दहावे दिवसाची क्रिया
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
काकबलि दररोज ज्याठिकाणीं पिंड दिले त्याठिकाणी अगर दुसरे ठिकाणीं त्रिकोणाकृति वेदी करून ती शेणानें सारवून तीवर, हळद, गुलाल, इत्यादि घालून कर्त्यानें मध्यें एक व त्याचे चार दिशांस चार असे उदकुंभ मांडावे. त्यावर पिंड, छत्र, पोळी, पताका, पादुका, ही अस्थिसंचयन श्राद्धाप्रमाणें ठेवावी. मधला उदकुंभ प्रेतास, पूर्वेकडील प्रेतमित्रांस, दक्षिणेकडिल वैवस्वत यमास, पश्चिमेकडील वायसास व उत्तरेकडील प्रेताधिपति रुद्रास, याप्रमाणे पदार्थ तहान भूक शांत होण्यासाठीं द्यावे. पश्चिमेकडील पिंडास कावळा शिवेपर्यंत तेथें राहावें. कावळा शिवल्यावर, अश्म्याला तेल व तीळ लावून तो पाण्यांत टाकावा; ( कित्येक याचवेळी प्रेतत्व निवृत्तिसाठीं दशदानें करतात. ) व कर्त्यानें आप्तस्वकीयांची प्रार्थना करावी की प्रेताच्या नांवानें आपण उदकांजलि द्यावी; व प्रेताला उद्देशून त्यांणी तीरावर एक एक किंवा तीन तीन उदकांजलि द्याव्या. ( मृताबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा क्रियेला उद्देश आहे. ) पुत्र वगैरेनी क्रियेकरितां घेतलेल्या वस्त्रांचा त्याग करावा व क्षौर करावें. व सर्वांनीं देशाचाराप्रमाणें वाटलेल्या पांढर्या मोहर्या किंवा वाटलेले तीळ व आंवळकाठी अंगास लावून सर्वांनीं एकदम मस्तकावरून स्नान करावें. आणि मौन धारण करून बैल, गाय, सोनें यांस शिवून पांढरें वस्त्र नेसून घरी जाऊन भोजन करावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP