भक्तवत्सलता - अभंग १६ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६.
भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी । सर्वांहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावें । राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥
बान्नर अवघे भुभु:कार । बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा कराची आम्हांसी । रावण आणितो तुम्हापासीं ॥५॥
तुझ्या नामाच्या प्रतापें । हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करूनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥७॥
१७.
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥
त्याचा झाला म्हणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥
देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥
१८.
चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥१॥
भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥२॥
चोख्यामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥३॥
लागा विठ्ठल चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
१९.
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥
चांभार्‍यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥
तुरका घरीं विणी । म्हणे नामयाची जनी ॥३॥
२०.
माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं वा मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येऊनि काय करिसी । तुझें बळ आम्हांपासीं ॥३॥
नाहीं सामर्ध्य तुज हरी । जनी म्हणे धरिला चोरीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP