मानसपूजा - प्रकरण ५
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
॥ श्रीराम समर्थ ॥ ॥
रांजण मांदण डेरे घागरी । कुंडालें मडकीं तोवरी । तवल्या दुधाणीं अडघरीं । मोघे गाडगीं करोळे ॥१॥
ऐसीं नानाजिनसी मडकीं । कामा न येती थोडकीं । लहान थोर अनेकीं । एकचि नांव ॥२॥
हंडे चरव्या तपेलीं पाळीं । काथवढया ताह्मणेम मुदाळीं । तांबे गंधाळें वेळण्या पाळीं । झार्या चंबू पंचपात्र्या ॥३॥
धातु कळशा बहुगुणी । पूर्वीं खेळविलें पाणी । गुंडग्या झांकण्या कासरणीं । बहुविधा ॥४॥
विळ्या पळ्या पाटे वरोटे । काहला तवे मोठे मोठे । थावर तेलतवे कढई मोठे । सामोग्रीचे ॥५॥
चुली भाणस आवील । तिसर्या थाळी ओतळ । शुभा काष्ठें बहुसाल । पाट चाटू खोरणीं ॥६॥
पोळपाट लाटणीं घाटणीं । परळ वेळण्या दिवेलावणीं । कंदील रोवणीं दिवेलावणीं । सरक्या वाती काकडे ॥७॥
स्वयंपकगृहें बोललीं । सडासंमार्जनें केलीं । सोंवळी वाळूं घातलीं । आणिलीं अग्रोदकें ॥८॥
इकडे सामुग्रया सिद्ध केल्या । तिकडे चुली पेटल्या । अंगें धुवूनी बैसल्या । स्वयंपाकिणी ॥९॥
पात्रें धुवून पाहिली । पुन्हां धुतली धुवविलीं । उदकें गाळूनि घेतलीं । सोंवळ्यामध्यें ॥१०॥
पुढें आरंभ स्वयंपाकाचा । समुदाव स्वयंपाकिणीचा । नैवेद्य मांडला देवाचा । सावकाश ॥११॥
॥ इति श्रीमानस० ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP