पंढरीमाहात्म्य - अभंग ११ ते १५
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
११.
नित्य हे दिवाळी असे पंढरपुरी । ओंबाळिती नारी विठठलासी ॥१॥
पांवा वाजे वेणु बरविया नांदे । नामघोष आ-नंदें नाचतसे ॥२॥
नामा ह्मणे आह्मीं पंढरीये जावें । कवतुकें पहावे विठठलासी ॥३॥
१२.
अवघी हे पंढरी सुखाची मांदुस । माझा स्वप्रकाश रत्न हरी ॥१॥
धन्य संतजन तेथिंचे पारखी । ज्यां झाली ओळखी विठठल-नामीं ॥२॥
अनुभवुनीं चित्तीं पाहिलें विवेकें । धरिलें पुंडलीकें ह्लदयकमळीं ॥३॥
त्रिभुवन खेळण प्रेमाचें कोंदण । करोनि भूषण भोगितसें ॥४॥
युगें गेलीं परीं पालटचि नाहीं । नित्य शुद्ध तेज:पुंज ॥५॥
पाहतां नित्य नवें ध्यातां चित्त निवे ।ह्मणोनि नामा जिवें विसंबेना ॥६॥
१३.
अनंत तीर्थांचें माहेर । अनंत रूपांचें सार । अनंता अ-नंत अपार । तो हा कटीं कर ठेवूनि उभा ॥१॥
धन्य धन्य पांडु-रंग । सकळ दोषां होय भंग । पूर्वज उद्धरती सांग । पंढरपुर देखिलिया ॥२॥
निरा भिवरा पडतां दृष्टी । स्नान करितां शुद्ध सृष्टि । अंतीं तों वैकुंठप्राप्ती । ऐसें परमेष्टि बोलिला ॥३॥
तेथें एक शीत दिधल्या अन्न । कोटी कुळांचें होय उद्धरण । कोटि याग केले पूर्ण । ऐसें महिमान ये तीर्थींचें ॥४॥
नामा ह्मणे धन्य जन्म । जे धरिती पंढरीचा नेम । तयां अंतीं पुरुषोत्तम । जीवें भावे न विसंबे ॥५॥
१४.
ऐसें तीर्थ कोणी दाखवा गोमटें । जेथें प्रत्यक्ष हें भेटे परब्रह्म ॥१॥
कोठें ऐसें क्षेत्र आहे त्रिभुवनीं । सकळां शिरोमणि चंद्रभागा ॥२॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवावें एक । देखतांचि सुख पावे मन ॥३॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा साजिरें । सदा प्रेमपुरें वोसंडत ॥४॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरिकथेचा ॥५॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा निर्मळ । परब्रह्म केवळ सकळां जीवां ॥६॥
नामा म्हणे आह्म दीनांचें माहेर । धन्य पंढरपुर गीतीं गातां ॥७॥
१५.
काय सांगूं तुझी करणी नारायणा । वेदपारायणा के - शिराजा ॥१॥
पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परी पंढरिची सर एका नाहीं ॥२॥
जन्मोंजन्मींचिया पातकां दरारा । चुके येरझारा एके खेपें ॥३॥
ब्रह्मज्ञानेंवीण मोक्ष आहे भूतीं । वाचेसी ते घेती विठठलनाम ॥४॥
बेताळीसांसहित जातील वैकुंठा । नामा म्हणे भेटा विठठल देवीं ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2014
TOP