चतुर्थ पटल - महामुद्राकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
महामुद्रा, महाबंध, महावेध, खेचरीमुद्रा, जालन्धरबन्ध, मूलबन्ध, विपरीतकरणीमुद्रा, उड्डियानबंध, वज्रोलीमुद्रा व शक्तिचालिनीमुद्रा या दहा मुद्रा ( प्रमुख असून ) इतर सर्व मुद्रांमध्ये सर्वोत्तम किंवा सर्वश्रेष्ठ आहेत.
( महादेव पार्वतीला म्हणतात ) हे प्रिये ! आता मी या तंत्रात महामुद्रेचे वर्णन करून सांगतो. या मुद्रेची प्राप्ती करून घेऊन कपिल आदि प्राचीन ऋषी व मुनी सिद्ध झाले.
सद्गुरूंनी ज्या विधीने शिकविले असेल त्या रीतीने अत्यंत आदराने डाव्या पायाच्या टाचेने गुदा व लिंग यांच्या मधील योनिस्थान घट्ट दाबावे. नंतर उजवा पाय पसरून सरळ लांब करावा व तो दोन्ही हातांनी धरावा म्हणजे उजव्या पायाचा तळवा दोन्ही हातांनी पकडावा. त्या नंतर शरीराची नऊ द्वारे रोखून अर्थात् त्या द्वारांवर संपूर्ण संयम प्रस्थापित करून, हनुवटी हृदयावर ठेवून आणि चित्तवृत्ती चैतन्यात स्थिर करून नंतर वायूचे साधन करावे अर्थात् वायू केवल कुंभकामुळे सुषुम्णेत प्रवेश करून आपली वक्रगती सोडून स्थिर होईल असे करावे. या विधीला अर्थात् या विधीने प्राणांचे म्हणजे कुंडलिनी शक्तीचे संचलन सुषुम्णेत होण्यासाठी केलेल्या या प्रक्रियेला महामुद्रा असे म्हणतात. ही मुद्रा सर्व तंत्रात गुप्त ठेविली आहे. या मुद्रेचा प्रथम डाव्या अंगाने म्हणजे डाव्या टाचेने योनिस्थान दाबून न नंतर उजव्या अंगाने म्हणजे उजव्या टाचेने योनिस्थान दाबून अभ्यास करावा. निश्चल मनाच्या योगी साधकाने हा प्राणायामाचा अभ्यास समानरूपाने करावा. ॥३०॥
अशा प्रकारे या महामुद्रेचा अभ्यास किंवा हे साधन ( नियमित, निरंतर व दृढ श्रद्धेने केले असता ) या साधनाभ्यासाच्या प्रभावाने मंदभाग्याचा साधकयोगीही सिद्ध होतो. या महामुद्रेच्या प्रभावाने सर्व नाड्यांचे चालन होते म्हणजे शरीरातील सर्व नाड्या चेतनामय होतात. बिंदू स्थिर होतो म्हणजे वीर्याची अधोगती नाहीशी होऊन ते ऊर्ध्वगती होते अर्थात् त्याचे ओजात किंवा तेजात रूपांतर होते. हा साधनाभ्यास जीवन आकर्षित किंवा स्थिर अगर तेजस्वी ठेवतो आणि तो सर्व प्रकारच्या पातकांचा नाश करण्यास समर्थ असतो. त्याचप्रमाणे या मुद्रेच्या अभ्यासाने कुंडलिनी शक्ती जागृत होऊन प्राण ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करतात किंवा प्राणांना ब्रह्मरंध्रामध्ये प्रविष्ट करण्याची शक्ती साधकाला प्राप्त होते. त्याचे सर्व रोग नाहीसे होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरीर सुंदर अर्थात् अव्यंग व स्वच्छ कांतीने युक्त होत्ते. वृद्धावस्था व मृत्यू यांचा नाश होतो. याचा अर्थ असा की, साधक सुंदर, कांतिमान् व दीर्घजीवी होतो. साधकाला सर्व प्रकारच्या इच्छित फ़लांची प्राप्ती होऊन सुख मिळते आणि इंद्रियांवर संयम ठेवण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. अशा प्रकारे येथपर्यंत जे काही फ़ल कथन केले आहे, ते सर्व योगारूढ योग्याला योगसाधनाभ्यासपरायणतेने अवश्य सिद्ध होते. याबद्दल संशय बाळगण्याचे किंवा विचार करण्याचे कारण नाही.
श्रीशंकर म्हणतात, हे सुरपूजिते देवी पार्वती ! ही मुद्रा प्रयत्नपूर्वक गुप्त ठेविली पाहिजे अर्थात् ज्या साधकाला योगाभ्यासात रुची आहे व जो ही मुद्रा करण्यास समर्थ आहे त्यालाच फ़क्त ही सांगण्यास हरकत नाही. साधकयोगी ही मुद्रा प्राप्त किंवा उपलब्ध करून घेऊन संसारसमुद्रातून पार होतात. मी सांगितलेली ही मुद्रा साधकांना कामधेनुस्वरूप आहे म्हणजे मुद्रेच्या साधनाभ्यासामुळे साधकाच्या मनोवांछित कामना पूर्ण होऊ शकतात. या मुद्रेचा अभ्यास अत्यंत गुप्तपणे केला पाहिजे आणि ती सर्वसामान्य व्यक्तीला अर्थात् अनधिकारी माणसाला किंवा सर्वांना देणे उचित नाही म्हणजे देऊ नये.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP