहतों उदास ॥५॥
तुझा म्हणवितों किंकर । तुला लावितों करकर ॥६॥
तुझा म्हणवितों अंकित । बसतो अफु, गांजा, फुंकित ॥७॥
तुझा म्हणवितों आश्रित । नाहीं आत्मज्ञान श्रुत ॥८॥
तुझा जन्माचा सांगाती । जातों काय अधोगती ॥९॥
विष्णुदासाच्या ह्रदयस्था । याची बसवावी व्यवस्था ॥१०॥
२८. ध्याईं मनी तूं दत्तगुरु ॥धृ०॥
काषायांबर चरणीं पादुका, जटाजूट शिरीं ऋषिकुमरू ॥ध्याई०॥१॥
माला कमंडलू शूल डमरू करीं, शंख चक्र शोभे अमरु ॥ध्याई०॥२॥
पतितपावन तो नारायण, श्वान सुरभिसम कल्पतरु ॥ध्याई०॥३॥
स्मर्तृगामी कलितार दयाघन, भस्म विभूषण ‘रङ्ग’ वरू ॥ध्याई०॥४॥
२९. नमूं नमूं बा यतिवर्या । दत्तात्रेया दिगंबरा । सोडुनी भवसुखाची आशा । शरण तुजला आलों मी ॥धृ०॥
न करी स्नान संध्या । नाहीं केलें तव पूजन ॥ स्तोत्र पाठ पारायण । नाहीं केलें कदाचन ॥१॥
न कळे काव्य आणि गान । नाहीं नाहीं व्युत्पत्तीचें ज्ञान ॥ भाव एक शुद्ध पूर्ण । रितें आन सर्वही ॥२॥
तूंचि माय बाप सखा । बंधू भगिनी आणि भ्राता ॥ इष्ट मित्र तूंचि त्राता । भक्तांचा पालकू ॥३॥
वेडें वांकुडें शेंबडे । बाळ ओंगळ धाकुटें ॥ नाहीं ऐकिलें देखिलें । मायबापें अव्हेरिलें ॥४॥
देव भावाचा भुकेला । ऐकुनी पांडुरंग-धांवा ॥ सच्चिद् आनंदाचा गाभा । उभा ठेला अंतरीं ॥५॥
३०. दत्ता येईं रे । जिवलगा । प्राणविसाव्या माझ्या ॥धृ०॥
तुज विण चैन नसे, चैन नसे काम न काही सुचे ॥ तारक कोण असे, नव दीसे, आन न कोणी भासे ॥ अनाथनाथ असा, अवधूता, तूचि एक भगवंता ॥ येईं येईं बा गुरुराया संतांच्या माहेरा ॥दत्ता०॥१॥
बुडतों भवडोहीं पैलथडी सत्वर नेईं कुडी ॥ लाटा उसळतीं विषयांच्या, कामक्रोधमोहाच्या ॥ ममतामगरीनें. मज धरिलें, कांही न माझें चाले ॥ पहासी कां न असा, बा सदया, संहर दुस्तर माया ॥दत्ता०॥२॥
जन्मुनी नरदेहीं, म्यां कांही, सुकृत केलें नाहीं ॥ प्रचंड उभारिले, पापाचे, डोंगर दुष्कृत्याचे ॥ धांवे झडकरी, असुरारि, कृपावज्र करीं घेई ॥ कर्माकर्मातें, ने विलया, देई अभय दासा या ॥दत्ता०॥३॥
गुरुजना साधूंची, देवाची, निंदा केली साची ॥ ऋषिमुनि निंदियले, वंदियले, म्लेंच्छग्रंथ ते सारे । अमृत सोडुनियां, स्वगृहीचें, परगृहमदिरा झोंके ॥ झालों क्षीण अतां ही काया, धांव धांव यतिराया ॥दत्ता०॥४॥
माता झुगारितां, लवलाही, तान्हें कोठें जाई ॥ तूंचि सांग बरें, कोणी कडे, तुजविण जाण घडे ॥ कोठें ठाव नसे, त्रिभुवनीं, तुज विण रानींवनीं ॥ लागें दीन असा तव पायां, दे ‘रंगा’ पदछाया ॥दत्ता०॥५॥