श्लेष अलंकार - लक्षण ११
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या ठिकाणीं हें लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, ‘रागावृतो वल्गुकराभिमृष्टं श्यामामुखं चुम्बति चारु चंद्र:’ (तांबडया रंगानें भरलेला असा चंद्र आपल्या सुंदर किरणांनीं स्पर्शिलेल्या रात्रीच्या सुंदर प्रारंभाला (श्यामामुखं) चिकटतो. (हा एक अर्थ व याच ठिकाणीं “प्रेमानें पूर्ण असा नायक आपल्या सुंदर हातानें स्पर्शिलेलें सुंदरीचें मुख चुंबितो” हा दुसरा अर्थ.)
ह्या ठिकाणीं समासोक्ति आहे, याविषयीं वादच नाहीं. असेंच (येथें) ‘चंद्र’ पदाच्या ऐवजीं ‘राजा’ असें पद घातलें तर, शब्दशक्तिमूलाध्वनि होतो हेंही निर्विवाद. (प्राचीनांच्या मतें.) तेव्हां या दोन्हीही ठिकाणीं (म्ह० समासोक्ति व ध्वनि या दोन्हीं ठिकाणीं) श्लिष्ट विशेषणांच्या बळावर अप्रकृतव्यवहार प्रतीयमान होणें ही गोष्ट सारखीच असल्यामुळें (म्हणजे रागावृत इ० वरील वाक्यांत, व चंद्राच्या ऐवजीं राजा हें पद घालून होणार्या ध्वनिवाक्यांत अशा दोन्हीही ठिकाणांपैकीं) एके ठिकाणीं (म्ह० समासोक्तींत) व्यंग्य गुणीभूत असतें. व दुसरे ठिकाणीं (म्ह० शब्दशक्तिमूलकध्वनींत) व्यंग्य प्रधान असतें हें कसें काय ? खरें म्हणजे ह्या दोन्हीं ठिकाणीं प्रकृतार्थ प्रधान असल्यानें, व अप्रकृतार्थ त्याला उपकारक असल्यानें दोन्हींही वाक्यार्थांत अप्रकृतार्थ (म्ह० व्यंजनेनें होणारा अप्रकृतार्थ) गौण मानणेंच योग्य आहे. केवळ विशेष्ट श्लिष्ट आहे एवढयावरूनच व्यंग्य प्रधान, व तें श्लिष्ट नसल्यास व्यंग्य अप्रधान हें सिद्ध करणें शक्य नाहीं. या दोन्हींही ठिकाणीं नायकाची प्रतीति ही कुठें अर्थसक्तिमूलक व्यंजनेनें होतें, तर कुठें शब्दशक्तिमूलक व्यंजनेनें होते; पण ती होते ही गोष्ट दोन्हींकडे सारखीच. जे लोक (म्ह० कुवलयानंदकार वगैरे) “समासोक्तींत प्रकृतधर्मीचे ठिकाणीं नायकादिकांचा व्यवहारच मात्र प्रतीत होतो,” असें मानतात, व ध्वनीमध्यें मात्र प्रकृत धर्मीवर नायक वगैरेचा प्रत्यय होतो असें मानतात, व ध्वनीमध्यें मात्र प्रकृत धर्मीवर नायक वगैरेचा प्रत्यय होतो असें मानतात, व ध्वनीमध्यें मात्र प्रकृत धर्मीवर नायक वगैरेचा प्रत्यय होतो असें मानतात त्या लोकांच्या मतें पण, एके ठिकाणीं (म्ह० समासोक्तींत) व्यंग्य गौण असतें व दुसरीकडे (म्ह० ध्वनींत) प्रधान असतें. असें काय म्हणून ? आतां या दोन म्ह० प्रकृंतं व अप्रकृत अर्थांचें औपम्य (म्ह० साद्दश्य) सूचित होतें किंवा अभेद सूचित होतो, कांहींही म्हणा; पण अप्रकृतार्थाचा उपस्कारक असल्यामुळें. ह्यांतील व्यंग्यार्थ गौण असणेंच योग्य आहे; त्याला प्रधान मानणें योग्य नाहीं. नाहींतर समासोक्तींतही व्यंग्याला प्रधान मानण्याचा प्रसंग येईल. म्हणून (‘भद्रात्मनो०’ इत्यादि श्लोकांत व इतर स्थलींही) श्लिष्ट किंवा अश्लिष्ट विशेष्यें असलेलीं ही समासोक्तीच आहे असें मानणें योग्य होईल. अथवा परांगरूप गुणीभूतव्यंग्याचाच हा एक प्रकार आहे असेंही, प्राचीन रागावत नसतील तर, म्हणणें शक्य आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP