येथें शंका अशी कीं, हा अलंकार वैधर्म्यावर म्हणजे उपमेय व उपमान यांच्यामधील निराळेपणावर आधारलेला असल्यानें, याला साद्दश्यप्रतिकूल (उपमा - प्रतिकूल) अलंकार म्हणणेंच योग्य आहे, (कारण हा साद्दश्याच्या विरुद्ध असलेल्या निराळेपणावरच आधारलेला आहे). ह्याला उपमागर्भ (म्हणजे उपमा ज्याच्या पोटांत आहे असा) म्हणणें योग्य नाहीं. उपमा ही साधर्म्यावर आधारलेली असते; आणि हा व्यतरेक तर ‘साद्दश्याचा (म्हणजे साधर्म्याचा) निषेध,’ ह्या रूपानेंच अवतीर्ण होतो. (म्हणजे अस्तित्वांत येतो.) “मग बिघडलें कुठें ? आम्हाला ही अडचण इष्टच आहे.” असेंही सिद्धांत्याला म्हणतां येणार नाहीं. कारण मग व्यतिरेक हा उपमेवर आधारलेला आहे, या आलंकारिकांच्या) सिद्धांताचा भंग होण्याचा प्रसंग येईल.”
(या शंकेवर आमचें उत्तर :--- ) खरें आहे; उपमानाच्य, उपमेयाच्या ठिकाणीं असणार्या साद्दश्याचा, ज्या गुणाला पुढें करून निषेढ केला जातो व त्या निषेधाचें पर्यवसान उपमेयाचा उत्कर्ष स्थापन करण्यांत होतो, त्या गुणानें (म्हणजे त्या गुणला पुढेम करून) उपमानाचें उपमेयाच्या ठिकाणीं साद्दश्य स्थापित करतां येत नाहीं (हें खरें); पण, वरील गुणाहून निराळा गुण (धर्म) घेऊन या दोहोंत साद्दश्याची जी प्रतीति होते, तिला दूर लोटता येणें कठीण आहे. अशा साद्दश्यनिषेधस्थलीं, अजिबात
सर्वसामान्य साद्दश्याचाही निषेध करायचा असतां तर, अमुक एक विशिष्ट गुण पुढें करून निषेध करण्याचें कांहीं कारण नव्हतें, ‘हा माणूस त्या माणसापेक्षां धनाच्या बाबतींत अधिक आहे’ असें म्हटले म्हणजे (बाकीच्या) विद्या रूप कुल वगैरे बाबतींत हा माणूस त्या माणसासारखा आहे, असा प्रत्यय सर्व लोकांना येतो. (फक्त फरक एवढाच कीं व्यतिरेकंत) साद्दश्य सूचित होत असलें तरी, तें साद्दश्य निराळ्या गुणानें होणार्या साद्दश्याच्या निषेधावर उभारलेल्या उपमेयाच्या उत्कर्षामुळें, अगदींच फिक्कें पडतें; त्या साद्दश्याला बंदींत टाकल्यासारखें होतें, व त्यामुळें तें विशेष प्रकारचा चमत्कार उत्पन्न करू शकत नाहीं; असा या बाबतींत प्राचीनांचा अभिप्राय आहे. ह्या अलंकारांत कुठें कुठें शब्दानें केलेल्या साद्दश्यनिषेधानें उपमेयाचा उत्कर्ष व उपमानाचा अपकर्ष हे आक्षिप्त होतात. तर कुठें, शब्दानें सांगितलेल्या उपमेयाच्या उत्कर्षानें उपमानाचा अपकर्ष व साद्दश्याचा अभाव ह्या दोहोंचा आक्षेप होतो; व कुठें शब्दानें सांगितलेल्या उपमानाच्या अपकर्षाणें, उपमेयाचा उत्कर्ष व साद्दश्याचा अभाव यांचा आक्षेप होतो व चमत्कार उत्पन्ना होतो या प्रकरांपैकीं पहिल्या प्रकाराचीं व त्याच्या पोटभेदांचीं, प्राचीनांच्या पद्धतीला अनुसरून, उदहारणें दिलीं. दुसर्या व तिसर्या प्रकाराचें, बहुतेक पहिल्या प्रकारासारखेच पोटभेद आहेत. ह्या दोन प्रकरांचीं चुकूक म्हणून कांहि उदाहरणे देतो :----
“हे सखि ! कलंकानें मलिन असलेल्या चंद्रापेक्षां तुझें निर्मळ तोंड गुणांनीं अधिक आहे. (आणि) अत्यंत माधुर्य (चोहोंकडे) पसविणार्या तुज्या ओठांपेक्षां, ज्यांताला रस गुप्त आहे आसा कवींच्या वाणी कमी दर्जाच्या आहेत.”