असें हें रूपक ( म्ह० अभेद ) ज्या ठिकाणीं , विषय आणि विषयी या दोघांचा एक विभक्तींत प्रयोग करून सांगितलें असेल, त्या ठिकाणीं, संबंधरूप असतें; पण जेथें विषय व विषयी एका विभक्तींत नसतील त्या ठिकाणीं, तें रूपक शब्दानें सांगितलें जात असल्यानें, तें कुठें विशेषण-रूपानें येतें, तर कुठें विशेष्यरूपानें येतें, असें आम्ही पुढें स्पष्ट करून सांगणारच आहोंत.
आतां रत्नाकरांनीं ( खालीलप्रमाणें, रूपकाचे बाबतींत, जें ) म्हटलें आहे कीं , “ दोन भिन्न पदार्थांचा, एकाच विभक्तीमध्यें जेथें निर्देश केला असेल, त्या सर्व ठिकाणीं रूपक अलंकार म्हणावा; मग तो निर्देश सादृश्यसंबंधामुळें, केलेला असो, अथवा दुसर्या कोणत्याही संबंधामुळें केलेला असो. सादृश्यसंबंधामुळें झालेल्या तादात्म्याप्रमाणें दुसर्या संबंधा-मुळें झालेल्या तादात्म्याच्या मुळाशींही सारोपलक्षणा सारखीच असल्यामुळें सादृश्याहून इतर कोणत्याही संबंधामुळें होणार्या तादात्म्याचाही ह्या रूपकालंकारांत समावेश करणें योग्य होईल. म्हणून ‘ उपमान व उपमेय ह्या दोहोंमधील अभेदालाच रूपक म्हणावें, परंतु कार्यकारणामधील अभेदाला रूपक म्हणूं नये ’ असें म्हणणें हा प्राचीनांचा केवळ दुराग्रह आहे. ” तें योग्य नाहीं. कारण त्यांचे म्हणणें मान्य केल्यास, ज्या अपह्लुति वगैरे अलंकारांत, दोन भिन्न ( उपमान व उपमेय नसलेले ही दोन ) पदार्थ एका व भक्तींत असतात, त्या ठिकाणीं ही रूपकाच्या लक्षणाची अतिव्याप्ति होऊं लागेल. शिवाय तुम्हीच पूर्वीं असें म्हटले होतें कीं, “ सादृश्य्यमूलक स्मरणाला ( च ) स्मरणालंकार म्हणावें; चिंतादिमूलक स्मरणाला स्मरणालंकार म्हणूं नये. ” आतां येथें, तुम्ही सादृश्यमूलकाप्रमाणें कार्यकारणमूलक, कल्पित ताद्रूप्याला जर रूपक म्हणून स्वीकारूं लागला तर, सादृश्यमूलक नसलेल्या पण चिंतादिमूलक असलेल्या स्मरणाचाही स्मरणालंकार म्हणून स्वीकार करायला तुमची हरकत नसावी. तुम्ही म्हणाल कीं, चिंतामूलक स्मरणाला अलंकार मानल्यास, व्यभिचारी भाव असलेल्या स्मरणाला विषयच मिळणार नाहीं. पण तसें म्हणूं नका. कारण कीं, व्यभिचारी भाव हा वाच्याचा विषय नसून व्यंग्याचा विषय आहे असें म्हणून ( तुम्हाला ) तुमच्या म्हणण्याची उपपत्ति लावता येईल.
ह्या अलंकाराच्या बाबतींत अप्पय्य दीक्षितांचें म्हणणें पुढील-प्रमाणें आहे-
“ बिंबप्रतिबिंबभावानें विशिष्ट नसलेल्या, शब्दानें सांगितलेल्या, व ज्याचा निषेध केला नाहीं अशा विषयाच्या ठिकाणीं, जेथे विषयीचें उपरंजन होते, ( म्हणजे तादात्म होतें ) तेथें रूपक अलंकार समजावा. ह्या लक्षणांत, ‘ बिंबप्रतिबिंबानें विशिष्ट नसलेल्या ’ हें विशेषण विषयाला दिलें असल्यामुळें,
“ तुझ्या चरणाच्या नखरूपी रत्नावर आळित्याचा रंग लावणें हें उत्तम चंदनाच्या लेपानें चंद्राला पांढरें करून टाकणेंच आहे. ”
ह्या ठिकाणीं असलेल्या निदर्शना अलंकाराचा निरास झाला आहे. कारण कीं, ह्या निदर्शनेंतील विषय जो मार्जन तो, ( अलक्तकमार्जन व श्रीखंडलेप ह्या दोहोंमुळें होणार्या बिंबप्रतिबिंबभावांत ) बिंबविशिष्ट असा आहे. ‘ निर्दिष्ट ’ ह्या विशेषणामुळें, ह्या रूपकाच्या लक्षणाची, अति-शयोक्ति अलंकारांत अतिव्याप्ति होणार नाहीं; कारण कीं, ‘ कमलमनम्भसि कमले च कुवलये तानि कनकलतिकायाभ् । ’ [ पाण्यावांचून कमळ उगवलें आहे; आणि त्या कमळावर दोन नीलकमळें आहेत. ( आणि ) तीं तिन्हीं, एका सोन्याच्या वेलीवर आहेत. ]
ह्या अतिशयोक्ति अलंकारांत, विषय ( विषयीनें गिळून टाळला असल्यानें ) निर्दिष्ट नाहीं. ‘ ज्याचा निषेध केलेला नाहीं ’ , ह्या ( विषयाच्या ) विशेषणामुळें, ह्या लक्षणाची, अपह्नुति अलंकारांत होणारी अतिव्याप्ति टळली. ‘ जेथें विषयाचे ठिकाणीं, विषयी जाणूनबुजून केलेल्या ताद्रूप्याच्या निश्चयाचा विषय होतो ’ अशा अर्थाचे लक्षणांत वापरलेले ( उपरञ्जकतामेति हे ) शब्द, ससंदेह, उत्प्रेक्षा, समासोक्ति, परिणाम व भ्रांतिमान् ह्या अलंकारांत, रूपकाची होऊ पाहणारी अतिव्याप्ति दूर करतात. ( कसें तें पहा :- )
ससंदेह व उत्प्रेक्षा ह्या दोन अलंकारांमध्यें ताद्रूप्याचा निश्चय नसल्यानें, ( त्यांचा निरास झाला. ) समासोक्ति व परिणाम ह्या दोन अलंकारांमध्यें विषयानें विषयीच्या ताद्रूप्याचा ( विषय ) होणें ही गोष्टच नसतें. कारण कीं, समासोक्ति अलंकारांत, केवळ प्रकृत व्यवहारावरच अप्रकृत व्यवहारावरच अप्रकृत व्यवहाराचा समारोप केलेला असतो ( विषयीचे विषयाशीं ताद्रूप्य सांगितलेलें नसते ) आणि परिणामालंकारांत, आरोप्यमाण विषयीच
विषयाच्या ताद्रूप्याचा विषय होतो, आणि भ्रांतिमान् अलंकारांत खरा किंवा कल्पित, कसलाही भ्रम असला तरी तो प्रवृत्ति ( करण्या ) पर्यंत पोंचलेला अतएव स्वाभाविक बनलेला असतो, आणि म्हणूनच तो भ्रम खराखुरा असतो ( म्हणजे बुद्धया मानलेला नसतो. ) ” हें त्यांचें ( अप्पय्य दीक्षितांचें ) म्हणणें बरोबर नाहीं.