“विकसित कमळांच्या समूहावर झेंपावण्यार्या मदमत्त भुंग्यांचा साक्षात् उल्हास; शोकरूपी दावानलानें, ज्यांचीं ह्रदयें व्याकुळ झालीं आहेत अशा अक्रवाकींचे साक्षात् तारणच (दु:खमोचनच); अंध:काराच्या समूहाचा मूर्तिमंत उत्पात; निस्तेज (प्रकाशहीन) डोळ्यांचा पक्षपाताच; असा तेजांचा एक लोळा, उदय पर्वताच्या तटावरून वर येऊन प्रकट झाला.”
ह्या श्लोकांत, उपमेयावर उपमानाचा आरोप नाहीं. प्ण कारणावर कार्याचा आरोप आहे. म्हणूनच येथें रूपक नाहीं असें प्राचीनांचें म्हणणें. ह्या प्राचीनांच्या मताला अनुसरूनच आम्हीही (ह्या प्रकरणाच्या प्रारंभीं) रूपकाचें लक्षन केलें आहे. पण कांहीं उच्छृंखळ लोक जेथें जेथें आरोप असेल तेथें तेथें रूपक असतेंच असें म्हणून, प्रस्तुत श्लोकांत ही रूपक आहे असें म्हणतात, असें आम्ही पूर्वींच सांगितलें आहे.
(आतां एक शंका :---)
“यशरूपी सुवासाला साक्षात् लसूण, शांतिरूपी थंडीत मूर्तिमंत अग्नीच, दयारूपी फुलाला साक्षात् आकाश अशा दुष्ट पुरुषाचें कोण वर्णन करूं शकेल ?”
ह्यांतील उपमानें - लसूण, अग्नि व आकाश हीं; व दुष्ट पुरुष हें उपमेय ह्यामध्यें साधर्म्य तरी कोणतें ? कीं ज्याच्या योगानें ह्याला रूपक म्हणतां येईल ? ह्या शंकेला उत्तर असें :---
वरील श्लोकांत, यश वसुवास, शांति व शैत्य आणि कारुण्य व फूल ह्या जोडयांमधील ताद्र्प्य प्रथम श्लोकांतील शब्दावरून (कर्मधारय समासावरुन) प्रत्यक्ष कळूनच येतें. अणि नंतर (त्यांतूनच) यशोरूप ‘सौरभ्य वगैरेच्या अभावानें युक्त असणें’ हा साधारण धर्म निर्माण होतो (ध्यनांत येतो). (आणि मग त्यावरूनच दुसरें रूपक तयार होतें.) असें असलें तरी, “लसूण व दुष्ट पुरुष ह्या दोघांची ताद्रूप्यसिद्धि झाली असतां, त्यांतील लशुनरूप नसणें या अभावरूप साधारण धर्माच्या बळावर, यशा व सौरभ्य यांचें ताद्रूप्य सिद्ध होतें; आणि दुसर्या बाजूनें प्रथम यश व सौरभ्य ह्या दोहोंच्या ताद्रूप्यांची सिद्धि झाल्यावर त्यामधील यश:सौरभ्यावर नसणें या अभावरूप धर्माच्या बळावर लसूण व दुष्ट पुरुष ह्या दोघांचें ताद्रूप्य सिद्ध होतें; आणि म्हणूनच ह्या ठिकाणीं अन्योन्याश्रय दोष उत्पन्न होतो.” अशी शंका शंकाकाराच्या मनांत येणें स्वाभाविक आहे. पण तशी शंका येऊ देऊ नये. कारण कीं, ह्या येथील सर्व जोडयांतील ताद्रूप्यांची सिद्धि ही कल्पननेंच केली गेली आहे. (त्यामुळें, तिचें समर्थन करण्याची जरूर नाहीं.) आणि कल्पना ही कवीच्या स्वत:च्या प्रतिभेवर अवलम्भून असते. (म्हणून अन्योन्याश्रय दोष तिला बाधक होत नाहीं.) ज्याप्रमाणें गवंडी दोन विटांना एकमेकांचा टेका देऊन, अथवा दोन दगडांना एकमेकांचा टेका देऊन, एका विशिष्ट पद्धतीनें विशिष्ट प्रकारचें घर रचतात, त्याप्रमाणें येथेंहीं समजावे. (म्हणजे वरील रूपकांतील जोडयांपैकीं एक जोडी दुसर्या जोडीची समर्थक आहे असें न मानतां, दोन्ही जोडया एकमेकींच्या आधारावर उभ्या राहतात, असें समजावें. आणि, या गवंडयाच्या गृहरचनेंतील विटांच्या अन्योन्याश्रय जसा कार्यक्षम असल्यामुळें दोष मानीत नाहींत, तसा येथील दोन रूपकांतील अन्योन्याश्र्य, परंपर्तरुपकाच्या सिद्धिचेम कार्य करीत असल्यामुळें, त्याला दोष मानू नये, हा जगन्नाथाचा अभिप्राय.)