आतां अलंकारसर्वस्वकारांचीच री ओढणारे (त्यांच्याच अभिप्रायाचा अनुवाद करणारे) जे कुवलयानंदकर त्यांनीं, न्यूनगुण उपमेय असतांना होणार्या व्यतिरेकाचें :---
“हे अशोका ! तू नव्या पालवीनें तांबडा आहेस (रक्त :--- १ तांबडा व २ प्रेमी) व मीही प्रशंसनीय अशा माझ्या प्रियेच्या गुणांवर प्रेम करणारा आहे. तुझ्याकडे भुंगें येतात; (शिलीमुख :--- (१) भुंगे २ बाण) व माझ्याकडेही मदनाच्या धनुष्यांतून सुटलेले बाण येतात; प्रियेनें मारलेल्या लाथेनें तुला आनंद होतो तसा मलाही होतो. आपलें दोघांचें सगळेच सारखें आहे - फक्त (तूं) अ - शोक = (म्ह० शोकरहित) आहेस, व मला विधात्यानें सशोक (म्हणजे शोकयुक्त,) केलें आहे.” हें उदाहरण देऊन,
“या ठिकाणीं (वक्ता) सशोक असल्यानें, अशोकाहून त्याचा (म्ह० उपमेयाचा) अपकर्ष शेवटीं प्रतीत होतो” असें म्हटलें आहे; तेंही चिंत्य आहे (चूक आहे.). प्रेमलीलांना अनुकूल म्हणून एखाद्या स्त्रीच्या अंगावरचे दागिनें काढून टाकणें, हें जसें तिच्या विशेष प्रकारच्या शोभेला कारण होतें; त्याप्रमाणें प्रस्तुत श्लोकांत, उपमा अलंकार काढून टाकणें हेंच फक्त, प्रस्तुत श्लोकांतील (विप्रलंभशॄंगार) रसाला अनुकूल नसल्यने< रमणीय़ नाहीं. ‘उपमा नसणें’ ह्याला असमालंकार म्हणून स्वतंत्र निराळा अलंकार प्राचीन आलंकारिक मानींत, नाहीं, त्याचें तरी कारण हेंच पण, तसें नसेल (म्ह० ‘उपमा नसणें’ ह्याला असमालंकार म्हणून स्वतंत्र निराळा अलंकार प्राचीन आलंकारिक मानीत नाहींत, त्याचें तरी कारण हेंच पण, तसें नसेल (म्ह० ‘उपमा नसणें’ ह्याला स्वतंत्रपणें रमणीय न मानले) तर तुम्हांलाही ‘उपमा नसणें’ ह्याला (त्याच्या रमणीयत्वामुळें) दुसरा एक अलंकार म्हणून स्वीकार करण्याची वेळ येईल. उदा० :---
“मानवन, देव व दानव यांनीं भरलेल्या ह्या सार्या त्रिभुवनांतही, हे राजा ! ज्याच्याशीं तुझी तुलना करतां येईल, असा कुणीही पुढें होणार नाहीं, आज नाहीं, व पूर्वींही झाला नाहीं.” (येथें असमालंकार मानण्याचा प्रसंग येईल.)
म्हणूनच (म्ह० अशा ठिकाणीं एकादा निराळा अलंकार मानण्याचें कारण नसल्यामुळें) सह्रदयांचे धुरंधर ध्वनिकार (आनंदवर्धनाचार्य) यांनीं, “चांगल्या कवीनें रसाला अनुकूल होईल अशा रीतीनें, कुठें अलंकार काव्यांत घालावें व कुठें काढून टाकावें” असें म्हणून ‘रक्तस्त्वं०’ हा श्लोक, ‘साद्दश्य दूर करणें’ ह्या प्रकाराचें उदाहरण म्हणून, दिला आहे. आणि याच कारणकरतां मम्मटभट्टांनीही “उपमेयाचें उपमानाहून केवळ आधिक्य (जास्त गुण असणें) म्हणजेच व्यतिरेक” असें म्हणलें आहे, व व्यतिरेकांत उपमेयाचें न्यूनत्वही चालतें ह्या मताचें खंडन केलें आहे. (व्यतिरेकांत उपमेयाचे न्यूनत्व काढून टाकलें आहे.). यावरून सिद्ध झालें कीं, उपमानाहून उपमेयाचें आधिक्या (उत्कर्ष) असेल तरच, व्यतिरेकालंकार होतो; अपकर्ष असेल तर व्यतिरेक ह्ते नाहीं. आतां न्यूनत्व असूनही व्यतिरेक होतो असा आग्रहच असेल तर अशा व्यतिरेकाचें हे उदाहरण द्यावें :---
“केवळ पृथ्वीचें रक्षण करणारा व दोन डोळ्याचा असा तूं हे राजा ! सार्या त्रैलोक्यचें रक्षण करण्याचें व्रत घेतलेल्या व हजार डोळ्यांच्या इन्द्राशीं तुलना कसा पावशील ?”
येथें रक्षण करणें व डोळे या दोन बाबतींतच तूं इंद्रहून कमी आहेस, बाकीच्या धर्मांचे बाबतींत इंद्रासारखाच आहेस, अशा प्रतीतीनें उत्पन्न होणार्या विशेष चमत्कारामुळें, येथे (व्यतिरेक) अलंकार झाला आहे. तेव्हां अशा तर्हेचा उपमेयाचा अपकर्ष व्यतिरेकाच्या लक्षणांत घालावा. आतां कुवल्यानंदकारांनीं उपमेयाचा उत्कर्ष व अपकर्ष ह्या दोन्हीवरही शेवट न होणार्या (दोन्हीही नसण्यांत शेवट होणार्या) वतिरेकाचें उदाहरण म्हणून :---
“ज्याची मूठ बळकट आहे ( १ जो कृपण आहे. व २ ज्या तरवारीची मूठ मजबूत आहे), जो आपल्या पैशाच्या खजिन्यावर (नेहमी) बसलेला असतो. (१ जो आपला खजिना मांडीखालीं घालून बसतो. २ जी तरवार म्यानेंत असते,) जो स्वभावानें दुष्ट असतो (तरवारीकडे :--- जीं ज्यात्याच काळी असते) अशा कृपणाचा व (अशा) तरवारीचा केवळ आकारांतच (म्ह० आकृतींतच) व कृपण ह्यांतील ‘प’ मध्ये अकार आहे तर कृपाण ह्यांतील ‘पा’ त आकार आहे, या बाबतींत भेद आहे.” हा श्लोक दिला आहे.
(यावर आमचे कुवलयानंदकरांना म्हणणें असें कीं) हे उदाहरण देण्यांत अपाण फारसे सूक्ष्म द्दष्टीनें पाहिलेलें (दिसत) नाहीं. कसें तें बघा :--- ह्या ठिकाणीं उपमनाहून उपमेयाचा उत्कर्ष असणारा व्यतिरेक दोहोंतही शेवट न होणारा (अनुभयपर्यवसायी) आहे, का सर्वस्वकारांनीं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणें अपकर्षरूप व्यतिरेक येथें अनुभयपर्यवसायी आहे ? पहिला पक्ष (म्ह० उत्कर्षरूप व्यतिरेक हा अनुभयपर्यवसायी असणें) शक्य नाहीं; कारण उपमेयाच्या उत्कर्षाला कारण असा धर्मच या श्लोकांत प्रतीत होत नाहीं. तुम्ही म्हणाल. “श्लोषाच्या योगानें - ‘आकार’ ह्या शब्दांतून आकार हा अर्थ व दीर्घ ‘आ’ ह्या आक्षराची उपस्थिति येथें होतेच; (मग उत्कर्ष दाखविणारा धर्म नाहीं असें कसें म्हणतां ?)” पण, असें म्हणतां येणार नाहीं; :--- कारण ‘आ’ हे अक्षर (‘अ’ पेक्षां आधिक असल्यानें त्यानें युक्त असणार्या धर्मीचा तें उत्कर्ष दाखवीत असले तरी,) या श्लोकांत उपमानांत असल्यानें, (म्ह० कृपाण ह्या उपमानांतच ‘आ’ चे आधिक्य असल्यानें) तो ‘आ’ कार उपमेयाचा उत्कर्ष दाखवूं सकत नाहीं. शिवाय (आकृति हा आकाराचा अर्थ घेऊन तो आकार उपमेयांत म्ह० कृपणांत मोठा असल्यानें येथें त्या धर्मानें उपमेयाचा उत्कर्ष दाखविला आहे. असें म्हणाल तर) ‘आ’ कार व आकार ह्या दोन अर्थांचें, ह्या ठिकाणीं श्लेषमूलक अभेदाध्यवसान केले असल्यानें, एकरूप (अभिन्न) झालेले ते दोन्हीही अर्थ (धर्म) उपमेय व उपमान ह्यांना साधारण आहेत; (मग त्यापैकीं फक्त उपमेयांतच आकाररूपी अर्थ (धर्म) आहे असें कसें म्हणतां येईल ?) आणि श्लेषमूलक अभेदाध्यवसान मानायचें नसेल तर, श्लेषमूलक उपमेचा लोप होण्याची वेळ येईल; कारण ‘चंद्रबिम्बमिव नगरं सकलकलम्’ (हें नगर चंद्राप्रमाणें सकलकल [(१) कलकलाटानें युक्त व (२) चंद्र सकलकलांनीं युक्त आहे.] या श्लोकांतही कलकलेनें युक्त असणें व सकलकलांनीं युक्त असणें हे दोन्ही धर्म वास्तविक निराळे आहेत. (तेव्हां त्यांना अभेदाध्यवसायानें) एक करून त्यांचा साधारणर्धम बनविल्याशिवाय येथें उपमा होऊंच शकत नाहीं). “सकलकलम् ० या ठिकाणीं दोन भिन्न धर्म एक करून उपमा करण्यावरच कवीचा भर आहे; पण प्रकृत ‘द्दषतर ०’ यांत भेद असा शब्द असल्यानें, दोन धर्मांचा निराळेपणा दाखाविण्यावर कवीचा भर आहे,” अशी (ही) भ्रान्ती करुन घेऊ नये; कारण उपमा (साद्दश्य) तोडून टाकणार्या व्यतिरेकावर येथें कवीचा भर असता तर ‘आकार’ ह्या शब्दावरील श्लेष निरर्थकच झाला असता; आणि मग (कवीला व्यतिरेक करायचा असता तर) त्यानें, कृपण व कृपाण याचा भेद दीर्घ ‘आ’ या अक्षरामुळेंच होतो, असें म्हटलें असतें. ह्या ठिकाणीं श्लेष व्यतिरेकाला अनुकूल नाहीं, इतकेंच नव्हे तर उलट प्रतिकूल आहे. हा श्लेष उपमेला मात्र अनुकूल आहे. दीर्घ अक्षररुपी निराळेपणा उपमेला प्रतिकूल असला तरी, श्लेषमूलक अभेदाध्यवसायानें त्याचें (अक्षरत्वाचें) व आकृति या अर्थाचें ऐक्य (अभे) केल्यानें, तो (आकारभेद) उपमेय व उपमान या दोहोनाही साधारण धर्म झाला आहे. आणि ‘आकृतिभेद’ हा तर उपमेय व उपमान या दोहोंनाही साधारण धर्म झाला आहे. आणि ‘आकारभेद’ हा तर उपमेय व उपमान या दोहोंतही आहे. (मग निराळेपणा दाखविणारा धर्म राहिला कुठें ?) (खरें म्हणजे) ह्या श्लोकांत कवीचा आशय हा आहे कीं :--- कृपण मनुष्य व कृपाण (तलवार) या दोहोंत सारखेपणा आहे; कारण दोहोंतही ‘द्दढतरनिबद्ध ०’ वगैरे धर्म (सारखेच) आहेत. फक्त अक्षराच्या बाबतींत फरक आहे; पण तो आकाराचा भेद या स्वरूपाचा असल्यानें उपमेला मुळींच विरुद्ध नाहीं, हें सह्रदयांनीं ध्यानांत घ्यावें.