चतुर्थ पटल - महाबन्धकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
त्या नंतर म्हणजे महामुद्रा केल्यानंतर प्रथम दोन्ही पाय लांब करून मग डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवावा. गुदा व योनीचे आकुंचन करावे. अपानवायू ऊर्ध्व करावा म्हणजे त्याला वर खेचावे व त्याचा समानवायूबरोबर संबंध स्थापित करावा म्हणजे अपान व समानवायूचे मीलन किंवा एकीकरण अगर समरसीकरण करावे. त्यानंतर प्राणवायूला अधोमुख करावे म्हणजे खाली खेचावे. प्राणापानांच्या ( व समानवायूच्याही ) समरसीकरणाने साधकाची गती ऊर्ध्वमुखी व्हावी म्हणून बुद्धिमान् साधकांसाठी हा महाबंध कथन केला आहे. अर्थात् अशा प्रकारे महाबंध केला म्हणजे तीनही वायूंच्या समरसीकरणामुळे अनादि निद्रिस्त कुंडलिनी शक्ती जागृत होऊन जीवाची बहिर्गती संपून ऊर्ध्वगती सुरू होते. प्राण किंवा शक्तीचा सुषुम्णेत प्रवेश झाला म्हणजेच अशी गती जीवाला किंवा साधकाला प्राप्त होते. हा महाबंध साधकाला सिद्धिमार्गाचे म्हणजे कुंडलिनी शक्तिजागृतीमुळे उपस्थित होणार्या अंतरंग साधनमार्गाचे अर्थात् स्वत:हून चालणार्या साधनाने दान करणारा आहे. त्याचप्रमाणे या महाबंधामुळे साधकाच्या शरीरातील नाड्यांच्या जाळ्यातील रसव्यूह म्हणजे निरनिराळ्या शक्ती ( मूलाधारात ब्रह्मरंध्रापाशी एकत्रित होऊन सुषुम्नामार्गाने ) सहस्राराराकडे गमन करतात. अशा प्रकारे मुद्रा व बंध या दोन्ही गोष्ठी एक - एक अंगाने म्हणजे एकदा उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवून व नंतर डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून साधकाने प्रयत्नपूर्वक कराव्यात. ॥४०॥
या महाबंधाच्या साधनाभ्यासाने प्राणवायू सुषुम्नानाडीमध्ये प्रवेश करतो. यामुळे साधकाचे शरीर पुष्ट होते किंवा राहते आणि साधकयोग्याच्या शरीरातील सर्व अस्थी व बंधने दृढ अर्थात् बलिष्ठ होतात. त्याचप्रमाणे योगीसाधकाचे हृदय संपूर्णपणे संतुष्ट होते अर्थात् त्याचे हृदय संतोषाने परिपूर्ण व आनंदित राहते. या सर्व गोष्टी या महाबंधाच्या प्रभावाने योग्याला आपोआप प्राप्त होतात. या बंधाच्या साधनाने योगी आपल्या इच्छेनुसार सर्व सिद्धी प्राप्त करतो किंवा त्याच्या सर्व इच्छित कामना पूर्ण होतात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP