करुणाष्टकें - अष्टक २
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.
असंख्यात ते भक्त होऊन गेले । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले । नव्हे कार्यकर्ता भुमीभार झालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलों ॥१॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरी भेटि नाहीं जनासी । स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालोएं । तुझा दा० ॥२॥
सदा प्रेमळासी तया भेटलासी । तुझ्या दर्शनें स्पर्शनें पुण्यराशी । अहंतामदें शब्दज्ञानें बुडालों । तुझा दा० ॥३॥
तुझ्या प्रीतिचे दास निर्माण झाले । असंख्यात ते कीर्ति बोलेनि गेले । बहू धारणा थोर चक्कीत झालों । तुझा दा० ॥४॥
बहूसाल देवालयें हाटकाचीं । रसाळा कळा लाघवें नाटकाचीं । पुजा देखतां जाड जीवीं गळालों । तुझा दा० ॥५॥
कितीएक देहे त्यागिले तूजलागीं । पुढें जाहलों संगतीचा विभागी । देहेदु:ख होतांच वेगी पळालों । तुझा दा० ॥६॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती । पस्तावलों कावलों तप्त झालों । तुझा दा० ॥७॥
सदा सर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझे दास आम्ही निकामी । बहू स्वार्थबुद्धी नुरे कष्ठवीलों । तूझा दा० ॥८॥
जयजय रघुवीर समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2014
TOP