आतां वरील श्र्लोकांत रूपक आहे ह्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करीत नसला तर नका करूं. पण मग, अशा दोन पदार्थांची (उपमेय व उपमान यांची) इव यथा वगैरे शब्दांच्या प्रयोगामुळें होणारी जी उपमा तिचाही स्वीकार करूं नका. आणि, ‘हे राजा, तुझ्या ठिकाणीं असलेला कोप चंद्राच्या ठिकाणीं असलेल्या अग्नीप्रमाणें आहे.’ इत्यादि वाक्यांत, स्वतःच्या कल्पनेनें तुम्ही जो विशिष्ट (उपमानरूप) धर्मी तयार केला त्याच्या सादृश्याच्या प्रत्ययावरून, उपमा आहे असें म्हणत असाल तर ह्याच वाक्यांतले इव वगैरे शब्द काढून, ‘हे राजा, तुझ्यांतील कोप चंद्रांतील अग्नि (च) आहे.’ असें वाक्य केल्यास, तेथें रूपक होईल, असें तरी म्हणा.
याचप्रमाणें,-
‘‘केशराच्या लेपानें ज्याचें सर्व अंग लिप्त आहे, व ज्यानें भगवें वस्त्र धारण केले आहे असा हा यति ज्यांतील कोवळ्या उन्हांत छोटे छोटे अभ्र फिरत आहेत असा (साक्षात्) संध्याकाळच आहे, यांत संशय नाहीं.’’
ह्या श्र्लोकांतही विशिष्ट रूपक आहे, (म्हणजे बिंबप्रतिबिंबभाव भावयुक्त रूपक आहे) असें समजावें. फरक एवढाच कीं, ‘त्वयि कोपोः०’ इत्यादि श्र्लोकांत, विषयी पावक, स्वतःच्या बुद्धीनें कल्पित केला असल्यानें, तें विशिष्ट-रूपक कल्पित आहे व येथें तसें नसून, केवळ विशिष्ट-रूपक आहे.
वरीलसारख्या ठिकाणीं प्रतीयमान उत्प्रेक्षा आहे असें म्हणतां येणार नाहीं; कारण कीं, वरील श्र्लोकांतील अभेद निश्र्चित झालेला आहे. जर येथें उत्प्रेक्षा असती तर, ह्यांतील अभेद संभाव्यमान झाला असता. वरील श्र्लोकांतही उत्प्रेक्षा मानूं लागले तर, ‘मुख चंद्रः’ इत्यादि वाक्यांतही प्रतियमान उत्प्रेक्षा मानायची पाळी येऊन रूपकाचा अजिबात लोप होण्याचा प्रसंग येईल.
आतां रूपक वाक्यांतील शाब्दबोधाचा विचार करूं या --
ह्या बाबतींत प्राचीनांचें म्हणणें असें--रूपकवाक्यांतील विषयीच्या वाचकपदावर सारोपा लक्षणा केल्यानें, ‘विषयीच्या ठिकाणी असणार्या गुणांनीं युक्त,’ असा अर्थ हातीं येतो. व मग त्या अर्थाचा, अभेद-संबंधानें विषयाच्या ठिकाणीं, विशेषण म्हणून अन्वय होतो. अशा रीतीनें, ‘मुखं चंद्रः’ ह्या वाक्याचा, ‘चंद्राच्या ठिकाणीं असणार्या गुणांनीं युक्त जो पदार्थ त्याच्याशीं अभिन्न असें मुख’ असा शाब्दबोध होतो. म्हणूनच अलंकारभाष्यकारांनीं म्हटले आहे कीं, रूपकांत, आरोपमूलक लक्षणा ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्यामुळेंच, त्याला रूपक म्हणतात.’’ ह्यावर कुणी शंका घेईल कीं, रूपकांतही ‘‘चंद्र ह्या पदावर लक्षणा केल्यावर, चंद्रसदृश असा लक्ष्यार्थ होतो व उपमेंतही चंद्र-सदृश असाच होतो. मग उपमेहून रूपकाचा फरक कसा? आणि ह्या दोहोंच्या शाब्दबोधामध्यें फरक नसल्यानें, या दोहोंच्या चमत्कारांतही फरक नाही. (मग यांना दोन निराळे अलंकार कां म्हणावें?) आणि केवळ अभिधावृत्ति (उपमेंत) व लक्षणावृत्ति (रूपकांत) एवढाच ह्या दोन अलंकारांत फरक असेल तर, तो दोन निराळे अलंकार मानायला कारण होणार नाहीं.’’ पण असें (शंकाकाराला) म्हणतां येणार नाहीं. कारण कीं, ह्या दोन अलंकारांपैकी रूपक अलंकारांत, लक्ष्यार्थाचें ज्ञान झाल्यानंतर, लक्षणेचें प्रयोजन म्हणून त्यानंतर अभेदाचें ज्ञान जें सूचित होतें, त्यामुळेंच उपमेहून रूपकाचा फरक स्पष्ट दिसतो; आणि निरूढ लक्षणा सोडून इतर ठिकाणच्या लक्षणेंत प्रयोजन असलेंच पाहिजे, असा नियम आहे. आतां ह कया प्रयोजनवती लक्षणेंत, प्रयोजन-कक्षेंत होणारें जें अभेदज्ञान तें लक्षणावृत्तीच्या ज्ञानानें होणारें असल्यामुळें, त्या (व्यङ्ग्य) ज्ञानाचा, अभिधा व्यापारानें होणार्या रूपकवाक्याच्या ज्ञानानें, बाध होणार नाही. (म्हणजे रूपक-वाक्याच्या वाच्यार्थानें प्रयोजनकक्षेंत होणार्या अभेदरूप व्यंगार्थाचा कधीही बाध होऊं शकणार नाहीं.)
परंतु या बाबतींत नवीन आलंकारिकांचें मत असेः- (एकच विभक्तींत असलेले) दोन नामार्थ एकच वाक्यांत आले असतां त्यांच्यातील संबंध अभेद हाच असतो असा व्युत्पत्ति-शास्त्राचा सिद्धांत असल्यामुळें, ‘मुख चंद्रः’, ह्या (सारख्या) वाक्याचा, लक्षणेचा आश्रय न करतांही, ‘चंद्राहून अभिन्न मुख’ असाच शाब्दबोध होतो. ह्या ठिकाणीं, लक्षणा केल्यानें मिळणारें जें अभेदरूपी फळ, तें इतर मार्गानें मिळत असल्यानें, लक्षणेची कल्पना करणें योग्य होणार नाहीं. शिवाय, ‘मुख चंद्रः’ ह्या रूपवाक्यांत, जर लक्षणा मानली तर, मुखचंद्र ह कया सामासिक पदांत, तो समास उपमित-समास माना किंवा विशेषण-समास माना, त्यांतील उत्तर पदावर होणारी लक्षणा अगदी सारखीच असल्यानें, त्यांतील एका (उपमित) समासांत उपमा होते व दुसर्या (विशेषण) समासांत रूपक होतें, असें म्हणणें हे असंगत होईल. शिवाय, ‘मुखं न चंद्र-सदृशं अपि तु चंद्रः’ ह्या सादृश्याच्या निषेधाशीं मिश्रित असलेल्या वाक्यांत, सादृश्याचें ज्ञान (लक्षणा केल्यास) होऊच शकणार नाहीं. त्याचप्रमाणें ‘देवदत्ताचें मुख चंद्रच आहे; पण यज्ञदत्ताचें मुख तसें नाहीं, पण चंद्र-सदृश आहे,’ ह्या वाक्यांत नञर्थाचा चंद्रसदृश ह्या लक्ष्यार्थाशीच सरळ अन्वय होत असल्यानें (चंद्रपदाचा चंद्रसदृश हा लक्ष्यार्थ ध्यानांत घेऊन) ‘चंद्रासारखा नाहीं, पण चंद्रासारखा आहे’ असा भलताच अर्थ (ह्या वाक्याचा) करण्याची पाळी येईल. कोणी म्हणेल कीं, ह्या वाक्यांतील चंद्रपदावर होणार्या लक्षणेचें प्रयोजन (म्हणजे फळ) जो अभेद त्याच्याशीं ह्या नञर्थाचा अन्वय करायला काय हरकत आहे? पण हें म्हाणेंही बरोबर नाहीं. कारण कीं, नञर्थाचा लक्ष्यार्थांशीं अन्वय करण्याच्या वेळीं प्रयोजनकक्षेंतील अभेद हा अर्थ मुळीं अस्तित्वांतच नसतो. (लक्ष्यार्थानंतरच्या व्यंजनाव्यापाराच्या तृतीय कक्षेंत तो सूचित होतो.) आतां, (नव्यांच्या मतें,) दोन नामार्थामधील अभेद संबंधाचें जे ज्ञान तें आहार्य म्हणजे बुद्धया मानलेलें असल्यामुळें, त्याचा, हें बाधयोग्य आहे या ज्ञानानेंही प्रतिबंध होऊं शकणार नाही. किंवा (असे म्हणा की,) ‘‘आहार्याहून इतर प्रकारचें ज्ञान असलें तरच त्याचा बाधनिश्र्चयानें प्रतिबंध होणार्या ज्ञानाच्या यादींत समावेश करावा.’’ ह्या नियमाच्या जोडीला, ‘‘शाब्दबोधाहून इतर प्रकारचा बोध असेल तर त्याचाही बाधज्ञानानें प्रतिबद्ध होणार्या ज्ञानाच्या यादींत समावेश करावा.’’ असा दुसरा एक नियम करून, ‘‘शाब्दबोधामुळें होणार्या अभेदाच्या ज्ञानाचा रूपकवाक्यांत बाध होत नाहीं.’’ असें म्हणावें. एखाद्या पदार्थाचा (प्रत्यक्षादि अन्यप्रमाणांनीं) निश्र्चितपणें बाध होत असेल तर, त्या बाधित पदार्थाचा शाब्दबोध कधीही होणार नाहीं, कारण कीं, (शाब्दबोध होण्याला आवश्यक असणार्या) योग्यता-ज्ञानाचा अशा ठिकाणीं अभाव असतो. परंतु हें योग्यताज्ञानच कुठे आहार्य म्हणजे बुद्धया मानलेलें असेल तर तशा ठिकाणीं (अन्य प्रमाणांनीं) बाधित झालेल्या पदार्थांचाही शाब्दबोध होणें इष्ट असतें. आणि म्हणूनच योग्यताज्ञानाचा बाध-निश्र्चयानें निरास झाला असतांही (त्या योग्यताज्ञानाचा बुद्ध्या स्वीकार केल्यानें) तें योग्यताज्ञान शाब्दज्ञानाचें कारण होऊं शकते. एवंच अशा रीतीनें आहार्यज्ञानाच्या आधारावर अथवा शाब्द-बोधाच्या आधारावर कशाही प्रकारें, काव्याच्या प्रांतांत सर्व ठिकाणीं, (बाधितार्थाच्याही) शाब्दबोधाची उपपत्ति लावता येते. (पुन्हां, नव्यमतवादी, लक्षणेचें रूपकांत खंडन करतांना म्हणतातः-) शिवाय, (रूपक-वाक्यांत लक्षणेच्या) योगानें विषयीमध्यें असलेल्या धर्मानें युक्त असा लक्ष्यार्थ झाल्यास, म्ह० सादृश्य-मूलक-लक्षणेनें, विषयिगत ‘साधारणगुणयुक्त’ असा लक्ष्यार्थ हातीं आल्यास त्या सादृश्य-ज्ञानाचें, प्रयोजन कक्षेंत, अभेद हें फळ कसें होऊं शकेल? साधारण-धर्मानें विशिष्ट (म्ह० सादृश्यमूलक लक्षणेनें होणारें,) अभेदज्ञान हें असाधारण धर्मानें विशिष्ट उदा० चंद्राच्या चंद्रत्व या साधारण धर्मानें विशिष्ट अशा अभेद-ज्ञानाचें कारण होत असलेले कुठेंहि आढळत नाहीं. उदाहरणार्थ- घट व पट ह्या दोहोंचा द्रव्यत्व ह्या साधारण धर्माच्या दृष्टीनें अभेद होत असला तरी घटाच्या घटत्व ह्या असाधारण धर्माच्या दृष्टीनें घट व पट ह्या दोहोंत भेद हा राहणारच, पण, ह्याचे उलट, दोन नामार्थांमधील अभेदान्वयाच्या बळावर दोन पदार्थांमधील अभेद अगोदरपासूनच ज्ञात असेल तर मात्र त्या अभेद-ज्ञानाचें फळ, त्या पदार्थामधील असाधारण धर्मयुक्त अभेद-ज्ञान हें, असू शकेल. उदाहरणार्थ--तट हा प्रवाह ह्या दोहोंत अभेद आहे असें ज्ञान झाल्यानंतर, तटाचें ठिकाणी, प्रवाहांतील शैत्य व पावनत्व या असाधारण धर्माचें अभेद-ज्ञान होऊं शकतें. आणि म्हणूनच,