आतां, ‘प्राचीसंध्यासमुद्यन्०’ इत्यादि श्र्लोकांत, आरोप्यमाण विषयी व आरोपाचा विषय या दोहोंची ही एकमेकांशीं अनुकूलता असतांना, परम्परित रूपकांतील दोन अवयव रूपकांचा परस्पराशीं समर्थ्य समर्थ्यकभाव असल्याची उदाहरणें दाखवून झालीं. आतां आरोपविषय व आरोप्यमाण विषयी ह्या दोघांचें एकमेकांशीं प्रातिकूल्य असूनही होणार्या परंपरित-रूपकाचें उदाहरण हें-
‘‘आनंदरूप हरणाचें बाबतींत दावानळ, शीलरूपी वृक्षाच्या बाबतींत माजलेला हत्ती, आणि ज्ञानरूपी दिव्याच्या बाबतींत सोसाट्याचा वारा, असा हा खल-समागम आहे.’’
अथवा, (ह्याचें दुसरें उदाहरण हेः-)
‘‘कारुण्यरूपी फुलाच्या बाबतींत आकाश, शांतिरूपी थंडीच्या बाबतींत अग्नि, आणि यशरूपी सुवासाच्या बाबतीत लसूण अशा दुष्ट पुरुषाचें कोण वर्णन करूं शकेल?’’
ह्या दोन श्र्लोकांपैकीं पहिल्या श्र्लोकांत नष्ट होणारा व नष्ट करणारा असा, विषय व विषयी या दोहोंत प्रतिकूलतारूप साधारण धर्म आहे; व दुसर्या श्र्लोकांत संबंध बिलकुल नसणें एतद्रूप प्रतिकूलता हा साधारण-धर्म, (उपमान व उपमेय ह्या दोहोंमध्यें) आहे. तरी पण, ह्यांतील दोन अवयव रूपकांपैकी एक समर्थ्य रूपक व दुसरें समर्थक रूपक असणें ह्या बाबतींत मात्र ह्या दोन्हीं श्र्लोकांत फरक नाहीं. याचप्रमाणें,
‘‘हा (दुष्ट पुरुष) सज्जनरूपी कापसाचें रक्षण करण्याच्या बाबतींत मोठा अग्नि आहे. आणि परदुःखरूपी अग्नीचें शमन करण्याच्या बाबतींत वारा आहे. ह्याचे वर्णन कोणाला करतां येईल?’’
वरील श्र्लोकांत, रक्षण व शमन ह्या दोन शब्दांवर विरोधिलक्षणा केली असल्यानें, त्या दोन्ही शब्दांचा अगदीं उलटा अर्थ होतो. (म्हणजे रक्षण याचा अर्थ नाश; व शमन याचा अर्थ वर्धन असा होतो.)
अशा रीतीनें पदार्थरूपकाचें थोडक्यांत निरूपण केलें.
आतां एक वाक्याचा अर्थ विषय होऊन त्यावर दुसर्या वाक्यार्थाचा (विषयी म्हणून) जेथें आरोप केला जातो, त्या ठिकाणीं, वाक्यार्थरूपक होतें.
ज्याप्रमाणें, विशिष्ट उपमेंतील विशेषणांचा, परस्पर उपमानोपमेयभाव हा, अर्थावरून समजायचा असतो (तो शाब्द नसतो) त्याप्रमाणें, येथेंही दोन वाक्यार्थांचे जे घटक पदार्थ त्यांच्यामधील रूपकही अर्थावरून निश्र्चित केले जातें.
(उदाहरणार्थ)- ‘‘तप व दान ह्यांच्या योगानें ह्याच्या आत्म्याला निर्मल करणें हें, सरोवरांतील पाण्याच्या समूहानें सूर्याला धुऊन काढणें आहे.’’
ह्या श्र्लोकांत, आत्म्याच्या संबंधानें आलेलीं तप व दान हीं, आरोपाचा विषय जो आत्मा त्याचीं विशेषणें असून, तीं बिंबरूप आहेत. व विषयी असलेल्या सूर्याच्या ठिकाणीं, ‘पाण्यानें धुऊन काढणें इत्यादि जीं विशेषणें ती प्रतिबिंबरूप आहेत. ह्या बिंबरूप विशेषणांवर प्रतिबिंबरूप विशेषणांच्या तादात्म्यानें होणारें रूपक अर्थावरून कळून येतें, व तें (विशेषणांचें) रूपक, प्रधान असलेल्या, विशिष्ट रूपकांचें अंग होतें ‘‘ह्या, श्र्लोकांत रूपक नाहीं; कारण कीं, रूपकांत बिंबप्रतिबिंबभावच नसतो,’’ असें कोणीतरी, स्वतःला आलंकारिक म्हणविणार्या गृहस्थानें (म्ह० अलंकारसर्वस्वकारानें) फसविलेल्या एका दीर्घश्रवसची [(१) मोठी कीर्ति असणार्याची (२) लंबकर्ण असणाराची)] (म्ह० अप्पय्य-दीक्षित ह्यांची) उक्ति विश्र्वास ठेवण्यासारखी नाहीं. कारण, ह्या बाबतींत अलंकारशास्त्राचा नियम असा आहे कीं एखाद्या वाक्यांत, ज्या उपमान आणि उपमेय ह्या दोहोंची, इव वगैरे शब्दांचा प्रयोग केला असतां, उपमा होते त्याच दोहोंपैकी एकावर दुसर्याचा आरोप केला असतां, रूपक होतें.