श्रीदत्तात्रेयाचीं पदे - संग्रह ८

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.


७१. करुणाकर दिनवत्सला द्त्ता । सत्वर धांवुनि येईं रे ॥धृ.॥
तुझें निजरूप पहावें म्हणून मन । अवलोकित दिशा दाही रे ॥१॥
भवसिंधूसी पार कराया । तुजविण आणिक नाही रे ॥२॥
दास माणिकाची हेचि विनंतीं ॥ ठेवीं मज निज पायीं रे ॥३।(माणिकप्रभू)

७२. येई येई दत्तगुरु ॥ नको करूं रे अव्हेरु ॥ तुम्ही शुद्धसत्त्वरूप ॥ मज भेटावें उमप ॥ काय करूं देवराया ॥ तुझ्याविण जन्म वायां ॥ मिठाळोनी चरणजोडा ॥ वरी लोळेन गडबडां ॥ आता करा अंगीकार । नका शिणवूं किंकर ॥ तुझ्या दारींचा भिकारी ॥ नको लावूं दारोदारीं ॥(उदासी)

७३. परब्रह्म दोन्ही पाय ॥ गावे आयासाशिवा ॥ दोन्ही पाय देई मज ॥ माझी भागली गरज ॥ तुझ्या पायांची शपथ ॥ जरि मी मागेन बहुत ॥ नाहीं मागणें हें भारी ॥ कल्पतरूचें भांडारीं ॥१०॥
कल्पतरु कामधेनु ॥ पायीं घाला माझी तनु ॥ नाहीं मागत मी मोक्ष ॥ यासी पाय तुझे साक्ष ॥ नको पाठवूं रे मोक्षा ॥ पुरवीं पायांची अपेक्षा ।(उदासी)

७४. अत्रिबाळा ब्रह्मचारी माथा तुझ्या पायांवरी ॥ जिवलगा  दत्तात्रेया पातळ कां केली माया ॥ गुरुराया या सत्त्वर ॥ घ्याया रंकाचा कैवार ॥ दत्त जिव्हाळ्या राजसा ॥ धांवें पावें या वायसा ॥(उदासी)

७५. कां रे द्त्ता मित्रा, ऐसी सांड केली । कासया धरिली, आढी देवा ॥ पायांसी भेटतां काय तुमचें वेंचे । करा त्या पायांचे, दास आम्हां ॥ आपुल्या दासाची, पाहुनि तळमळ । मागें नाना वेळ धांवलास ॥ मी हा हतभागी, काय दैवीं लिहिलें । पाहिजे पोळीलें. चिंताग्नींत्त ॥ आजवरी नाहीं, केली त्वां उपेक्षा । अनेकां सापेक्षां, भेटलास । पहासी पतीता, दु:खे तळमळतां । केंवि तुझे चित्ता, चैन पडे ॥३०॥
घेसी तेव्हां देशी, हेंच कां औदार्य । पदराचें काय, वेचें तुझें ॥ सांग तरी मागें, कोणी काय दीले । जयाने. तोषीलें, चित्त तुझे ॥(उदासी)

७६. ऊठ अनसूये जिवलगे । धांव निळकंठाचे मागें ॥ ये धावुनि सद्‌गुरुराया । माझी डोई घे तव पायां ॥ आजवरी झाले हाल । आतां पुढे तरी सांभाळ ॥ आई प्रेमपान्हा सोडा । अंकी घ्या हो हा बापुडा ॥ मायबापा दत्तात्रेया ॥ अझुनी कां ना ये दया ॥ काय उपाय तरी करूं । सांगा दत्तात्रेया सद्‌गुरु ॥ अत्रि-अनसूयेच्या मुला । कधीं पावशील मला ॥ माझा तू एक जिव्हाळा । ऐक स्वामी या दयाळा ॥ गुरु चालतां चरणीं । खाली ममांगाची धरणी ॥ सारा जन्म वायां गेला । आतां कधी भजूं तुला ॥(उदासी)

७७. मायबापा धाव आतां शरण मी तुला दुहिता । नये करुणा अजुनी तुजसी । लोटिसी मजला ताता? ॥१॥
अंत किती तूं पाहसी माझा । विनवितें मी तुजसी दत्ता ॥२॥
झाडिन आतां चरण धुळी मी । जन्म नको मजला आतां ॥३॥
क्षमा करावी अपराधाची । अल्लड मी बाला दत्ता ॥४॥
धावा करितें लीला ही । उद्धरीं तूं मज आतां ॥५॥

७८. गुरूचें भजन करितें । ह्रदयास रंजवीतें । हा काम क्रोध गर्व । टाकुनि सर्व देतें ॥१॥
ही सर्व ब्रह्म माया । क्षणभर दूर करितें ॥२॥
भजनांत रंगताना तल्लीन मन होते ॥३॥
ही आस एक आतां । सदैव रक्षी माते ॥४॥
चरणांसि देई थारा । दत्तासी विनवीतें ॥५॥(लीला)

७९. धाव सख्या गुरुराया । चरणीं अर्पियली ही काया । क्षण हा भंगुर जाई वाया । जाऊं कोठें आणिका ठाया? ॥ बालक म्हणुनी संबोधिलें । घेउनि जवळीं आश्वासीलें । बोल कां रे फोल अपुले । झालें ऐसें श्रवणीं न पडलें । देई हाता स्वामीनाथा वासुदेवानंता । तारी झडकरी बा तव तनया ॥(शंकर कुलकर्णीं)

८०. बरें झालें देवा आपुलासा केलें । ज्ञानदृष्टी दिधली तुंवा । संकटीं सांभाळिलें ॥ ब्रह्मा विष्णू महेशदेवा । दत्त तूं केवळ । दयाक्षमा शांतिसागर । कीर्ति तुझी धवल । अनन्यभावें शरण तुला मी । ठेवी करकमल । पाशातुनि मज मुक्त करोनि । ठेवियलें निर्मल बरें झालें देवा ॥(शंकर कुलकर्णी)

८१. गुरुदेवा तुझेंच मी लेकरूं । पतित म्हणुनी नको रे अव्हेरू । हीनदीन परि मी तुझाच म्हणवीन । ओढाळ मन हें सांग कसें आवरूं । बावरलों, चित्त लावियलें तव पायीं । ठायीं ठायीं घेईं ह्रदयीं तुझेंच हे वासरूं । बालक मी रे तुझेंचि श्रीगुरु । ठेवी कृपेचा करू ॥(शंकर कुलकर्णी)

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP