प्रसंग सातवा - ईश्र्वराचें सौभाग्‍य

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ईश्र्वरस्‍तुतीपासूनि अनुसंधान । सांगतो परमार्थ विवेक सगुण । निर्गुण सत्‍याचें लक्षण विंदान । वोळखावें श्रोतीं ॥२१॥
कीटकीं भृंगी भिरड भ्रमर । रतीं रमल्‍याविण वाढे विस्‍तार । तेथें मायबापाचा उपकार । कोठें मानावा सद्‌गुरुविण ॥२२॥
पृथ्‍वीमध्यें असंख्य जीव असती । त्‍यांसी कवण मायबापें बोलिजेती । हें वोळखा विज्ञान प्रचीति । श्रोते हो तुम्‍ही ॥२३॥
पाषाणा जीव सगुण साहाकार । तेथें कोठें मायबापांचा उपकार । आहार पुरविता तो ईश्र्वर । मायबापपणें ॥२४॥
कोसला ॠतुकाळेंविण जन्मला । अंतरिक्षें तरुवरी टांगला । त्‍यासी आहार ईश्र्वरें पुरविला । दयाळू दातेपणें ॥२५॥
कोणी सात पांच पुत्रें व्याला । जगीं म्‍हणती थोर भाग्‍याचा देखिला । शेणाचा पोहो अनेक जीव जन्मला । भाग्‍यवंत म्‍हणोनियां ॥२६॥
तैसें उदंड लेकरें उत्‍पत्ति । ईश्र्वर भजन कांही नेणती । ते विष्‍टेंतील जीव म्‍हणिजेती । चांडाळ ते व्याले ॥२७॥
गांधारीचें कुमर नरिये धनी । कुंतीचे पांच पुण्यपुरुषार्थ मेदिनीं । लागले परउपकाराचें कारणीं । स्‍वहित करूनियां ॥२८॥
यालागी वंशीं पुत्र निपजावे । मग थोडे अथवा बहुसाल हो असावे । विश्र्वासें ईश्र्वरभजनीं विचरावे । मोक्षपदालागुनि ॥२९॥
रघुनाथ जन्मला मातेच्या कुशी । सोडविले तेहतीस कोडी देवतांशीं । अनेक उद्धारिले पतितांसी । निज नाम मंत्रें ॥३०॥
ऐसें निपजलें पुण्यपुरुषार्थी । ते होतील जड मूढांचें सारथी । त्‍यांसी यथाविधि करावी आरती । षोडशोपचारें ॥३१॥
उपजणार असंख्यात होती । निपजणार थोड्या पवित्र मूर्ती । उपजोनि उदंड अधोगती जाती । ढेंकुणपिसांन्यायें ॥३२॥
मक्षिका नळींत घालिती आसाडी । तेथें उत्‍पन्न जिवांच्या कोडी । तैसें उन्मत्तांचे संतान परवडी । पापें आचरावया ॥३३॥
चिलटें चांचणें घुंगुरड्यांची थारी । ॠतुकाळाविण असे नवलपरी । तेथे ॠतुकाळ सवेग थोरी । कोठें मायबापाची ॥३४॥
आपल्‍या स्‍वार्थासी करिती तळमळ । भूषण जगीं वणिती वेळोवेळ । मशागती करूनी पोसिती जंजाळ । दांभिक बरळतील ॥३५॥
एकें दहांस दिधली वस्त्रें अन्ने । तो जगी म्‍हणे म्‍यां पोसिले संतजनें । पुसल्‍याविण मिरवी भूषणें । अभिमान धरूनियां ॥३६॥
पहा चराचर पोसिले ईश्र्वरें । कोणापें सांगितलें नाहीं दातारें । पर्जन्यें शीत केलें कृपाधरे । जीवांचे काकुलती ॥३७॥
पर्जन्यकाळी केली उत्‍पत्ती । उष्‍णकाळी जीव करपोनि मरती । व्यालीं वायूच्या झुळका फिरती । ईश्र्वराचे सत्तेनें ॥३८॥
पहा शीतकाळीं आंखडती जीव । यालागीं रवि उष्‍ण उपाव । अंधारालागीं केला असे वाव । प्रकाश उजेडाचा ॥३९॥
महा स्‍वार्थ शोकें उन्मत्तती । म्‍हणोनि निशीं निद्रा विश्रांति । केली तुवां मायाळुवा श्रीपति । उदार चक्रवर्तीपणें ॥४०॥
कोणी पोही चालोनि पाजिलें पाणी । तंव तो भूषण जनांत वाणी । तैसा नव्हे ईश्र्वर कैवल्‍यदानी । चराचर ठायींच पाजिलें ॥४१॥
शेख महंमद सांगे ईश्र्वर सौभाग्‍य । नव खंड पृथ्‍वी जयाचा भोग । अणिक चौदा भुवनीं उपभोग करूनि अकर्ता माळी ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP