चतुर्थ पटल - खेचरीमुद्राकथनम्
महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.
बुद्धिमान् साधकाने वज्रासन म्हणजे सिद्धासन घालून भ्रूमध्यात दृष्टी स्थिर करून बसावे. नंतर जीभ उलटी करून ती वर टाळू जवळील सुधाकूपस्वरूप विवरात यत्नाने स्थापित करावी किंवा त्या जागी तिचे संयोजन करावे. ( यामुळे टाळूमधून पाझरणार्या अमृताचे पान साधक करू शकतो. ) या मुद्रेला खेचरी असे नाव असून तिचे भक्तांच्या हिताकरिता प्रकटीकरण केले आहे. ही खेचरीमुद्रा सर्व सिद्धींची जननी असून ती मला माझ्या प्राणांपेक्षाही अधिक प्रिय आहे. जो साधक ही खेचरीमुद्रा लावून निरन्तर साधनभ्यासरत राहून नित्य अमृतपान करतो त्याचे शरीर त्यामुळे सिद्ध होते किंवा त्याला विग्रहसिद्धी प्राप्त होते म्हणजे त्याला प्रतिमारूप देवतांची सिद्धी होते. याचा अर्थ असा की, खेचरीमुद्रा लावून साधनाभ्यास करणार्या साधकाचे शरीर पुष्ट, सुगठि व शुद्ध होते आणि त्याच्या शरीरातील सर्व चक्रस्थ देवता संतुष्ट होतात. मृत्युरूपी हत्तीच्या बाबतीत ही खेचरीमुद्रा सिंहासारखी आहे.
जरी साधक पवित्र, अपवित्र किंवा इतर कोणत्याही अवस्थेत असला; तरी ज्या साधकाला ही खेचरी मुद्रा सिद्ध झालेली आहे, तो सदासर्वदा शुद्ध आहे किंवा त्याच्या बाबतीत सर्व काही शुद्धच आहे, यात काहीही संशय नाही.
या खेचरीमुद्रेचे साधन जो साधनयोगी अर्ध्या क्षणभरही करतो तो पापरूपी महासमुद्रातून पलीकडे जाऊन सुखपूर्वक दिव्य भोग भोगण्यास समर्थ होतो. ( जर या साधकाचा साधनाभ्यास अर्धा राहिला व त्यास पुन्हा जन्म ग्रहण करणे भाग पडले; तर ) त्याचा उत्तम व उच्च कुलात जन्म होतो.
जो योगी ही खेचरीमुद्रा लावून स्वस्थचित्त व ब्रह्मपरायण राहील, त्याला शंभर ब्रह्मदेवांचे जीवन व्यतीत होणारा ( दीर्घकालही ) अर्ध्याक्षणाप्रमाणे प्रतीत होईल.
गुरूच्या उपदेशाने ज्या साधकाला या खेचरीमुद्रेचा लाभ होईल, तो साधक जरी अनेक पापकर्मात गुंतून पडला; तरी ( असे साधन करणार्या ) बुद्धिमान् साधकाला परमश्रेष्ठ गती म्हणजे मोक्ष, कैवल्य किंवा शिवसामरस्य प्राप्त होते. याचा अर्थ असा की, खेचरी साधनाने साधकाची सर्व पापे नष्ट होतात व तो मुक्ती प्राप्त करतो.
श्रीशंकर म्हणतात, हे सुरपूजिते देवी पार्वती ! ही खेचरी मुद्रा प्राणाच्या बरोबर आहे. या करिता ही मुद्रा सामान्य किंवा वाटेल त्या व्यक्तीला देणे उचित नाही. उलट ही मुद्रा प्रयत्नपूर्वक गुप्त ठेविली पाहिजे.
Last Updated : November 11, 2016
TOP