श्लेष अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“एकदांच उच्चारलेल्या एका शब्दानें अनेक अर्थ सांगणें हा श्लेष.” तो दोन प्रकारचा :--- एक, अनेक (विशेषणांनीं सांगितल्या जाणार्या) धर्मांच्या पुरस्कारानें होणारा, (म्ह० अनेक धर्माचें भान करून देऊन होणारा) व दुसरा एक धर्माच्या पुरस्कारानें होणारा (म्ह० एक धर्माचें भान करून देऊन होणारा). पहिल्या प्रकाराचे पुन्हां दोन प्रकार :--- अनेक शब्दांचें भान करण्याच्या द्वारानें होणारा, व एक शब्दाच्या भानाच्या द्वारा होणारा. अशारीतीनें एकंदर तीन प्रकाराचा श्लेष होतो. (अनेकधर्मपुरस्काराचे दोन प्रकार व एकधर्मपुरस्काराचा एक प्रकार मिळून तीन प्रकारचा.) यांपैकीं पहिल्या प्रकाराला (म्ह० अनेक शब्दांच्या भानाच्या द्वारा अनेक धर्मांच्या पुरस्कारानें होणार्या श्लेषाला) सभंग श्लेष असें म्हणतात; व दुसर्या (म्ह० एक शब्दाच्या भानाच्या द्वारा अनेक धर्मांच्या पुरस्कारनें होणार्या) श्लेषाला अभंग श्लेष असें म्हणतात. तिसर्या (म्ह० एक धर्माच्या पुरस्कारानें होणार्या प्रकाराच्या) श्लेषाला शुद्ध श्लेष (म्ह० अर्थश्लेष) म्हणतात. असा हा तीन प्रकारचा श्लेष (१) केवळ प्रकृत (२) केवळ अप्रकृत व (३) प्रकृत व अप्रकृत अशा उभय अर्थांचा आश्रय करीत असल्यानें, पुन्हां तीन प्रकाराचा होतो. पैकीं पहिल्या व दुसर्या प्रकारांत, (म्ह० केवळ प्रकृताच्या आश्रयानें व केवळ अप्रकृताच्या आश्रयानें होणार्या) श्लेषांत विशेष्य श्लिष्ट असण्याच्या बाबतींत कांहीं एक नियम नाहीं. (म्ह० मर्जीला येईल त्याप्रमाणें, विशेष्य श्लिष्ट करावें, अथवा करू नये.) तिसर्या प्रकारामध्यें मात्र (म्ह० प्रकृत व अप्रकृत अशा दोन अर्थांचा आश्रय घेऊन होणार्या श्लेषांत मात्र) विशेषणवाचक पदेंच फक्त श्लिष्ट असलीं पाहिजेत; विशेष्यवाचक पदें या प्रकारांत श्लिष्ट असता कामा नये. कारण या तिसर्या प्रकारांत, विशेषणाबरोबर विशेष्यवाचक पदेंही श्लिष्ट असल्यास शब्दशक्तिमूलक ध्वनीचा उच्छेद होण्याची वेळ येईल. आतां, केवळ विशेषणांची श्लिष्टता असणार्या प्रकारांतही प्रकृत व अप्रकृत हे दोन्ही धर्मी, वाक्यांत सांगितले असले तरच श्लेष अलंकार होतो. पण केवळ प्रकृत धर्मीच वाक्याअंत सांगितला असेल तर तो समासोक्तीचाच विषय होतो. अशारीतीनें, प्रकृत मात्र (म्ह० केवळ प्रकृत) विशेष्ये म्ह० धर्मी ज्यांत आहेत, व अनेक अर्थांचीं विशेषणें ज्यांत आहेत असा श्लेषाचा पहिला प्रकार. तसेंच केवळ अप्रकृत विशेष्येंच ज्यांत आहेत, व अनेकार्थक विशेषणें ज्यांत आहेत, असा दुसरा प्रकार. व ज्यांत प्रकृत व अप्रकृत अशीं दोन्हींही विशेष्यें निराळीं शब्दांनीं सांगितलेलीं आहेत, व ज्यांतील विशेषणें नानार्थक आहेत असा तिसरा प्रकार :--- यांपैकीं कोणताही एक प्रकार असणें म्ह० श्लेष, असा वरील लक्षणाचा, शेवटीं अर्थ होतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP