आतां, उपमेयाच्या अपकर्षावर आधारलेला येथें व्यतिरेक आहे हा दुसरा पक्षही योग्य नाहीं; कारण उपमेयाचा अपकर्ष म्हणायचा आणि तो अनुभयपर्यवसायी म्हणायचा ह्या बोलण्यांतच असंगति आहे, शिवाय उपमेयाच्या अपकर्षावर आधारलेल्या व्यतिरेकांत मजाही नाहीं. (चमत्कारच नाहीं.)
 एकंदरींत काय कीं, या ठिकाणीं (द्दढतर ० यांत) गम्य उपमाच चपखळ बसते (सुप्रतिष्ठिता). बस, पुरे झालें हें खोटया नाण्याला उघडें करून दाखविणें. आतां चालू गोष्टीकडे वळूं या.
हा व्यतिरेक दुसर्‍या अलंकाराच्या आधारावरही उभा राहतो.
उदाहरण :---
“ब्रम्हदेव नुसता शंकरासारखा; पण ह्याचा (म्ह० प्रस्तुत नायकाचा) पिता साक्षात शंकर आहे; लक्ष्मी
(नुसती) पार्वतीसारखी; पण (ह्याची) माता जगांत मातेसारखीच. ह्याचा पिता काष्ठासारखा (लाकडासारखा) तर हा स्वत: (त्या लाकडांतील) अग्निसारखा.”
ह्या दीड  श्लोकांत, ‘साक्षान् महेश्वर:’ हे रूपक,  माता मातु:समा हा अनन्वय, व पावकसंनिभ: ही उपमा.  हे तिन्ही अलंकार अनुक्रमें पिता, माता व स्वत: या उपमेयांच्या उत्कर्षाचें कारण आहेत व ईश्वरेण समो ब्रम्हा, पार्वत्या सद्दशी लक्ष्मी:  व पिता काष्ठसद्दश: ह्या  तीन उपमा, ब्रम्हा, लक्ष्मी व काष्ठ ह्या तीन उपमानांच्या अपकर्षाचें कारण आहेत.
हा अलंकार साद्दयगर्भ  असल्यानें व साद्दश्य हें अनुगामी, बिबप्रतिबिंबभावापन्न व शुद्ध साधारणरुप या तीन प्रकारच्या धर्मांचीं उभे राहत असल्यानें,  या व्यतिरेकांतही धर्माचे हे तीन प्रकार येतात असें समजावें. पैकीं अनुगामी धर्म असतांना होणार्‍या व्यतिरेकाचें उदाहरण हें :---
“तांबडें पोवळें व अति लुसलुशीत असें कोवळें पान ह्या दोघांना तुझा ओठ, अत्यंत मधुर असल्यानें, खाली पहायला लावतो.”  येथें तांबडेपणा व लुसलुशीतपणा हे दोन धर्म (उपमेय व दोन उपमाने ह्यांना) अनुगामी आहेत. बिंबप्रतिबिंबभावापन्न साधारणधर्म असणार्‍या व्यतिरेकाचे उदाहरण, ‘जलजं ललितविकासं सुंदरहासं तवाननं हसति’ (सुंदर हास्ययुक्त तुझें तोंड सुंदर कमळाला तुच्छ लेखतें). येथें हास व विकास हे दोन धर्म बिंबप्रतिबिंबभावानें एक होऊन त्यांचा एक साधारण धर्म झाला आहे. ललितत्व व सुंदरत्व हे दोन धर्म मात्र शुद्ध साधारणधर्म आहेत. जलज ह्या शब्दावर श्लेष करून जडजत्व (जडापासून उत्पन्न होणें) हा जो धर्म निघतो तो, उपमानगत असून स्वत:च्या आश्रयाचा म्ह० जलजाचा - (कमळाचा) म्ह० उपमानाचा अपकर्ष दाखवितो (तो धर्म उपमानापकर्षाचें कारण आहे).
अशा रीतीनें (आतांपर्यंत) साद्दश्याच्या निषेधानें युक्त असा व्यतिरेक सांगितला. पण अभेदाच्या निषेधानें युक्त ही हा असू शकतो. उदा :---
“हे निष्कलंक ( १ दोषरहित, २ कलंक असणार्‍या चंद्राशी विरुद्ध) निरांतक ( १ पीडारहित २. ग्रहणाने ग्रास ज्याचा होतो अशा चंद्राशी विरुद्ध) चौसष्ट कलांत प्रवीण (केवळ सोळा कळा असणार्‍या चंद्राहून श्रेष्ठ) व नेहमीं धनानें संपूर्ण  (कृष्ण पक्षांत क्षीण होणार्‍या चंद्राशी विरुद्ध) अशा राजा ! तूं चंद्र आहेस हें बोलणें खोटें.

येथे रसगंगाधरांतील व्यतिरेक प्रकरण समाप्त झालें.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP