अध्याय २ रा - प्रारंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीमत्कृष्णात्मने नमः ॥
गोविंदकृपेचा कल्पतरु । गोविंद सच्चित्सुखागारु । अगाधबोधसद्गुणरत्नाकरु । वरद सद्गुरु तो माझा ॥१॥
गोविंद योगियांचें ध्यान । गोविंद विरक्तांचे धन । गोविंद सच्चित्सुखांचे जीवन । चैतन्यघन विग्रही ॥२॥
गोविंद गुणांची विश्रांति । गोविंद अनुभवाची शांति । गोविंद स्वानंदाची तृप्ति । सत्संविती गोविंद ॥३॥
गोविंद मायेचा नियंता । गोविंद एकात्मतेचा भर्ता । गोविंद परेहूनि परता । गोविंद तत्त्वता गुरुगम्य ॥४॥
गोविंद पुराणपुरुषोत्तम । गोविंद सनकादिकांचा काम । गोविंदगुणीं ग्रथितां व्योम - । सुमनें होतीं अपुरती ॥५॥
गोविंदसत्तायोगबळें । माया ब्रह्मांडाचे पाळे । निर्मूनि अघटित घटना खेळे । तिसी नाकळे गोविंद ॥६॥
अखिल ऐश्वर्याचा ठाव । गोविंदनामाचें गौरव । त्याचा जेथें प्रादुर्भाव । तें वैभव अनिर्वाच्य ॥७॥
सामान्य भूपति आपुलें नाम । धातुपाषाणीं आपणां साम्य । लिहूनि मानितां यथाकाम । राज्यसंभ्रम व्यवहारे ॥८॥
तेथें स्वमुखेंही सांगतां राजा । संशयापन्न राहे प्रजा । तन्नाममुद्रांकपत्रका ज्या । पादपूजा अर्पिति ॥९॥
जडासि नामभूषण ऐसें । देऊनि वर्तविजे विशेषें । माझ्या स्वामीनें मजही तैसें । नामनिर्देशें पैं केलें ॥१०॥
गोविंद माझा दयार्णव । तेणें जडीं हें नांव । घालूनि बोलवी अपूर्व । कविगौरव देउनी ॥११॥
मी जडमूढ अज्ञान । तेथें स्वनाम अधिष्ठून । श्रीमद्भागवतव्याख्यान । करवी पूर्ण स्वसत्ता ॥१२॥
नसतां व्युत्पत्तीचें बळ । नसतां शरीर अविकळ । अनुकूळ नसतां देशकाल । नसतां निश्चळ सुखवसति ॥१३॥
फिरत फिरतां रानीं वनीं । गोविंद भरला ध्यानीं मनीं । तेणें स्वतंत्र करूनि वाणी । बळेंचि स्वगुणीं गोंविली ॥१४॥
जैसें प्रवाहीं बांधोनि वळण । श्रीमंत स्वेच्छें नेती जीवन । तैसें गोविंदें माझें मन । केलें उन्मन निजसत्ता ॥१५॥
आतां येणें मुखें सेवा । करणें न करणें ठेला हेवा । जें जें आवडे तुम्हांसि देवा । तें तें बोलवा कौतुकें ॥१६॥
इतुकेंच ऐकूनि म्हणति गुरु । आतां पुरे हा विस्तारु । आरब्ध कथा सविस्तरु । तो विचारा अवधारीं ॥१७॥
शुकें कथियेलें एकसप्तकें । तें परिसिलें परीक्षिति एकें । तें एथ श्रोतयांच्या विवेकें । स्वेच्छा पिके तें करीं ॥१८॥
कळिकाळवणव्यामाझारीं । कृष्णकथापीयूषसरी । वर्षोनि रक्षी नानापरी । श्रीमुरारि निजगुणें ॥१९॥
तेंचि हरिगुणलीलामृत । त्याचें निर्मथूनि नवनीत । जें कां श्रीमद्भागवत । रसाळ त्यांत हरिजन्म ॥२०॥
त्या हरीची गर्भस्तुति । ब्रह्मादि देव येऊनि करिती । तिये कथेचि व्युत्पत्ति । आत्मस्थिति वाखाणी ॥२१॥
तेथ बद्धांजलि नम्र शिरें । चरण लक्षूनि अंतरें । इये आज्ञेची प्रसादोत्तरें । प्रेमादरें स्वीकेलीं ॥२२॥
तरी जी विश्वात्मकें देवें इथें अवधान द्यावें । माझें प्रेम वाढवावें । आज्ञापिलें अधिकारीं ॥२३॥
पाणी देऊनि पीक घेणें । वेतन देऊनि राबवणें । तैसें अवधानें पुष्ट करणें । प्रेम देऊनि ममांतर ॥२४॥
आतां ऐका जी कथामुकल । जयामाजीं कथा सकल । जैसा सांठवला परिमल । नीलोत्पलकलिकेंत ॥२५॥
कंसें पीडितां यादवकुल । करुणें कळवळूनि गोपाल । मारावया कंस खल । उतावीळ जाहला ॥२६॥
देवकीचे गर्भीं हरि । स्तविला ब्रह्मादि निर्जरीं । आश्वासिली देवकी नारी । हे कथा पुरी द्वितीयाध्यायीं ॥२७॥
कंसें निग्रहिला निजपिता । आणि यादवां समस्तां । तेणें आपुलिया पक्षपाता । महादैत्यां मिळविलें ॥२८॥
तें शुकमुखीचें निरूपण । मुळींचे श्लोक साडेतीन । बहु न वाढवीं कथन । कृष्णाभिगमन लक्षूनि ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 25, 2017
TOP