दुसरे कांहीं लोक याबाबतींत असें म्हणतात :--- ‘अलंकार हे मुख्यत: ज्या स्वरूपानें चमत्कार उत्पन्न करतात, त्या स्वरूपानेंच, त्यांना अलंकारांचें नांव मिळतें. पण ते अलंकार दुसर्या अलंकारावर उपकार करण्याकरतांच आले असतील तर ते आपलें स्वत:चें नांव टाकून देतात. उदा० :--- ‘रराज भूमौ वदनं मृगाक्ष्या: । नभोविभागे हरिणाङकबिम्बम् ॥’ इ० (पृथ्वीवर त्या मृगनयनेचें मुख शोभलें; आणि आकाशाच्या एका भागांत, चंद्रबिम्ब शोभलें.) ठिकाणीं प्रकृताचा व अप्रकृताचा एक धर्माशीं संबंध येणें ह्या विशिष्ट स्वरूपामुळें, या अलंकाराला दीकक असें नांव मिळालें. पण ‘राजते वदनं तन्व्या नभसीव निशाकर: ।’ (आकाशांत ज्याप्रमाणें चंद्र, त्याप्रमाणें त्या सुंदरीचें मुख शोभते) या ठिकाणीं, तो अलंकार आपलें स्वत:चें दीपक हें विशिष्ट नांव टाकून देतो, (व उपमा हें नांव धारण करतो) म्हणूनच म्हटलें आहे कीं, ‘प्राधान्यानें (म्ह० प्रधान गुणावरूनच वस्तूंचीं) नांवे पडतात.’ अशा रीतीनें श्लेष दुसर्या अलंकाराव उपकार करण्याकरितां आला असेल तर तो स्वत:च्या घरीं (म्हणजे स्वत:च्या स्वतंत्र क्षेत्रांत) असतांना ज्याप्रमाणें श्लेष (अलंकार) या नांवाला धारण करण्यास समर्थ होतो, त्याप्रमाणें येथें समर्थ होणार नाहीं; अशा (परक्या) ठिकाणीं श्लेषाचा जवळजवळ बाधच होईल,’ असें या लोकांचें म्हणणें.
अशा रीतीनें, संक्षेपानें श्लेषाची सरणि दाखविली; पण ज्या ठिकाणीं प्रकृत व अप्रकृत अशीं दोन्हींही विशेष्यें एकच श्लिष्ट शब्दानें सांगितलीं जातात, त्या ठिकाणीं, ध्वनीचाच विषय असतो असें आम्ही पूर्वीं सांगितलेंच आहे.
याचें उदाहरण :---
“सतत गळणार्या दानोदकाच्या (म्ह० दान देतांना सोडलेल्या उदकाच्या) धारांनीं (वर्षावानें) ज्यानें जमीन भिजवून टाकली आहेव दात्यांच्या अग्रभागीं ज्याची मूर्ति पूजिली जाते, असा हा सार्वभौम राजा अत्यंत जयशाली आहे.” (हा एक अर्थ राजाविषयींचा.) आतां याच श्लोकाचा दुसरा अर्थ (दिग्गजाला लागू पडणारा असा :---)
“सतत गळणार्या मदाच्या धारांनीं ज्यनें जमीन भिजवून टाकली आहे, व कुबेराच्या अग्रागीं ज्याच्या मूर्तीचें पूजन होतें, असा उत्तर देशाचा रक्षक, सार्वभौम या नांवाचा दिग्गज, अत्यंत जयशाली आहे.”
या श्लोकांत, राजा प्रस्तुत असतां, उत्तर दिशेचा, सार्वभौम नांवाचा गज अप्रस्तुत असतांनाही, व्यंजनेच्या योगानें त्याची प्रतीति होते. या ठिकाणीं, सर्वस्वीं अप्रस्तुत अर्थ सांगण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून, प्रस्तु व अप्रस्तुत या दोन्ही अर्थांचं उपमानउपमेयभावांत तात्पर्य आहे, अशी कल्पना केली जाते, यालाच शब्दशक्तिमूल्लक (अनुरणनरूप) ध्वनि म्हणतात. याचें उदाहरण ध्वनिकारांनीं खालीलप्रमाणें दिलें आहे :---
“जो पुष्ट आहे, ज्याच्यावर हार रुळत आहे, कालागुरूनें (काळ्या चंदनानें) किंचित मलिन दिसणारा आहे, अशा तिच्या स्तनभारानें कुणाला उत्सुक केलें नाहीं ?” (याच श्लोकाचा दुसरा दुसरा अर्थ हा: :---)