प्रसंग तेरावा - एकविध भाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जैसें कनक कांतेवरी मन । तैसें ईश्र्वरीं तत्त्व लागे संपूर्ण । मग त्‍याला नाहीं जन्ममरण । सांगेन ऐका पुन्हां ॥८५॥
पैल पहा अंडीं घालोनि बाहेरी । कुर्मिणी असे जळांभितरी । लक्षी न ते अवलोकन करी । हा दृष्‍टांत परियेसा ॥८६॥
आपले पाठीसी बांधोनियां गंधर्व । नाड्यावरी थाळा आडवा भीतरीं पाव । येरूनयेरां वाट देती नवलाव । पवन तत्त्व धरूनियां ॥८७॥
मजकडे पाहाते की नाहीं जन । चहूंकडे न्याहाळी कोल्‍हाटी उभा राहोन । तोंचि पछाडी खाय न लगतां क्षण । अनुसंधान तुटोनियां ॥८८॥
सोनार बैसोनि बाजारा भीतरीं । अनेक गिर्‍हाईकांसी बोल करी । सुवर्ण नेदी अधिक रतिभरी । गुंलित तुकतिये वेळे ॥८९॥
अथवा गिर्‍हाईक नेदी अधिक रुका । सोनारहि नेघेचि उणा पैका । द्वैतांत एक अनुसंधान ऐका । श्रोते प्रश्र्निकपणें ॥९०॥
धेनू चरत असे वनाभीतरीं । आडवा उभा गोवळा हडदरी । परी तिचें लक्ष त्‍या वत्‍सावरी । तैसें लक्ष सद्‌गुरुचरणीं ॥९१॥
जैसे तस्‍करानें घेतलें सोनें । नेवोनि डोंगरीं ठेविलें पुरोन । आपण जनांत मिरवी सैताडपण । चित्त लागलें ठेवण्यासी ॥९२॥
तैसें चित्त लावावें ईश्र्वरीं । आपण असोनि भलतिये व्यापारीं । तरीच सुफळ जीवित्‍व संसारीं । नरा अथवा नारीचें ॥९३॥
जेथें मन पवनाची धांव खुंटली । तेथें वाचा काय बोलेल बोली । जैसी साखर मुकियानें खादली । परी गोडी सांगतां न ये ॥९४॥
जैसी प्रसवलीच जाणें वेदना । अबला म्‍हणती आम्‍हांस कां दावा ना । तैसें जन निज गुज साधुसज्‍जना । पुसों पाहे परियेसा ॥९५॥
विश्र्वजन आपणां देखतां निमाले । स्‍वयें त्‍याचें मरण कळों नाहीं आलें । मिथ्‍या सौभाग्‍यें डवरिलें ।त्‍या कानड्याच्या मढ्यालागीं ॥९६॥
तेव्हां आपण कल्‍पनेसी मरावें । तेव्हांच त्‍या मरणातें पहावें । सोऽहं तत्त्व ऐसें ओळखावें । निजीं मरोनियां ॥९७॥
जीवीं जिताचि मेलों संपूर्णत्‍वें । आयागमन खंडिलें स्‍वभावें । स्‍वयंभ असे अखंडित नवलावे । नवनीत निवडे जैसें ॥९८॥
निजसुखाची प्रेमबोध गोडी । सद्‌गुरुपंक्ती नित्‍यानित्‍य परवडी । शेख महंमदाला आवडी । शूरत्‍वें ब्रह्मानंदें ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP