श्लेष अलंकार - लक्षण ५
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या ठिकाणीं प्रश्न असा कीं, हा अलंकार बहुतकरून दुसर्या अलंकाराच्या विषयांत प्रवेश करतो; तेव्हां, अशा ठिकाणीं हा श्लेष अलंकार (१) बाधक समजावयाचा, म्हणजे हा अलंकार दुसर्या अलंकाराचा बाध करतो असें समजायचें, कां (२) हा अलंकार दुसर्या अलंकाराशीं मिश्रित होतो असें समजायचें, कां (३) हा अलंकार बाध्य होतो असें समजायचें, म्हणजे दुसरे अलंकार याचा बाध करतात असें समजायचें ? या बाबतींत उदभटाचार्यांचें म्हणणे असें: “ज्याच्या प्राप्तीकरतां एखादा पदार्थ आरंभिला जातो, (म्ह० आणिला जातो) तो त्या दुसर्याचा
(म्ह ० प्राप्ताचा) बाधक होतो; या न्यायानें, दुसर्या अलंकाराच्या प्राप्तीकरतांच हा श्लेष आला असतां तो (श्लेष) त्या दुसर्या अलंकाराचा बाध करतो. या श्लोषाचा निराळा असा स्वत:चा विषयच नाहीं; तो जर असतां तर त्या ठिकानीं श्लेषाला जागा मिळून त्यानें (या) दुसर्या (श्लेषामुळें होणार्या) अलंकाराचा बाध केला नसता.
उदाहरणार्थ :--- (केवळ अप्रकृत अथवा केवळ प्रकृत असे दोन अर्थ सांगणारा तो स्वतंत्र श्लेष अलंकार म्हणावा तर) केवळ अप्रकृत अथवा केवळ प्रकृत अशा दोन अर्थांना सांगणारी (अशा दोन अर्थांचा एक धर्म सांगणारी) तुल्ययोगिता (प्रकृतमात्र व अप्रकृतामत्र अशा दोन अर्थांना सांगणार्या श्लेषाला दूर सारून) स्वत:च मिरवत आहे. आणि एक प्रकृत व एक अथवा अनेक अप्रकृत, अशा दोन अर्थांना सांगणारा या (त्या दोन अर्थांचें धर्मैक्य सांगणारा) दीपक अलंकारही (प्रकृताप्रकृत अशा उभय अर्थांना सांगणार्या श्लेषाला स्वतंत्र जागा न देतां) जागत राहिलाच आहे. (इतकेंच नव्हें तर) प्रकृत व अप्रकृत अशा धर्मींचा आधार घेऊन राहणारे श्लेषोपमा वगैरे अलंकारही (श्लेषाला खो देऊन) हजर आहेतच. कुणी म्हणेल :--- “हे राजा ! तूं पाताल आहेस; तूं दिशांचा आधार (अथवा कारण) आहेस, (म्ह० मर्त्यलोक आहेस), तूं देव मरुद्रणाचें स्थान म्ह०स्वर्ग) आहेस. अशारीतीनें तूं एक असूनही तिन्ही लोकांचें रूप धारण करणारा आहेस.” (हा या श्लोकाचा पहिला अर्थ) व “हे राजा ! तूं अत्यंत श्रेष्ठ रक्षणकर्ता (पाता अलम्) आहेस, तूं आशेचें स्थान आहेस; व तूं चवरींतून निघणार्या वार्याचें स्थान आहेस: ( म्हणजे तुझ्यावर चवर्या ढाळून वारा घातला जातो; ) तूं एक असूनही तिन्ही लोक तुझी स्वरूपें आहेत. (हा दुसरा अर्थ).” ह्या काव्यप्रकाशांतील श्लोकांत श्लेषाला निराळा स्वत:चा विषय मिळाला आहे, (मग त्यानें दुसर्या अलंकाराकरतां येऊन, त्या अलंकाराचा बाध करून स्वत: त्या जागीं कां बसावें ?)” पण हें म्हणणेंही बरोबर नाहीं. कारण या(काव्यप्रकाशांतील) श्लोकांत रूपकच स्पष्ट दिसत आहे. येथील श्लेषानें सांतितलेला स्वर्ग, मृत्यु, पाताळ वगैरे अर्थांचा अभेदारोप केल्यावांचून ‘तूं लोकत्रयरूप आहेस’ या अर्थाचें समर्थन करणें कठीण आहे. तेव्हाम येथें श्लेष नसून रूपकच आहे. यावर उद्भटाच्या विरोढकांचा आक्षेप :---“ ‘तर मग नदीनां संपदं बिभ्रद राजायं सागरो यथा’ - नदींची संपत्ति धारण करणार्या समुद्राप्रमा हा राजा आहे; (हा एक अर्थ) व ‘न दीनां’ :--- म्हणजे दीन नसलेली म्हणजे उत्कृष्ट संपत्ति धारण करणारा हा राजा समुद्राप्रमाणें आहे (हा दुसरा अर्थ)’ या श्लोकांत उपमेचा प्रत्यय येतो तो असा ? अथवा वरील श्लोकांतील यथा या शब्दाच्या जागीं किमु हा शब्द घातला असतां उत्प्रेक्षेची प्रतीति होते ती कशी ? अथवा वरील श्लोकांतच यथा या शब्दाच्या ऐवजीं अपर: हा शब्द घातला असतां, रूपकाची प्रतीति होते हें कसें ?” पण हेंही (आक्षेपकांचें) म्हणणें बरोबर नाहीं. कारण ह्या ठिकाणीं उपामा वगैरे अलंकारांचा केवळ भास होत आहे. (म्ह० श्लेष निरवकाश असल्यामुळें तो इतर अलंकारांचा बाघ करतो हें आमचें म्ह० उद्भटपक्षी यांचे म्हणणें खरें असेल तर ‘नदीनां.’ येथें उपमा वगैरे अलंकरा होतीलच कसे ?) ते खरोखर त्या ठिकाणीं नाहीतच. पांढरेपणामुळें शिंपेवर रूपें भासतें म्हणून कांहीं तें रुपें त्या ठिकाणीं खरोखर असतें असें नाहीं. म्हणून उपमा वगैंचें भान करण्याला कारण होणारा श्लेषच स्वत:चे विषयांत सर्व ठिकाणीं अलंकार मानावा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP