विशेषशास्त्र हें स्वतःच्या विषयाहून बाकी राहिलेला विषयच सामान्यशास्त्राला देत असल्यानें, तें विशेषशास्त्र सामान्यशास्त्र, तेवढ्या (स्वतःच्या) विषयांत बाध करतें, असें म्हणतात. आतां प्रस्तुत, रूपक अलंकाराचें लक्षण म्हणजे, त्याचा अभेदरूपी धर्म. पण तो धर्म जर उत्प्रेक्षा वगैरे अलंकारात असेल तर, त्यांना सोडून इतर ठिकाणींच (म्ह० केवळ रूपकांतच) तो अभेदरूपी धर्म आहे असें कसें म्हणतां येईल? (कारण कीं, उत्प्रेक्षा व अपह्नुति ह्यांच्यांतही तो अभेदरूप धर्म आहेच.) उदाहरणार्थ- घटत्व हा धर्म घटांत आहे; त्याप्रमाणें घटांत पृथ्वीत्व व द्रव्यत्व हेही दोन धर्म आहेत. तेव्हां अशा स्थितींत घटत्व हा धर्म स्वतःच्या अधिकरणांत, म्हणजे घटांत, असलेल्या, पृथ्वीत्व व द्रव्यत्व ह्या दोन धर्मांना काढून टाकून, त्यांना दुसरा विषय (स्थान) घ्यायला लावू शकतो असें कसें म्हणतां येईल? (त्याचप्रमाणें अभेदरूप धर्म रुपकाप्रमाणें उत्प्रेक्षा व अपह्नुति ह्यांतही आहे; तेव्हां तो अभेदरूप धर्म केवळ रूपकाचे लक्षण म्हणून सांगितल्यास, तो अपह्नुति व उत्प्रेक्षा यांच्यामध्येही अतिव्याप्त होणारच. अर्थात अभेद हें तुमचें रूपकाचें लक्षण उत्प्रेक्षा व अपह्नुतींत जाणार आणि मग तुमच्या रूपकलक्षणांत अतिव्याप्तीचा दोष येणारच.)
यावर तुम्ही म्हणाल कीं (असें कसें होईल?) उत्प्रेक्षा ही संभावनारूप असते; मग अभेदरूप असलेल्या रूपकाच्या लक्षणाची तिच्यांत अतिव्याप्ति कशी बरें होईल? यावर आमचें उत्तर असें कीं, रूपकांतील अभेदाचें स्वरूप अमुकच असतें असें ठरविण्यास कांहीं प्रमाण नसल्यानें, तो अभेद, संभाव्यमान अभेद या उत्प्रेक्षेच्या स्वरूपांतही अतिव्याप्त होऊ शकेल. [संभाव्यमान अभेद हे उत्प्रेक्षेचें स्वरूप असल्यानें, विषयावर विषयीची संभावना व अभेद असे उत्प्रेक्षेंत दोन्ही धर्म येतात. अर्थात, उत्प्रेक्षेतं (अभेदरूप) रूपक व उत्प्रेक्षा ह्या दोन अलंकारांचा व्यवहार करण्याचा प्रसंग येऊं लागेल.] यावर तुम्ही म्हणाल कीं, रूपकाच्या लक्षणांतील अभेदाचें रूप स्पष्ट करण्याकरिता त्याला ‘निश्र्चित केला जाणारा’ हें विशेषण द्यावें; म्हणजे ह्या रूपकाच्या लक्षणाची उत्प्रेक्षेंत अतिव्याप्ति होणार नाहीं. पण असें जर तुम्ही म्हणत असाल तर, शेवटीं तुम्ही आमच्या म्हणण्यावरच आला. (कारण कीं, आम्ही सुद्धां निश्र्चित केला जाणारा अभेद, असेंच रूपकाचें लक्षण केलें आहे.)
अशा रीतीचें हें रूपक, प्रथम (१) सावयव (२) निरवयव व (३) परंपरित असें तीन प्रकारचें. ह्यांपैकी पहिल्या प्रकारचें (१) समस्त-वस्तु-विषय (२) एक-देश-विवर्ति, असे दोन पोटभेद होतात. दुसर्या प्रकाराचेही, केवल-रूपक व माला-रूपक असे दोन पोटभेद होतात. तिसर्या प्रकाराचे श्र्लिष्ट-परंपरित व शुद्ध-परंपरित असे दोन पोटप्रकार होऊन, त्यांचें प्रत्येकी, केवल व माला असे दोन उपप्रकार होतात. अशा रीतीनें ह्या तिसर्या प्रकाराचे एकंदर चार उपप्रकार होऊन, एकंदर रूपकाचे आठ प्रकार होतात.
ह्यांपैकीं-
‘‘एकमेकांची अपेक्षा ठेवूनच ज्यांची निष्पत्ति होते अशा रूपकांच्या समूहाला सावयव-रूपक असें म्हणतात. हे सावयव-रूपक ही ज्या ठिकाणीं, सर्व आरोप्यमाण (म्हणजे विषयी) शब्दांनी सांगितले असतील तेथें समस्त-वस्तु-विषय रूपक म्हटलें जातें. आणि ज्या ठिकाणी, (समूहात्मक) रूपकाच्या एखाद्या अवयवांत विषयी शब्दानें सांगितलेला असतो व बाकीच्या अवयवांत तो विषयी अर्थाच बळावर आक्षिप्त असतो, त्या रूपकाला ’एकदेशविवर्ति’ रूपक म्हणतात. कारण कीं, हें रूपक, ज्यांतील विषयी शब्दानें सांगितलेला नसतो अशा अवयव-रूपकाच्या दृष्टीनें, विवर्तन म्ह० आपापलें रूप गुप्त ठेवून, विरूद्ध वर्तन करीत असल्यानें, एकदेशविवर्ति म्हटलें जातें.