चतुर्थ पटल - मूलबन्धकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
( डाव्या किंवा उजव्या ) पायाच्या टाचेने गुद्द्वाराचा मार्ग दाबून धरून बलपूर्वक अपानवायूला वर आकर्षित करावे म्हणजे खेचावे. ( अशा प्रकारे अपानवायूला वर खेचून त्याचे प्राणवायूशी ऐक्य करावे. ) या क्रियेला मूलबंध म्हणतात. हा मूलबंध जरा व मरण यांचा नाश करणारा आहे.
अशा प्रकारे कल्पित केलेल्या म्हणजे सांगितलेल्या या मूलबंधाच्या द्वारा अपानवायू व प्राणवायू यांचे ऐक्य केल्याने योनिमुद्रा आपोआप सिद्ध होईल.
सिद्ध पुरुषांना ही योनिमुद्रा सिद्ध झाल्यावर या भूतलावर असा कोणता पदार्थ आहे की, जो त्यांना उपलब्ध होऊ शकणार नाही ? या मूलबंधाच्या प्रसादाने वायूला जिंकून साधक पद्मासन घालून ( खेचरी मुद्रा लावून ) साधकाला बसला; तर तो पृथ्वीच्या म्हणजे पृथ्वीतत्त्वाचा अर्थात् मूलाधाराचा त्याग करून ( सुषुम्नामार्गाच्या द्वारा ) आकाशात म्हणजे सहस्रारात गमन करतो.
जर एखाद्या श्रेष्ठ योग्याला हा संसरसागर तरून पार होण्याची इच्छा असेल; तर त्याने निर्जन देशात व गुप्तस्थानामध्ये या मूलबंधाचा अभ्यास करणे उचित आहे.
Last Updated : November 11, 2016
TOP