चतुर्थ पटल - वज्रोलीमुद्राकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
श्रीशंकर म्हणतात, हे देवी पार्वती ! मी आपल्या भक्तांच्या लाभासाठी संसाराचा अंधकार दूर करणार्या व गुह्यातील गुह्य म्हणजे परमगोपनीय अशा वज्रोलीमुद्रेचे कथन करतो.
गृहस्थ आपल्या इच्छेप्रमाणे घरात राहात असतानाही म्हणजे भोग भोगीत असतानाही व योगोक्त नियमांचे पालन केल्याशिवायही या वज्रोलीमुद्रच्या साधनाने ( गृहस्थ साधकयोगी ) मुक्त होतो अर्थात् मुक्ती किंवा कैवल्य प्राप्त करतो. याचा अर्थ असा की, या वज्रोलीमुद्रेच्या साहाय्याने गृहस्थ साधक भोग व मोक्ष या दोहोंचाही अधिकारी होतो.
या वज्रोली मुद्रेचा योगाभ्यास भोगयुक्त पुरुषांनाही मोक्ष देणारा आहे. याचा अर्थ असा की, भोगात रत असलेला पुरुषही या मुद्रेच्या अभ्यासाने मुक्ती प्राप्त करू शकतो. यासाठी अत्यंत प्रयत्नाने सदासर्वदा वज्रोलीमुद्रेचा अभ्यास करणे हे योगीसाधकाचे कर्तव्य आहे. ॥८०॥
प्रथम बुद्धिमान् साधकाने प्रयत्न करून विधिविधानपूर्वक स्त्रीच्या योनीनील रज लिंगनालात आकर्षण करून अर्थात् लिंगातील मार्गाने वर खेचून घेऊन ते आपल्या शरीरात प्रविष्ट करावे. नंतर आपल्या बिंदूचा म्हणजे वीर्याचा निरोध करून योनीमध्ये लिंगचालन अर्थात् संभोगक्रिया करावी. यावेळी दैववशात् बिंदू आपल्या स्थानापासून चलित किंवा च्युत झाला; तर योनिमुद्रेच्या द्वारा त्याचा निरोध करून त्याचे वर आकर्षण करावे. नंतर तो बिंदू शरीरात डाव्या भागात स्थापन करून क्षणभर लिंगचालन म्हणजे संभोगक्रिया थांबवावी. ( थोड्या वेळाने ) पुन्हा गुरूच्या उपदेशाप्रमाणे योगीसाधकाने हुं हुं अशा प्रकरचे शब्दोच्चारण करीत योनीमध्ये लिंगचालन करावे म्हणजे संभोगक्रियेत प्रवृत्त व्हावे आणि त्यावेळी बलपूर्वक अपानवायूचे आकुंचन करून स्त्रीच्या रजाचे आकर्षण करावे. याला वज्रोलीमुद्रा असे म्हणतात.
या वज्रोलीमुद्रेच्या विधिविधानाने अर्थात् क्रियेने योगीसाधक अत्यंत लवकर योगसिद्ध होईल आणि गुरुचरणकमलांची पूजा करणारा योगी आपल्या शरीरात अमृताचे पान करण्यास समर्थ होईल अर्थात् शरीरस्थ अमृत तो प्राशन करील.
बिंदू म्हणजे वीर्य चंद्रस्वरूप व रज सूर्यस्वरूप आहे असे जाणून दोघांना संयुक्त करून किंवा एकमेकात मिसळून त्यांचा आपल्या शरीरात प्रवेश करावा. याचा अर्थ असा की, वज्रोलीमुद्रा करताना जेव्हा साधक स्त्रीच्या योनीतील रज खेचून घेईल तेव्हा त्याने ते स्वशरीरातील वीर्याशी एकरूप करून नंतर त्यांचे ऊर्ध्वाकर्षण करावे म्हणजे या मिश्रणाचे आपोआप ओजात रूपान्तर होऊन साधकाला दिव्य व अजरामर काया प्राप्त होते.
श्रीशंकर म्हणतात, बिंदू हा मत्स्वरूप म्हणजे शिवस्वरूप आहे व रज हे शतिक्स्वरूप आहे असे जाणू जर साधक या दोहोंना ( आपल्या शरीरात ) एकत्रित, संयुक्त किंवा एकरस करील; तर या साधनाने योगीसाधकाचे शरीर दिव्य होईल. याचे तात्पर्य असे आहे की, बिंदुरजाचे म्हणजे शिवशक्तीचे अर्थात् ईश्वरमायेचे समरसीकरण केल्याने किंवा दोहोंचा एकमेकात लय केल्याने साधकाच्या अध्यारोपाचा म्हणजे मी शिव नसून जीव आहे अशा जन्मजन्मान्तरी धारण केलेल्या धारणेचा किंवा कल्पनेचा अपवाद होतो अर्थात् ती नाहीशी होते म्हणजे मी जीव नसून शिव आहे असे ज्ञान त्याला होते व साधक मुक्त होतो. सारांश रज व बिंदूचे सामरस्य करणारा साधक सिद्ध व मुक्त होतो.
बिंदूपात झाल्याने मृत्यू ( लवकर ओढवतो ) व बिंदुधारण केल्याने मनुष्यप्राणी ( दीर्घकाल ) जिवंत राहतो. या करिता साधकाने प्रयत्नपूर्वक बिंदू धारण करावा म्हणजे त्याचे रक्षण करावे. याचा आशय असा आहे की, स्त्री संभोगामध्ये वीर्यपात होणे योग्य नाही; कारण त्यामुळे साधना निष्फ़ल होते. शिवाय वीर्य हेच शरीरात खरे जीवन आहे; कारण त्याच्याशिवाय शरीरात सामर्थ्य राहू शकत नाही आणि सामर्थ्य न राहणे हे मनुष्याला प्रत्यक्ष मृत्यूसारखेच आहे. यासाठी केव्हाही व कोणत्याही दशेत बिंदुक्षय रोखणे हे साधकाचे प्रमुख कर्तव्य आहे.
मनुष्य प्राण्याचे जन्म - मरण बिन्दूने म्हणजे वीर्यक्षयानेच होते यात काहीही संशय नाही. याचा अर्थ असा की, जोपर्यन्त बिंदू स्थिर किंवा दृढ होत नाही तोपर्यंत मनुष्याची जन्ममरण परंपरा संपत नाही. या दृष्टीने विचार करून किंवा हे जाणून अर्थात् बिंदूच्या स्थिरीकरणाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन साधकाने बिंदूचे धारण करण्यात किंवा त्याचे रक्षण करण्यात नेहमी तत्पर राहिले पाहिजे.
श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! महान् प्रयत्न करून बिन्दू सिद्ध केल्यावर या भूतलावर अशी कोणती गोष्ट आहे की, जी सिद्ध होऊ शकणार नाही ? अर्थात् बिंदू सिद्ध झाल्यावर सर्व काही सिद्ध होते किंवा बिंदूच्या रक्षणातच सर्व सिद्धी अंतर्निहित आहेत. या बिन्दुरक्षणाच्या प्रसादानेच माझा ( शंकराचा ) असा महिमा आहे. अर्थात् बिंदूचे रक्षण केल्यानेच माझी सर्वत्र कीर्ती झाली आहे आणि जो साधक बिंदू स्थिर किंवा दृढ करतो त्याचीही कीर्ती माझ्यासारखीच होते. ॥९०॥
मनुष्याला सांसारिक सुखदु:खांत गुंतवून किंवा अडकवून ठेवण्याचे कार्य बिंदूच करतो म्हणजे सुखदु:खाचे कारण बिंदूच आहे. त्याचप्रमाणे मूर्ख माणसांच्या मूर्खतेचे व जरामरणशील संसारी लोकांच्या जन्ममरण चक्राचे बिंदूच कारण आहे. यासाठी बिंदूचे रक्षण करणारा किंवा तो स्थिर व दृढ करणारा असा माझा शांकरयोग म्हणजे सिद्धयोग हा सर्व योगात उत्तम योग आहे.
( या सिद्धयोगान्तर्गत वज्रोलीमुद्रेच्या ) अभ्यासामुळे भोगयुक्त माणसालाही सिद्धी प्राप्त होते अर्थात् मनुष्य कितीही भोगाकांक्षी असला; तरी त्याने जर वज्रोलीमुद्रेचा अभ्यास केला, तर त्याला भोग भोगता भोगता शिवसामरस्याची सिद्धी प्राप्त होऊन संसारातील सर्व इच्छित पदार्थांची सिद्धी किंवा प्राप्ती होते म्हणजे इच्छा केल्यावर त्याला प्राप्त होऊ शकत नाही असा पदार्थच असत नाही.
या योगाभ्यासाच्या द्वारा म्हणजे योगाभ्यासात सिद्ध झालेला साधक आपले अशेष भोग भोगीत असताना निश्चितपणे सुखी राहतो आणि योगीसाधकांना या वज्रोलीमुद्रेच्या साधनद्वारा सर्व सिद्धी अवश्यपणे प्राप्त होतात; कारण महान् सुख भोगता भोगता ही साधना सिद्ध होते. या करिता या वज्रोलीमुद्रेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. सारांश, वज्रोलीमुद्रेच्या साधनद्वारा सिद्ध झाल्यावर साधकाच्या उरलेल्या शुभाशुभ भोगांपैकी अशुभ भोगही सुखपूर्वक पूर्ण होतात.
वज्रोलीमुद्रेच्या दोन भेदांना सहजोली व अमरोलीमुद्रा अशी नावे दिली आहेत. ( मात्र भेदाचा प्रकार कोणताही असला व त्याला कोणतेही नाव दिले असले; तरी या सर्व प्रकारातील साररूप गोष्ट ही आहे की, ) साधकयोग्याने कोणत्याही प्रकाराने बिंदू धारण अर्थात् स्थिर किंवा दृढ करावा.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP