“उपमानापेक्षा उपमेयांत विशेष प्रकारचे गुण असल्यानें, त्या (उपमेया) चा होणारा जो उत्कर्ष तो व्यतिरेक.”
प्रतीप वगैरे अलंकारांच्या वारणाकरतां, ‘विशेष प्रकारचे (निराळे) गुण असल्यानें’ अशा अर्थाचें जे तृतीयांत पद घातलें आहे त्या पदाचें तात्पर्य हे कीं, या विशेष गुणामुळें उपमेय उपमानाहून निराळें पडते. म्हणून त्या दोहोंत साम्य आहे, पण वैधर्म्यावर जास्त भर आहे. (म्हणून या पदानें प्रतीपादिकांचें वारण होतें). प्रतीप अलंकारांत उपमेयाला उपमान करणें एवढयाच बाबतींत उपमेयाचा उत्कर्ष असतो. वैधर्म्यामुळें म्हणजे निराळेपणामुळें होणारा उपमेयाचा उत्कर्ष प्रतीपांत नसतो. कारण तेथें (उपमेयाला जरी उपमान बनविलें तरी) साधर्म्य (साद्दश्य) हेंच प्रतीत होतें. बरें, “उपमेय हें उपमानापेक्षा गुणानें अधिक असणें एवढेंच व्यतिरेकाचें स्वरूप आहे, अथवा उप्मानामध्यें उपमेयापेक्षां कमीपणा असणें हेंच व्यतिरेकाचें स्वरूप आहे,” असेंही म्हणतां येत नाहीं. कारण उपमेय हें गुणांनीं अधिक असणें अथवा उपमान हें गुणांनीं कमी असणें, ह्या दोन्हीही गोष्टीत उपमेयाच्या उत्कर्षाचा आक्षेप केल्याशिवाय कांहींच चमत्कार (मजा) नाहीं. (वरील विवेचनावरून हेंही उघड आहे कीं) साद्दश्याचा अभाव एवढेंच व्यतिरेकाचें स्वरूप आहे असेंही म्हणतां येत नाहीं. कारण उपमानापेक्षां उपमेयाचा अपकर्ष (दाखविला) असला तरी सुद्धां, त्या दोहोंत साद्दश्याचा अभाव संभवतो; (अर्थात् साद्दश्याभाव हा उपमेयाच्या अपकर्षामुळेंही संभवत असल्यानें, साद्दश्याभाव हें कांहीं व्यतिरेकाचें विशिष्ट स्वरूप मानता येत नाहीं. शिवाय उपमेय हे उपमानापेक्षां गुणांनीं कमी असणें, ही गोष्ट स्वाभाविकच असल्यानें त्यांत (म्हणजे तें गुणांनीं कमी आहे असें सांगणें यांत) चमत्कार कांहींच नाहीं. (शेवटीं) उपमेयाच्या उत्कर्षानें युक्त होणें हें साद्दश्याभावाचें विशेषण करून त्याला व्यतिरेक अलंकार म्हणणें (अथवा हे व्यतिरेक अलंकाराचे स्वरूप मानणें) हेंच योग्य आहे.
उदाहरण :--- “डोळ्यांच्या रमणीय शोभेनें सर्वद गर्वयुक्त असणार्या तुझ्या तोंडाची, रात्रीं (च फक्त) ज्याच्यांतून भुंगे बाहेर पडतात अशा कमळाशीं, अंशानें तरी आम्हांला कशी बरें तुलना करता येईल ?”
हा व्यतिरेक, (१) उपमेयाचा उत्कर्ष व (२) उपमानाचा अपकर्ष ह्यामुळें होणारें (उपमान - उपमेय ह्यांच्यामधील) वैधर्म्य (म्ह० निराळेपणा,) :--- (१) शब्दांनीं सांगणें, (२) या वैधर्म्यापैकीं पहिलें शब्दानें सांगणें, (३) दुसरें शब्दानें सांगणें, (४) दोन्हीही वैधर्म्ये मुळींच न सांगणें :--- अशारीतीनें चार प्रकारचा असतो. पुन्हां या सर्वांतील (चारांतील) साद्दश्य, श्रौती, आर्थी अथवा आक्षिप्त असल्यास प्रत्येकी तीन प्रकार होऊन एकंदर (व्यतिरेकाचे) बारा प्रकार होतात. पुन्हां या वारा प्रकरांपैकीं प्रत्येकीं श्लेषयुक्त व श्लेषरहित असे दोन दोन प्रकर होत असल्यानें, एकंदर चोवीस प्रकारच व्यतिरेक आहे, असें प्राचीनांचें मत आहे.
‘कुणी अडाणी माणूस, ‘तुझें तोंड चंद्रासारखें आहे’ असें कानाला कडू लागणारें बडबडू लागला तर, त्याला आम्ही तरी काय करणार ? कारण चंद्र कलंकयुक्त आहे आणि तुझें तोंड तर निष्कलंक (स्वच्छ) आहे.”