भक्तवत्सलता - अभंग ५६ ते ६०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५६.
माझा नामा मज देईं । जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥
तें गा न चले मजपाशीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुझ्यासंगें जे जे गेले । ते त्वां जितेचि मारीले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाबाई । नामा तुझा घेवोनी जाईं ॥५॥
हातीं धरोनियां आली । दासी जनी आनंदली ॥६॥
५७.
धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रम्ही ब्रम्हारूपीचा हुडा ।
संत ऐकताती कोडां । प्रेमबळा आनंदें ॥२॥
नामदामा दोनी काळू । नामा विठा दमामे पैलू ।
चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥
गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी ।
आऊबाई तुतारी । मंजुळस्वर उमटती ॥४॥
गोणाबाई नोबतपल्ला । नाद अंबरीं कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटला ॥५॥
जनाबाई घडयाळ मोगरीं । घटका भरतां टोला मारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदें ॥६॥
५८.
विठोबा चला मंदिरात । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥
रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥
समया जळती अर्ध रात्नीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥
नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥
घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥
५९.
लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥१॥
आदि ठाणें पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥२॥
गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देईं मला ॥३॥
शुद्ध देखोनियां भाव ।  पोटीं आले नामदेव ॥४॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥५॥
६०.
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥१॥
आंगडें टोपडें पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥२॥
माझ्या जीवीच्या जीवना । नाम ठेवी नारायणा ॥३॥
जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवूं सांगा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP