भक्तवत्सलता - अभंग ६६ ते ७०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
६६.
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण । सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीव हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी । जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥
६७.
जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥
नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥
मज भरंवसा नामाचा । गजर नामाच्या दासीचा ॥३॥
विटेवरी ब्रम्हा दिसे । जनी त्याला पाहतसे ॥४॥
६८.
सोंग सोंगा जाय । नवल जाउनी हांसताहे ॥१॥
हांयोनियां बडवी टिरी । कोण नाठवी हे परी ॥२॥
हा नाठवी आपणा । म्हणे जनी भुललें जाणा ॥३॥
६९.
देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥
तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥
त्या एकीं एक होतां । दासी जनी कैंचि आतां ॥४॥
७०.
एके रात्रींचे समयीं । देव आले लवलहीं ॥१॥
सुखशेजे पहुडले । जनीसवें गुज बोले ॥२॥
गुज बोलतां बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥
उठा उठा चक्रपाणी । उजाडलें म्हणे जनी ॥४॥
Last Updated : February 04, 2015
TOP