पंढरीमाहात्म्य - अभंग २१ ते २४

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१.
आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हां नव्हतें चराचर । तैं होतें पंढरपुर ॥२॥
जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्श-नावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥
नामा ह्मणे बा श्रीहरी । ते म्यां देखिली पंढरी ॥७॥

२२.
अवघी हे पंढरी सुखाची वोवरी । अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद ॥१॥
अवघा हा विठ्ठल सुखाचाचि आहे । अनुसरे तो लाहे सर्व सुख ॥२॥
पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं । अ-वघा घ्यावा ध्यानीं अवघ्या मनें ॥३॥
अवघिये आवडी अवघा गावा गीतीं । अवघा सर्वांभूतीं तोचि आहे ॥४॥
अवघा हा जाणावा अवघा हा मानावा । अवघा वाखाणावा अवघी वाता ॥५॥
अवघा ओळखोनि अवघा गिळिजे मनें । अवघा हाचि होणें ह्मणे नामा ॥६॥

२३.
अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र । सुखाचि सर्वत्र भरलें असे ॥१॥
अवघा हा विठठल गीतीं गातां । अवघें पुरवी कोड नामें एकें ॥२॥
अवघें जे सांडोनि अनुसरले यातें । अवघें देतो त्यांतें आपुलें प्रेम ॥३॥
अवघी चित्तवृत्ति ठेविती याच्या पायीं । ह्यातें अवघ्या बाहीं आलिंगितो ॥४॥
अवघें आपुलें मन दिल्हें जिहीं यातें । असे त्यांसांगातें मागें पुढें ॥५॥
अवघ्यासि अनुरला अवघेंचि विसरला । अवघा नामा झाला सुखरूप ॥६॥

२४.
तूं जाऊं नको जेथें तेथें । जरी तुज मुक्तीचें आर्तें । तुज मी सांगेम हित । देऊनि चित्त परियेसें ॥१॥
शंभु अडसष्टी तीर्थांचेम माहेर । सकळ सिद्धि ऋषीश्वर । मध्यान्हकाळीं सुरवर । पंढरपूर ठाकती ॥२॥
जाई जांई आलियारे । पांडुरंगीं राहें स्थिररे । न लगती आणिक दैवतें रे । एक पुरे विठ्ठलची ॥३॥
तीर्थ क्षेत्र दैवतें । ऐसें नाही जेथे तेथें । तिन्ही सर्वोत्तम जेथें । तें पैं क्षेत्र सांगेन ॥४॥
श्रीहरीच्या चोविस मूर्ति । विठ्ठल प्रेमदृष्टीं प्रीति । सहस्त्र नामांवरती कीर्ती । विठठल दैवत जाणावें ॥५॥
रुद्रार्धांगी गौरी । जान्हवी असे शिरीं । सर्वांग व्यापिनी भीमा सुंदरी । आले त्रिपुरारी ठाकोनी ॥६॥
कोटिजन्माचें पातक । नासे स्नान केलिया देख । एवढें क्षेत्र अलैकिक । पांडुरंग भींवरा ॥७॥
काशीं त्यागिजे शरीर । हिंवे शिणलें केदार । पाणी गोमतीचें क्षार । म्हणवोनि महिमा सम नाहीं ॥८॥
जन्म मरणावेगळें । वैकुंठ तुकिलें सगळें । परि त्याहूनि आगळें । एक अक्षर जाणावें ॥९॥
गया भोंवुनि चौ-दापदीं । तीं अनंतें वेणुनादीं । काला केला गोविंदीं । हा दृष्टांत पहा पां ॥१०॥
ज्याचेनि नांवें पिंडदान । त्यासी गयेसी गति जाण । येथें करितां नाम स्मरण । सर्व पूर्वजां मुक्ती ॥११॥
कार्ति-कीये आदित्यवारीं । जो पद्माला स्नान करी ! त्यासी नाहेम येरझारी । नये पुढती संसारा ॥१२॥
इंद्र येवढे परमेष्टी । तेथें मनुष्याच्या काय गोष्टी । धन्य धन्य तो एक सृष्टीं । पंढरी दृष्टीं जो देखे ॥१३॥
बरवें पुंडलीकें केलें । हें परब्रह्म रे अर्चिलें । जगांत शांतवन केलें । परि नेटकें सर्वथा ॥१४॥
तीर्थ सोपारें सधर । कष्ट न लगती अपार । उपवासी निराहार । कीं क्षौर करणोंचि नलगे ॥१५॥
येथें सुखें येणें जाणें । घेणें नलगे धरणें । मनीचें मनोरथ पुरवणें । एके भेटीसाठीं ॥१६॥
पूर्वजन्मींचा तापसी । तीर्थें केलीं पुण्यराशीं । सहस्त्र शतें भोजनासी । देवां द्विजां भजिन्नला ॥१७॥
शाळिग्रामाची पूजा करी । त्यासी प्रसन्न झाले हरि । त्यसी दावितो पंढरी । पूर्व सं-स्कारी ह्मणोनियां ॥१८॥
जयासी नावडे पंढरी । तो पापिया दुरा-चारी । उपजोनियां संसारीं । येरझारीं । शिणतो ॥१९॥
त्यासी श्वान सूकर हांसती । ह्मणती यासी कैसी पडली भ्रांती । उपजो-नियां मनुष्ययातीं । पंढरपूरपति नोळखे ॥२०॥
जो विन्मुख पंढ-रपुरा । त्याचा संग झणीं धरा । मोडोनि सुकृताचा थारा । पाप शरीरासी तो गेल ॥२१॥
जो पंढरीसी आर्तु । त्याची करा  बरवी मातु । अंतकाळीं पंढरीनाथु । यमपंथु चुकवील ॥२२॥
बरवें सम-तुल्य वाळुवंत । वरी वैष्णव मिळाले घनदाट । करिती हरिनामाचे बोभाट । वीर उद्भट विठ्ठालचे ॥२३॥
जे येथें प्रेमासी आतुर । ते चतुर्भुज होती नर । येवढें क्षेत्र पंढरपुर । महिमा थोर तिहीं लोकीं ॥२४॥
अन्य क्षेत्रीं पाप कीजे । तें पुण्य क्षेत्रीं विनसिजे । पुण्य क्षेत्रीं पाप कीजे । तें त्यागिजे पंढरीसी ॥२५॥
पंढरीचें पातक । पंढ-रीस नासे देख । ऐवढें क्षेत्र अलौकिक । त्रिभुवनामाझारी ॥२६॥
पैल इटेवरी सांवळा । विठोबा पहा पहा रे डोळां । विघ्न घालोनि पायातळा । आणिक कळिकाळा दमेना ॥२७॥
जप तप अनु-ष्ठान । नलगे जिवासी रे बंधन । आणिक न करावें साधन । पहावे चरण विठोबाचे ॥२८॥
देवा सांगे वसुंधरा । मी नभियें सप्तसा-गरा । स्थावर जंगमादि सारा । नाहीं भार तयाचा ॥२९॥
ज्यासी नावडे विठ्ठल वीरु । त्याचा मज भार थोरु । त्यासी नरकीं होय थारु । तो असुर प्राणिया ॥३०॥
ऐसा हा पंढरपुरपति । जीवंतु असतां देतो मुक्ति । मेलिया देतो ब्रह्मप्राप्ति । दोहींकडे सौरस ॥३१॥
येरं प्राणियां कष्ट थोर । परि तें न भरे उदर । मेलिया । यम किंकर । अष्टौप्रहर जाचिती ॥३२॥
ऐसा हा कैलासींचा राणा । गिरीजे स्कंदा सांगे खुणा । तुह्मी आणिक मंल नेणां । या पांडुरंगावांचुनी ॥३३॥
विठ्ठल विठ्ठल म्हणतां । तुटती महापातकचळथा । विष्णुदास नामा विनवीं संतां । सावधान व्हा जी ह्मणतसे ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP