करुणाष्टकें - अष्टक १
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
अनुदिनिं अनुतापें तापलों रामराया । परम दिनदयाळा नीरसी मोहमाया । अचपळ मन माझें नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ॥१॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला । रघुपति मति माझी आपलीसी करावी । सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी ॥२॥
विषयजनितसूखें सूख होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं । रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें स्वस्वरूपीं भरावें ॥३॥
तनु मन धन माझें राघवा रूप तूझें । तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें । प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळ भजनलीला लागली आस तूझी ॥४॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना । घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरींचा । म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा ॥५॥
जळत हदय माझें जन्म कोटयानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी । तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू । षडरिपुकुळ माझें तोडिं यांचा समंधू ॥६॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं पाहिली वाट तूझी । झडकरि झड घाली धांव पंचाननारे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥७॥
सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी । दिवस गणित बोटीं ठेवुनि प्राण कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥८॥
जननिजनक-माया लेंकरूं काय जाणे । पय न लगत मूखीं हाणितां वत्स नेणे । जलधरकण आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥
तुजविन मज तैसें जाहलें रामराया । विलग विषमकाळीं सांडिती सर्व माया । सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । विषय वमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥१०॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आताम चित्त कोठें न राहे । जिवलग जिव घेती प्रेत सांडून जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मज कैंचे चालतें हेंचि साचें । विलग विशमकाळीं सांडिती सर्व माळी । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥१२॥
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकोनि आलें । भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत झालें । भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना परम कठिण देहो देहबुद्धी गळेना ॥१३॥
उपरति मज रामीं जाहली पूर्ण कामीं । सकळजनविरामीं राम विश्रामधामीं । घडि घडि मन आतां रामरूपीं भरावें । रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥१४॥
जळचर जळवासी नेणती त्या जळासी । निशिदिनिं तुजपाशीं चूकलों गूणराशी । भुमिधरनिगमांसी वर्णवेना तयांसी । सकळभुवनवासी भेटि दे रामदासीं ॥१५॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP