‘ त्वत्-पाद-नखरत्नानां ’ इत्यादि श्लोकांत असलेल्या निदर्शनेच्या व्यादृत्तीकरितां ‘ बिम्बप्रतिबिम्बभावानें विशिष्ट नसलेला ’ हें विशेषण विषयाला देणें योग्यच नाहीं. जर ‘ त्वपाद० ’ ह्या श्लोकांत, ‘ मुखं चंद्र: ।’ ह्या दुसर्या रूपकाप्रमाणें शब्दानें सांगितलेला आरोप असूनसुद्धां, रूपक आहे असें म्हणायचें नसेल, आणि निदर्शनाच आहे असें म्हणायचें असेल तर, मुखं चंद्र: ह्या वाक्यांतही निदर्शना आहे असें म्हणा, आणि रूपकाविषयीं तुम्ही दाखविलेल्या आदराची लंगोती फेकून द्या. ( आणि आम्ही सर्वत्र निदर्शनाच केवळ मानतों असें उघड उघड म्हणा. ) शिवाय आम्ही दीक्षितांना असें वि़चारतों कीं, ‘ त्वत्-पाद०’ इत्यादि श्लोकांत, पदार्थनिदर्शना आहे का वाक्यार्थनिदर्शना आहे ? ( या दोहोपैकीं ) पहिली म्हणजे पदार्थनिदर्शना आहे असें म्हणाल तर, तेंही बरोबर नाहीं. कारण, ह्या ठिकाणीं केवळ दोन पदार्थांचा अभेद नसून बिंब-प्रतिबिंबभावयुक्त विशेषणांनी विशिष्ट असलेल्या दोन पदार्थांचा ह्या ठिकाणीं
अभेद असल्याची प्रतीति होत आहे. शिवाय तुमच्या कुवलयानंदामधील निदर्शनाप्रकरणांत, तुम्ही जो मार्ग सांगितला आहे त्याप्रमाणें, दुसर्या धर्मीरूपी पदार्थावर, त्या धर्मीवर नसलेल्या दुसर्या एका धर्मरूप पदार्थाच्या भेदारोपाचा, ह्या श्र्लोकांत, अभाव असल्यानें येथे पदार्थ-निदर्शना नाही. आतां दुसर्या प्रकारची जी वाक्यार्थ-निदर्शना तीही ह्या श्र्लोकांत नाही. कारण, ती मानली तर वाक्यार्थरूपक अजिबात नाहीसें होण्याची वेळ येईल. तुम्ही म्हणाल, ‘‘(मग, बिघडले कोठें?) रूपक नाहीसे होणें आम्हांला इष्टच आहे.’’ पण मग, (आम्ही म्हणतों) ‘तुमच्या उलट म्हणणें आम्हांलाही सोपे आहे. (म्हणजे ‘वाक्यार्थ-निदर्शना खुशाल नाहींशी होऊं दे’, असें उलट आम्हांलाही म्हणतां येईल). पण (खरें म्हणजे) आम्ही निदर्शनाप्रकरणांत पुढें सांगणार आहोत त्या पद्धतीनें, ‘‘जेथे अभेद शब्दानें सांगितलेला असेल तें रूपक व तो अर्थावरून कळणारा असेल तेथें निदर्शना; त्याचप्रमाणें, उद्देश्यविधेयभाव जेथें स्पष्ट असेल तेथें रूपक; आणि जी उद्देश्य विधेयभावरहित असेल ती निदर्शना,’’ असा रूपक आणि निदर्शना ह्या अलंकारांमध्ये फरक दाखवून, सर्व व्यवस्था लावतां येईल. एवंच काय की, वरील श्र्लोकांत वाक्यार्थरूपकच आहे, वाक्यार्थनिदर्शना नाही. आतां ह्या श्र्लोकांत तुम्हांला निदर्शनाच करायची असेल तर ती, त्यांत, असा फरक करून, कराः-
‘‘तुझ्या पायांच्या नखरूपी रत्नांना, आळित्यांनी जो रंगवितो, तो चंदनाच्या लेपानें चंद्राला पांढरा करतो.’’