प्रसंग तेरावा - मार्गभ्रष्‍टतेस अविद्याच कारण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


सायासें उत्तम मनुष्‍य जन्मा येणें । श्र्वानापरीस हीनपणें आचरणें । धिग्‌ ज्‍यालेपण व्यर्थ गमावणें । ईश्र्वरभक्तीविण ॥५१॥
सांडोनि संसार होती वेषधारी । परी स्‍वकुटुंब अंगसंगें विचरी । जैसा बीजीं वट बीज वटाभीतरीं । उगवे तेथें विस्‍तारे ॥५२॥
अहं कल्‍पना सकळ बीजाकार । त्‍यापोटी लक्ष चौर्‍यांशीं स्‍थूळाकार । संकल्‍प वासने पुष्‍पाचा पसर । विकल्‍प झाका तुटती ॥५३॥
जैसें श्र्वान भुंकतसें परक्‍यास । तैसें योगियांनीं भुंकावें अविद्येस । परब्रह्मीं लावूनियां विश्र्वास । सर्वस्‍व समस्‍तेसी ॥५४॥
नेत्र लावून फेरती जपमाळा । अंतरीं वासनेनें मांडिला डव्हाळा । मन हृदयीं होऊं नेदी सोंवळा । प्रेमबोधालागी ॥५५॥
तीर्थें भ्रमण करितां चरण शिणले । जाणीव करितांचि पंडित मेले । आत्‍मज्ञानेंविण आत्‍मत्‍व चुकले । निज जवळींच असतां ॥५६॥
गोचिडाचें मुख धेनूचे कासे । क्षीर चुकोन अशुद्धावर पडे कैसे । तैसें उन्मत्त अविद्येचे पिसे । विषय लंपट होती ॥५७॥
जवादी निपजे मांजराच्या शरीरा । स्‍वयें आलोलिकेने धरी उंदरा । तैसें जन चुकलेसें सर्वेश्र्वरा । विषयां धरूनियां ॥५८॥
मजला तूप दावा म्‍हणतसे लोणी । तैसा जनीं जनार्दन भ्रमती सधनीं । परि ना सत्‍य वैराग्‍यें निंवळती ज्ञानीं । वांछा-ताकटी जाळूनियां ॥५९॥
वक्त्याची महा विचक्षणता । अनेक श्रोत्‍यांची बहु कुशळता । निजपद न ये शब्‍दाच्या हाता । सद्‌गुरुच्या कृपेविण ॥६०॥
लक्षानुलक्ष याग तपाचिया कोडी । अनेक तीर्थव्रतांच्या आवडी । परी साधूच्या आत्‍मत्‍वाची एक घडी । तुका न ये परियेसा ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP