प्रसंग चवथा - आत्म्यास कुडीबरोबर विषयोपसर्ग
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
जैसें सुनें शेत खाऊनि पांखरें । आपण उडोनि जाती एकसरें । पिंसुरट्या देखोनि धनी चिंताकारें । दुःखें रडे फुंदे ॥३२॥
तैसीं विषयपांखरें आत्म्यालागुनी । सळुनि पिळुनि गेली तारुण्यपणीं । मग पडला यमाचे गवसणी । यातना भोगावयालागी ॥३३॥
पहा एका विषयालागी मासा । आहारीं गळ गिळिला कैसा । बाहेर वोढोनि टाकिल्या परियेसा । चरफडित असें दुःखें ॥३४॥
फुकाचें तृण भक्षिलें अजापुत्रें । तो उफराटा विदारिला शस्त्रें । अनेक विषय-भोगिती अनाचारें । त्याचें कैसे होईल् पैं ॥३५॥
दीप दृष्टीं देखतांचि पतंग । मृत्यू पावला ऐसा विषयाचा संग । बहू राणिया भोगिती घालूनि पलंग । परी धन्याची हेतु नाही ॥३६॥
वोळखा घराच्या विषयालागीं । कोसळला मृत्यु पावला अभागी । परी नव्हेचि हरिनामयोगी । वैकुंठघरालागीं ॥३७॥
एका पक्षास गवसला आहार । अनेक पक्षी करिती फाडत्कार । तोंडींचें टाकिलया राहील निसुर । तैसे विषय टाका ॥३८॥
तापलें लोखंड ऐरणीवरी । मांस म्हणोनि झेंपावली घारी । निखार लागतांचि पळे दूरी । तैसे विषय पहा हो ॥३९॥
साखर ठेविली फिरंगीचिये घारे । गोडीनें चाटूं जातां जिव्हा चिरे । तैसे वोळखा विषयाचे मारे । देहसंगे आत्म्यासी ॥४०॥
मदन मनोवासना कल्पना वेडी । विषयालागीं फिरविला आत्मा कुडी । गवसल्या चरणीं जोडिली बेडी । कुडीस मार केला ॥४१॥
मन शिश्र्ने भोगिली योनी । खोडा घालविला करचरणालागुनी । परी शिश्र्न मन वाचेलागुनी । खोडा न घालतीच ॥४२॥
असत्य बोलिलें मन आणि वाचा । आणि घात करविला आत्म्याचा । यालागीं संग खोटा विषयांचा । न करावा श्रोतीं ॥४३॥
एका गंध विषयाकारणें । भ्रमर कमलांत गेले प्राणें । तैसी विषयांची अवलक्षणें । न करिती बरी ॥४४॥
ऐसें एक एका विषयाकारणें । बहुतेकांस पहा हो मरणें । हें ऐकोनि भागिती चातुर्यपणें। अनेक विषय ॥४५॥
या अनेक विषयांचे भोगवटे । भोगितां मनुष्यालागीं गोड वाटे । मोहजबा देतां चौदा ठायीं फाटे । श्रोते हो तें ओळखा ॥४६॥
सोशिल्या चौदा ठायाच्या फाडणुका । मग यम करिती नाना यातना लोकां । यालागीं धरावें अकराव्या श्रेष्ठ मन नायका । सद्गुरु सेवूनियां ॥४७॥
जो या मनाचें स्वयें करूनियां घोडें। मारील विषयांचे दळवाडे । तो निजपद जिंकील निवाडें । उपायें परियेसा ॥४८॥
आतां सद्गुरूसी ऊर्ध्वं नमस्कार। आदरें नमस्कारिलें तें चराचर । हें शहाण्णव कुळीं माझें गोत्र । ज्ञान विज्ञानें भासे ॥८९॥
आतां शेख महंमद सद्गुरुलागीं । नमस्कार करूनी आज्ञा पुसतो सौभागी । हें जन म्हणतसे मजलागीं । आम्हांस शिष्य करा हो ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP