आतां अलंकारसर्वस्वकारांनीं. “उपमानापेक्षां उपमेयाचा कमीपणा असला तरी सुद्धां व्यतिरेक होतो; कारण उपमान व उपमेय यांच्यांत नुसता निराळेपणा असणें म्हणजेच व्यतिरेक अलंकार,” असें म्हणून खालील उदाहरण दिलें आहे :---
“खरोखर, दिवसेंदिवस कृश होणरा चंद्र, पुन्हांपुन्हां वाढत जातो; हे सुंदरी ! थांबव (तुझा रुसवा); प्रसन्न हो; पुन्हां कधींही परतून न येणारें तरुणपण ९एकदां गेलें कीं) गेलें.” आणी यावर टीका करतांना विमर्शिनीकरांनीं पूर्वपक्ष व सिद्धांत मांडून असें विवरण केलें आहे :---
“कुणी म्हणतील - ‘उपमानाहून उपमेयाचा कमीपणा असणें हा व्यतिरेक हें येथील म्हणणें योग्य नाहीं; कारण, उपमेयाचा कमीपणा हा खरोखरीचा असतोच, तेव्हां त्यांत (म्हणजे तसें वर्णन करण्यांत) चमत्कार कांहींच नाहीं. तेव्हां येथें यौवनाचें अस्थिरत्व (म्हणजे तरुणपण कायम न टिकणें) सांगायचें असल्यानें त्या अस्थिरत्वाच्या बाबतींत, तें यौवन, चंद्रापेक्षां वरचढ (अधिक गुण) आहे हें या श्लोकांत सांगावयाचें आहे; म्हणजे असें कीं हें यौवन चंद्राप्रमाणें गेलें कीं (चंद्र पुन्हां येतो पण हें) पुन्हं परत येत नाहीं.” हें (पूर्वपक्षाचें) म्हणणें चूक आहे. याचें कारण असें ( आतां विमर्शिनीकार स्वत: सिद्धांत सांगतात :--- ) कीं, ह्या श्लोकांत, “चंद्राप्रमाणें गेलेलें यौवन पुन्हां परत येत असतें तर नायिकेचा, प्रियकराच्या ठिकाणचा रुसवा वगैरे जास्त वेळ चालविणें योग्य झालें असतें. पण हें बेटें (हत) यौवन, एकदां गेलें कीं, पुन्हां येत नाहीं; म्हणूनच रुसवा वगैरे विघ्नें दूर सारून व प्रियकराच्या जवळ राहून तूं (म्हणजे नायिकेनें) आपला जन्म सफल करणें योग्य आहे. आग लागो (धिक्) तुझ्या या रुसव्या फुगव्याला. प्रियकाराविषयींचा तुझा रुसवा सोडून दे; प्रसन्न हो.” असा येथें मैत्रिणीचा नायिकेला उपदेश असतां, प्रियकराविषयींचा राग शांत करण्याला चंहाहून, यौवनाचें पुन्हाम परत न येणें हा कमीपणा, सांगणेंच इष्ट आहे. म्हणून या ठिकाणीं उपमेयाच्या न्य़ूनत्वालाही व्यतिरेक मानलें पाहिजे.”
वरील अलंकारसर्वस्वकारांचें म्हणणें व त्यावरील विमर्शिनीकारांचें विवरण हीं दोन्हींही सपशेल चुकीचीं आहेत. (कसें तें पहा :---) नायिकेचें प्रिय व हित साधू पाहणार्या मैत्रिणीच्या या उक्तींत, यौवनाला चंद्रापेक्षां अधिक गुणाचें सांगणेंच (कवीला) इष्ट आहे. यौवनाचें न्य़ूनगुणत्व (कमीपणा) येथें सांगायचें नाहीं; कारण “या जगांत चंद्र हा पुन्हांपुन्हां (दर महिन्यांत) परत येत असल्यानेम सहज मिळण्यासारखा अहे. व म्हणूनच त्याचें (यौवनाइतकें) माहत्म्य नाहीं. पण हें यौवन मात्र एकदां गेलें कीं पुन्हाम केंव्हांही परत येत नसयानें फारच दुर्मिळ (महाग) आहे व म्हणूनच तें अत्यंत उत्कृष्ट प्रकारचें (अत्यंत मूल्यवान) आहे; तेव्हां रुसवा, फुगवा वगैरे लबाड माणसांना चांगलीं वाटणारीं विघ्नें, मधेंच आणून, तुझ्यासारख्या चतुर स्त्रीनें (म्हणजे नायिकेनें) हें यौवन फुकट दवडनें योग्य नाहीं.” (स मैत्रिणीचा अभिप्राय असल्यामुळें) असें, ‘अनिवर्तित्व’ (पुन्हां परत न येणें) ह्या, श्लोकांत आलेल्या गुणामुळें सूचित होणारें यौवनाचें उत्कृष्टत्व, स्पष्टपणेंच सिध होत आहे. या श्लोकांत यौवनाचें, ‘सर्व सुखांचें मूळ कारण’ इ० गुण सांगितलेले
नाहींत, तरी त्या (अनुपात्त) गुणांनीं होणारा यौवनाचा उत्कर्षही, येथें वाक्यार्थाला खुलविण्याकरतां, सह्रदयांच्या ह्रदयांत अवश्य येतो. (पण अनिवर्तित्व हा यौवनाचा कमी दर्जाचा गुण मानला तर) ‘असल्या (हनि गुणानें युक्त), रद्दी यौवनाचा मी कशाला रुसवा सोडूं - जाऊं दे कीं हें जौवन वाया,’ असा प्रतिकूल अर्थ प्रतीत होऊं लागेल; व त्यामुळें प्रकृत अर्थाचा बिघाड होण्याची पाळी येईल (असो०. या शिवाय जेथें कुठें उपमेयाचा अपकर्ष शब्दानें सांगितला असेल, तेथेंसुद्धां तो उपमेयाचा अपकर्ष, अशा वाक्यार्थांचा शेवट उपमेयाच्या उत्कर्षांत होत असल्यानें, उत्कर्षरूपानेंच परिणत होतो. उदा) :---
“निरपराधी लोकांचा केलेला द्रोह (घात) या जगांत हालाहल विषाहून कमी दर्जाचा आहे; कारण हा द्रोह सबंध कुळाला ठार करतो; अण हालहल फक्त खाणारालाच ठार मारते.”
या ठिकाणीं ‘हीन’ या मुळांतील शब्दानें, उपमेयाचा अपकर्ष सांगितला असला तरी, त्याचें, ‘भयंकरपण’ या अधिक गुणानें होणार्या उत्कर्षांत, रूपांतर होतें. अशाच रीतीनें,
“चंद्र हाच अत्यंत उत्कृष्ट; कारण तो क्षीण झाला तरी पुन्हां पुन्हां वाढतो; पण हे कृशांगी ! आग लागो या यौवनाला, कारण हे एकदा ओसरलें कीं पुन्हां परतच येत नाहीं.”
या ठिकाणीं, यौवनाचा अनिवर्तित्व हा जो धर्म सांगितला आहे तो, रुसण्याला प्रतिकूल असल्यानें, द्वेषाचा विषय होतो; व म्हणूनच त्याचा (श्लोकांत) धिक्कार केला आहे. खरोखरीचेंच तें अनिवर्तित्व कमी दर्जाचें आहे म्हणून कांहीं त्याचा धिक्कार केलेला नाहीं; शिवाय प्रियकाराच्या समागमाला पोषक असा त्यांत (म्हणजे अनिवर्तिंत्व या धर्मांत) दुर्लभत्वरूपी उत्कर्षही स्पष्टच आहे.