पंढरीमाहात्म्य - अभंग ३६ ते ४०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
३६.
उठाउठी जावों पंढरीस राहों । आनंदें क्षेत्र पाहों वि-ठ्ठलाचें ॥१॥
नाम वदनीं घ्यावो चरण ह्लदयीं ध्यावो । रूप डोळां पाहों विठ्ठालाचें ॥२॥
जीवें भेटी घेवों आनंदभावें गावों । प्रेमसुख घेवो ह्मणे नामा ॥३॥
३७.
विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी ॥१॥
शिणभाग द्रवाळिला म्हणेल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥
हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥
उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥
धरोनि हनुवटी हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मस्तकीं अभयकर ॥५॥
राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥
३८.
विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घांलोनी लोळणी चरणांवरी ॥१॥
शिणभाग द्रवाळिला म्हणोल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥
हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥
उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥
धरोनि हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मास्तकीं अभयकर ॥५॥
राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥
३९.
धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज ॥१॥
विठोबाचे गांवा न्यारे एकवेळां । फार आहळला जीव माझा ॥२॥
आनंदाचें जीवन पाहेन श्रीमुख । शोक मोह दु;ख हरती माझे ॥३॥
विटेसहित चरण देईन आलिंगनु । तेणें माझी तनु ओल्हावेल ॥४॥
तुझी आवडते हरीचें अंतरंग । माझे जीवलग प्राणसखे ॥५॥
नामा म्हणे विठोबा कृपेची माउली । तेव्हां ते साउली करील मज ॥६॥
४०. ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा ॥१॥
तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनीं । सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुखरूप । जेथें त्रिविध ताप हारपती ॥३॥
ऐसें तीर्थ कोणीं दाखवा सुंदर । गरुड टक्केभार विराजती ॥४॥
ऐसें तीर्थ कोणीं दाखवा निर्मळ । जेथें नासे मळ दुष्टबुद्धि ॥५॥
नामा म्हणे संतजनाचें माहेर । गातां मनोहर गोड वाटे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2014
TOP