भक्तवत्सलता - अभंग ३६ ते ४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


३६.
बाप श्रोतियाचा राजा । कैसी उभारिली ध्वजा ॥१॥
एक झाला परिक्षिती । ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥
भागवतीं रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥
ज्याची ऐकतां गर्जना । कंप काळाचिया मना ॥४॥
सात दिवस वृष्टि झाली । जनी म्हणे मात केली ॥५॥
३७.
मांडियेला डाव । कोरवांनीं दुष्ट भाव ॥१॥
टाकियेला फांसा । पांडव गेले वनवासा ॥२॥
वना गेले पांडवबळी । दिनकरें दिधली थाळी ॥३॥
पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥४॥
३८.
ऐशापरी पांडवांतें । रक्षियेलें दीनानाथें ॥१॥
शंखचक्र आयुधें करीं । छाया पितांबर करी ॥२॥
ह्स्त ठेऊनियां माथां । सुखी असा निर्भय चित्तां ॥३॥
आज्ञा घेउनी सर्वांची । देव गेले द्वारकेसी ॥४॥
सरला थालिपाक आतां । पुढें सावधान श्रोतां ॥५॥
कथा पुढील गहन । घोषयात्ना निरूपण ॥६॥
येथुनी अध्याय कळस । जनी म्हणे झाला रस ॥७॥
३९.
कोणे एके दिवशीं । विठो गेला जनीपाशीं ॥१॥
हळूच मागतो खायासी । काय देऊं बा मी तुसी ॥२॥
हातीं धरून नेला आंत । वाढी पंचामृत भात ॥३॥
प्रेमसुखाचा ढेंकर दिला । जनी म्हणे विठो धाला ॥४॥
४०.
एके  दिवशीं वाडियांत । देव आले अवचित ॥१॥
अवघीं पायांस लागली । देवें त्यांवरी कृपा केली ॥२॥
बाहेर कामासी गुंतल्यें । देवें मजला विचारिलें ॥३॥
बाहेर आहेस वो बोलती । देव मजला हाटकिती ॥४॥
हात धुऊनि जवळ गेल्यें । कोण गे जनी हांसून बोले ॥५॥


References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP