पंढरीमाहात्म्य - अभंग १६ ते २०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१६.
सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था । लाज तुझ्या चित्ता कैसी नये ॥१॥
त्रिभुवनिचीं तीर्थें झालीं तीं मळीण । व्हा-वया पावन आलीं येथें ॥२॥
एवढा ब्रह्मानंद कैंचा आणिका ठायीं । जो या आहे पायीं विठोबाच्या ॥३॥
काळ मृत्यु दोन्ही घालोनि पायांतळीं । वाजलिया टाळी कीर्तनसंगें ॥४॥
नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा । भोगिजे अवलीला संतसंगे ॥५॥
धर्म अर्थ काम मोक्ष मुक्ति चारी । देतो हा मुरारी नामें एका ॥६॥
नामा ह्मणे चला जाऊं पंढरिये । पाहूं बापमाये पांडुरंग ॥७॥
१७.
काशी हे पंढरी । प्रयाग नीरा नृसिंहपुरी । पिंड ठेवा पुष्पवती संगमपदावरी । पूर्वज होती चतुर्भुज ॥१॥
सकळ तीर्थें वाराणसी । मध्यनकाळीं येती पंढरीसी । ओंवाळिती विठोबासी । विश्वनाथ ह्मणोनियां ॥२॥
ह्मणऊनि वेगीं चला पंढरपुरा । विठोबा-रायाच्या नगरा । चंद्रभागा सरोवरा । देव कौतुक पाहती ॥३॥
वारा-पासी मनिकर्णिका । चंद्रभागा पुंडलिका । वाराणसी भागीरथी देखा । पांडुरंगीं भीमरथी ॥४॥
वाराणसी पंचगंगा । पुष्पवती पांडुरंगा । महा पातकें जाती भंगा । तीर्थें मस्तकीं वंदिल्या ॥५॥
वाराणसी दंडपाणि । क्षेत्रपाळ हे हनुमंत दोन्ही । सकळ तीर्थें विठोबाचे चरणीं । काशी होय पंढरी ॥६॥
वारासणसी माधवबिंदू । पांडुरंगीं वेणुनादू । पंचकोशी तीर्थ उदंडू । पांडुरंगी पद्मतीर्थ ॥७॥
वारा-णसी मोक्षपंथा । विठठलचेनि सायुज्यता । एवढें तीर्थ त्रिभुवनीं पा-हतां । तीर्थ नाहीं यापरतें ॥८॥
वाराणसी चंद्रमौळी । पांडुरंगीं वनमाळी । विश्र्वनाथ नंदी जवळी । विठोबा जवळी गरुड असे ॥९॥
वाराणसी गौरी खुणा । पांडुरंगीं रुक्मिणी जाणा । वाराणसी अन्न-पूर्णा । पांडुरंगीं जाणा सत्यभामा ॥१०॥
वाराणसी त्रिशुळावरी । सुदर्शनावरी पंढरी । कांहीं संदेह मनीं न धरीं । काशी होय पंढरी ॥११॥
ऐसें सकळ तीर्थांचें माहेर । तीर्थ नाहीं यापरतें थोर । विष्णुदास नामयाचा दातार । पुंडलिकासहित असे ॥१२॥
१८.
पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ ॥१॥
स्त्रान करितां पन्हाळें । उद्धरती सर्व कुळें ॥२॥
सन्मुख पाहातां विठाई । त्यासी उपमा द्यावया नाहीं ॥३॥
ऐसा पंढरीचा महिमा । काय वर्णू ह्मणे नामा ॥४॥
१९.
श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं ॥१॥
तंव नामा ह्मणे सुदर्शना-वरी । देवें रचिली पंढरी । भक्तांसहित राज्य करी । रुक्मिणीवर ॥२॥
तो परमात्मा गुणातीत । अपरोक्ष भक्तांसहित । तेथें प्र-ळय हात जोडित । जयालागीं ॥३॥
जें ब्रह्मयाचें आयुष्य सारें । तें लया जाय चराचरें । तें पंढरपूर । मिळे वस्तु माझी ॥४॥
नामा ह्मणे या खुणा । कळती संतजना । इतर मायिक जना । नेणवती ॥५॥
२०.
कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं ॥१॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनां-तर । तैसीच रात्र एक सहस्त्र । तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥
ऐसे बारा मास । त्याचें एक वरुष । शतभरी आयुष्य । ब्रह्म-याचें ॥३॥
ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुषें गणीत । ज्या प्र-ळयीं पोहत । मार्कंडेय उदकीं ॥४॥
ऐसीं अठ्ठावीस युगें जाण । पंढरपुरासी झालीं पूर्ण । जो कीं ब्रह्मयाचा दिन । प्रळय केला ॥५॥
नामा ह्मणे पंढरिची संख्या । सांगितली संत महंत लोकां । लक्षूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2014
TOP