अंत्येष्टींतील कृत्यांचें सामान्य स्वरूप
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम. उपजल्यापासून मरेपर्यंत जे देहाला संस्कार करावयाचे, त्यांतील हा शेवटचा संस्कार होय. या संस्कारांत बर्याचशा कृत्यांचा शास्त्रकारांनी समावेश केला आहे. सामान्यतः विचार करितां या कृत्यांचे चार भाग पाडतां येतील. ते हे :-
१ प्रायश्चित्तें,
२ दहनविधि,
३ श्राद्धें व
४ दानें.
प्रायश्चित्तांचे प्रयोजन :-
मनुष्याच्या हातून कोणत्याही प्रकारें स्वकर्तव्याचें उल्लंघन होऊं नये, या हेतूनें शास्त्रकारांनीं निरनिराळ्या बाबतीचे नियम केले आहेत. परंतु प्रत्येक मनुष्याचें त्या नियमाप्रमाणें नेहमीच वर्तन घडतें असें नाहीं. कधीं कधीं मोहानें, अज्ञानानें अगर भ्रांतीनें नियमांचें उल्लंघन होतें, आणि त्यामुळें मनुष्य पतन पावतो. अशीं कृत्यें, म्हणजे पातकें, व त्या पातकांचे क्षालनासाठीं करावयाचीं जपतपादि कृत्यें म्हणजे प्रायश्चित्तें, यांविषयी स्मृतिकारांनीं सविस्तर विचार केला आहे. प्रायश्चित्ताचे विचारांत कृच्छ्र, व निष्क्रय हे शब्द वेळोवेळीं येतात. यासाठीं त्यांचा अर्थ प्रथमतः येथें थोडक्यांत सांगणें जरूर आहे. कृच्छ्र या शब्दाचा मूळ अर्थ शरीरपीडा असा आहे. देहदंडनासाठी नियमित भोजन, उपोषण, पंचगव्यप्राशन इत्यादि प्रायश्चित्तें सांगितली आहेत. कृच्छ्रांचे, प्राजापत्य - कृच्छ, सांतपन - कृच्छ, तप्त - कृच्छ वगैरे भेद आहेत. हातून घडलेल्या पातकांबद्दल अशा प्रकारचें देहदंडन करणें हेंच खरें प्रायश्चित्त होय. परंतु प्रत्यक्ष देहदंडन करण्याची इच्छा आतां कमी कमी होत चालली आहे. आणि नेहमींच व सर्वांसच तें शक्य नसतें, हेंही कांही अंशी खरेः यासाठी त्या ऐवजी जप, होम, दान इत्यादि ‘ प्रत्याम्नाय ’ ( अर्थात् प्रतिनिधि ह्म० मोबदले ) सांगितले आहेत. त्यांत धान्यदान, गोदान, द्रव्यदान, अशाप्रकारचे मोबदले सांगितले आहेत. अशा मोबदल्याचे द्रव्यदानास निष्कय असें म्हणतात. सर्वप्रकारच्या पातकांबद्दल प्रायश्चित्तें शास्त्रानुसार मरणापूर्वींच ज्याची त्याणें स्वतः केली पाहिजेत; परंतु व्यवहारांत तसें शक्य नसल्यानें, मरणानंतर क्रिया करणारा पुत्र ( अगर इतर अधिकारी ) प्रथम दिवशी संकल्प करून सूतक फिटल्यावर तीं सामान्यतः निष्क्रयरूपानें करितो.
दहनाचें प्रयोजन :-
शवदहनाचें प्रयोजन स्पष्टच आहे. देहांतून जीव निघून गेल्यावर, रुधिराभिसरण बंद होऊन रक्त - मांसादि कुजतात व त्यापासून दुर्गंधी उत्पन्न होते, ती न व्हावी म्हणून शवाची व्यवस्था लावणें अवश्य आहे. पारशी लोकांत प्रेत उघडें ठेवून गिधाडांकडून खावविण्याची चाल आहे, ती अगदी प्राचीन दिसते. यापेक्षां सुधारलेली चाल म्हटली म्हणजे ख्रिस्ती, मुसलमान वगैरे लोकांत प्रचलित असलेली प्रेत पुरण्याची होय. कित्येक हिंदु - जातींतही प्रेत पुरण्याचा प्रघात आहे. अगदीं लहान मुलें असलीं, तर त्यांस व संन्याशांसही पुरण्याची चाल आहे. परंतु पुरण्यापेक्षां जाळण्याची चाल चांगली हें उघड आहे; व या बाबतींत हिंदुधर्माची पद्धत सर्वांत उत्तम आहे.
श्राद्धाचें प्रयोजन :-
मृत मनुष्याचे आत्म्यास सुख व्हावे म्हणून श्रद्धेने अर्थात् भक्तिभावानें जें दान देतात अगर जीं इतर कृत्यें करितात, त्यास श्राद्ध म्हणतात. होम ( अग्नौकरण ), ब्राह्मण - भोजन व पिण्डदान, ही तीन कृत्यें श्राद्धांत मुख्य होत. धर्मसिंधूंत म्हटले आहे कीं, जो श्रद्धा न ठेवितां, पितर नाहींत असें मानून श्राद्ध करीत नाही, त्याचें रक्त पितर पितात !
श्राद्धाचे चार भेद आहेत.
(१) एकोद्दिष्टश्राद्ध,
(२) सपिंडीश्राद्ध,
(३) पार्वणश्राद्ध, आणि
(४) नांदीश्राध.
(१) एकाला म्हणजे मृताला उद्देशून एक पिंडानें जें श्राद्ध करावयाचें तें एकोद्दिष्टश्राद्ध
(२) वर्षांती किंवा बारावे दिवशीं अर्घ्य व पिंड यांचे संयोजन करून जें श्राद्ध करावयाचें ते सपिंडीकरणश्राद्ध
(३) बाप, आजा व पणजा या तिघांस उद्देशून तीन पिंडांनी युक्त असें जें श्राद्ध करावयाचें तें पार्वनश्राद्ध ( प्रतिसांवत्सारिक वगैरे ).
(४) चौल, पुत्रजन्म, विवाह इत्यादि प्रसंगीं जें वृद्धिश्राद्ध करावयाचें तें नांदीश्राद्ध होय. अंत्येष्टिप्रकरणांत पहिल्या दोन प्रकारच्या श्राद्धांचा समावेश होतो.
दानांचें प्रयोजन :-
मृतास परलोकीं उपयोगी पडावी म्हणून ही दानें करितात; त्यांत दशदानें, अष्टदानें, उपदानें वगैरे भेद आहेत. हीं दानें सुतक संपल्यावर अकरावे अगर बारावे दिवशीं करितात. त्यांत गाई, घोडा, पलंग, भूमि, तीळ, सोनें, रुपें, छत्री, काठी, जोडे, कमंडलु वगैरे यथा - शक्ति दानें देतात. त्यांजविषयीं पुढें ज्या त्या ठिकाणी विशेष माहिती देण्यांत येईल.