पंढरीमाहात्म्य - अभंग ६ ते १०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
६.
पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा ॥१॥
आणितां अनुमाना न पवे सरी । महिमा न कळे थोरी सहस्रमुखा ॥२॥
हें सुख सुरवरां स्वप्नीं नाही दृष्टीं । जैसें वाळंवटीं तुह्मां आह्मां ॥३॥
धन्य चंद्रभागा पुण्य सरोवर । धन्य भीमातीर पुण्य भूमी ॥४॥
धन्य नरनारी गर्जती हरिनामें । ऐ-कोनि प्रेमें डोले शूळपानी ॥५॥
धन्य वेणुनाद धन्य वृंदावन । धन्य तें महिमान क्षेत्रवासी ॥६॥
धन्य पंचक्रोशी धन्य आसपासी । दुम-दुमी अहर्निशीं नामघोष ॥७॥
धन्य पशु पक्षि कीटक आणि भृंग । जयां अंगसंग पांडुरंगीं ॥८॥
धन्य ते तरुवर अवघे लहान थोर । अवतरले अमर गुप्तरूपें ॥९॥
धन्य ते संसारीं वर्तती जीवन्मुक्त । ज्यात आर्त असे पांडुरंगीं ॥१०॥
धन्य त्याचा वंश ज्या नामीं वि-श्वास । धन्य विष्णुदास नामा तेथें ॥११॥
७.
ऐका पंढरीचें महिमान । राउळें तितुकें प्रमाण । ते-थील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥
ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकीं गति । ते आनिका तीर्था जाती । तीं वंदिती तयांसी ॥२॥
वाराणसी चालिजे मासा । गोदावरी एक दि-वसा । पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३॥
ऐसें शं-कर सांगे ऋषीं जवळी । सकळ तिर्थें माध्यानळीं । येती पुंड-लीकाजवळी । करिती अंघोळी वंदिती चरण ॥४॥
ऐसेनि तिर्थीम पाप झडे । असस्य बोलतां जिव्हा झडे । नाम विनवी संतांपुढें । पंढरी पेठ वोसंडावी ॥५॥
८.
अगाध भवजळ तरावया दुस्तर । रची पंढरपूर कली-माजी ॥१॥
तारु पंढरीनाथ मोलेंविण उतरी । उभा भिमातीरीं वाट पाहे ॥२॥
बुडण्याचें भय नाही पैं संसारीं । कलीमाजी पंढरी थोर नाव ॥३॥
जया नावेवरी अठराही आवलें । साही खण भले मिरवती ॥४॥
चहूंमुखीं जिचा नकळेचि पार । पाहतां विचार सहस्र-मुखा ॥५॥
सडया लावी कसे कुटुंबीं नावेवरी । उतरीलें तीरीं केशि-राजें ॥६॥
प्रेमाचिया पेठीं बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पांडु-रंग ॥७॥
अंगें घाली उडी बुडतिया काढी । ऐसे कल्प कोडी तारियेले ॥८॥
तारियेलें सत्य हाचि पैं निर्धार । नामा पैल पार उतरला ॥९॥
९.
धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं ॥१॥
विठठल ह ध्यानीं विठठल हा मनीं । विठठल चिंतनीं रात्रंदिवस ॥२॥
विठ्ठलविण जया नगमे एक घडी । सर्वस्वें आ-वडी विठठलाची ॥३॥
विठठलची माता विठठलचि पिता । भगिनी आणि भ्राता विठठल ज्यांचा ॥४॥
विठठलचि मित्र विठठलचि पुत्र । विठठल कुळगोत्र केला जिहीं ॥५॥
विठठलचि क्रिया विठठलचि कर्म । विठठल सकळ धर्म कुळदैवत ॥६॥
गुज गौप्य जीवींचें विठठला सां-गावें । विठठलें पुरवावें कोड त्यांचें ॥७॥
सर्वकाळ करणें विठठलचि कथा । विठठल जडला चित्त जयाचिया ॥८॥
विठठल जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्तीं । अखंड बोथरती विठठल विठठल ॥९॥
ऐसा सर्वस्वेंसी विठठल भजतां । सुख आलें हातां विठठलाचें ॥१०॥
नामा म्हणे त्याचें चरणरेणु होऊन । झालों मी पावन ह्मणे आतां ॥११॥
१०.
पंढरीचे जन अवघे पावन । ज्या जवळी निधान पांडु-रंग ॥१॥
विठ्ठलनामें घेणें विठठलनामें देणें । विठठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठठलनामें क्रिया विठठलनामें कर्म । हाचि प्रिय धर्म जया चित्ता ॥३॥
सबराभरित विठठल मागें पुढें । जिकडे जाती तिकडे विठठलचि ॥४॥
निरंतर गर्जती विठठल पवाडे । ऐत निवाडे विठठलरूप ॥५॥
विठठलनाम सरतें विठठलनाम पुरतें । विठठल नाम ज्यातें भांडवल ॥६॥
विठठलनामें करिती अवघा योग क्षेम । नित्य ज्यांचें प्रेम विठठलनामीं ॥७॥
सदा ह्लदयीं भरित विठठलाचें प्रेम । हर्षे विठठलनाम गर्जताती ॥८॥
विठठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥९॥
नामा म्हणे अवघें विठठलचि झालें । विठठलें दिधलें प्रेमसुख ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2014
TOP