अध्याय २ रा - श्लोक ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सत्त्वं न चेद्धातरिदं निजं भवेद्विज्ञानभिदापमार्जनम् ।
गुणप्रकाशैरमुमीयते भवान् प्रकाशते यस्य च येन वा गुणः ॥३५॥

सप्रेमभजनें कर्मफलद । यालागीं धातृशब्दें निर्जरवृंद । संबोधिती श्रीगोविंद । परमानंद परमात्मा ॥४३॥
देव म्हणती कैवल्यदानी । तुझिया सगुनविग्रहावांचोनि । अपरोक्ष ज्ञान तें कोठूनि प्राणिगणीं प्रकाशे ॥४४॥
तुझें निजसत्त्व निर्मळ । जेथ अस्पृष्ट रजतममळ । तेणें सगुण श्रीगोपाळ । ज्ञानकल्लोळ सुखसिंधु ॥६४५॥
पुटीं घालूनि तोडिती हीन । त्या शुद्ध हेमापरी सज्जन । रजतमनाशें सत्त्वसंपन्न । होऊनि विज्ञान पावती ॥४६॥
विशुद्ध सत्त्व तुझें तैसें । नोहे पुटीच्या सोन्या ऐसें । जांबूनद स्वप्रकाशें । स्पर्शलें नसे रजतमा ॥४७॥
डोळ्यामाजीं असोनि दृष्टि । सूर्य न प्रकाशे जंव सृष्टीं । तंववरी अंधत्वें रहाटी । शास्त्रकोटी दीपेंशीं ॥४८॥
जंव सगुण नाहीं हरिगुणभजन । तंववरी न प्रकटे विज्ञान । यालागीं तुझें सगुण ध्यान । तें जीवन परमार्था ॥४९॥
गार चकमक तूळद्रव्य । निर्वातसंयुक्त कृतोपाय । अव्यक्त वह्नि व्यक्त होय । तेवीं सगुणसोय ज्ञानाची ॥६५०॥
विनय चकमक सद्भावगारे । नमन तूळद्रव्योपचारें । निष्ठा निर्वात श्रवणादरें । सद्गुरुवरें संयुक्तोपाय ॥५१॥
सर्वांतरी आहे ज्ञान । अनादिमायाप्रवाहेंकरून । परिणमलें विपरीत होऊन । बहिर्मुखपण यालागीं ॥५२॥
भूतें एका स्फुरणापोटीं । परंतु त्यांची भिन्न रहाटी । कठिणें पातळें दाहकें मोठीं । एकें पळपटीं पोकळें ॥५३॥
अग्नि असे तंववरी जाळी । परंतु भेटों न शके जळीं । वायु धांवे पैं धुमालीं । ज्ञानें आंधळीं परतंत्रें ॥५४॥
तैसेंचि स्रष्टा करी सृजन । सृष्टिपरचि त्याचें ज्ञान । रागतृषाकर्मप्रधान । जें उपादान संसृति ॥६५५॥
प्रजा तैशाच तदंकुरें । संसारसंभ्रमाच्या भरें । रागतृष्णादि विकारें । मानिती खरें भवभान ॥५६॥
शाश्वतचि मानिती जन्म । शाश्वतची वृत्तिग्राम । शाश्वतची हेमधाम । भवसंभ्रम वाढविती ॥५७॥
तंव तमोगुण महाबळी । कामक्रोधादिकां खवळी । भूतें भूतक्षोभें गिळी । करी समूळीं संहार ॥५८॥
मळिण सत्त्वगुण तेथें । दोन्ही वारूनि विवेकहातें । सृष्टिचाळणी प्रवर्ते । ज्ञानें विपरीतें सज्ञान ॥५९॥
ऐसे नियुक्त कर्मापुढें । ज्ञान नेण अती बापुडे । तुझें प्रकटे सगुण रूपडें । तैंचि उघडे विज्ञान ॥६६०॥
तें विज्ञान म्हणसी कैसें । जेणें अज्ञानेशीं भेद नासे । सहितनिद्रा स्वप्न जैसें । जागृतीं निरसे अशेष ॥६१॥
कोण अज्ञान कैसा भेद । ऐसें निरूपिजेल विशद । अज्ञान गाढमूढ अविद । दृश्यकोविद भेदज्ञ ॥६२॥
आधीं रज्जूचा विसर । त्यावरी भासे सर्पाकार । भेद तो पुच्छ शीर शरीर । दशनंदष्ट्राग्र भयजनक ॥६३॥
जेव्हां रज्जु उमजविला । तेव्हांचि विसर हारपला । अवयवभेद तो नाथिला । मिथ्या झाला सर्पेशीं ॥६४॥
व्हावया विज्ञानप्रकाश । करावा शास्त्राचा अभ्यास । एथ सगुणभक्तीचा । वायां विशेष पोसिला ॥६६५॥
तरी अंतःकरणचतुष्टय । तेणें इंद्रियसमुदाय । डोळस होऊनि संसारमय । रचिला होय भवभ्रम ॥६६॥
तिहीं कीजे शास्त्रपठण । तैं कल्पित होय ब्रह्मज्ञान । जयासि बोलिजे अनुमान । तें लक्षण अवधारा ॥६७॥
जेथ अग्नि तेथचि धूम । भूमार्दव तेथचि द्रुम । क्रियेवरूनि जाणिजे काम । स्नेहसंभ्रम जाणवी ॥६८॥
तैसें अचेतन देह पडे । तेव्हां व्यवहार कांहीं न घडे । मग नासोनि जाय रोकडें । केवळ मढें अचेतन ॥६९॥
पुनरपि करी उठणें । तरी सुषुप्ति होती ऐसें म्हणणें । तैसेंचि आत्मत्व अनुमानें । शास्त्रज्ञानें जाणावें ॥६७०॥
बुद्ध्यादिकातें प्रकाशी । तो चिदात्मा हृदयाकाशीं । सच्चित्सुखाचा मिरासी । ब्रह्म यासी म्हणावें ॥७१॥
वस्तु आहे सर्व घटीं । तेणें होय इंद्रियरहाटी । ऐशा अनेक अनुमानगोष्टी । शास्त्रपरिपाटी बोलती ॥७२॥
तुझिये सगुणभक्तीवीण । ऐसें आनुमानिक शास्त्रज्ञान । तेणें न तुटे बंधन । ऐसें सुरगण बोलती ॥७३॥
बुभुक्षु कल्पित अन्नरसें । जेवितां क्षुधा जरे निरसे । तरीच कल्पित ज्ञानें नासे । संसारपिसें आविद्यक ॥७४॥
यालागीं तुझें सगुण ध्यान । सप्रेमभक्तीसी कारण । भक्तिप्रेमें अंतःकरण । होय प्रसन्न शुद्धत्वें ॥६७५॥
अंतःकरणाची प्रसन्नता । अपरोक्षज्ञानाची ते माता । अपरोक्षज्ञानें कृतार्थता । हरिगुरुभक्तां अनाथासें ॥७६॥
मनें कल्पिला संसार । दुस्तर दुःखाचा सागर । तें भजनीं होतां मन तत्पर । मग संसार कोणासी ॥७७॥
भजनें मनाचे हरले मळ । ध्यातां हरिरूप निर्मळ । समरसोनि अमळीं मळ । होय केवळ चिन्मात्र ॥७८॥
शुद्धसत्त्वात्मक तुझें सगुण । भावें भक्तांसि भज्यमान । तैसेंचि होय अंतःकरण । निष्काम भजने सप्रेमें ॥७९॥
ऐसे निष्कामभजनभाग्यें । श्रीचरणाचेनि अनुरागें । बाह्यविषयांचेनि विरागें । हाती निजांगें चिन्मय ॥६८०॥
ऐसे तुझेनि गुरुप्रसादें । भक्त पावती मोक्षपदें । तेंहि उमाणितां भजनानंदें । होफळ शब्दें हेळिती ॥८१॥
लटक्या बंधनाच्या नाशें । साच मोक्ष कैसा दिसे । बंध मोक्ष जैसें तैसे । भजनसौरस उमजे हें ॥८२॥
एवं निजसत्त्वप्रधान । तुझे अवतार अनेक सगुण । भक्तनुग्रहार्थ धरिसी जाण । द्विविध लक्षण तयांचें ॥८३॥
सप्रेम अनन्य आराधिती । क्रूर द्वेषे विरोधिती । उभय अनुग्रहाची स्थिति । तेहि रीति अवधारा ॥८४॥
अभ्युदय सप्रेमभजनीं । सम्यग्ज्ञान कैवल्यदानी । सगुण भक्ताम अनुग्रहूनि । स्वानंदसदनीं नांदवी ॥६८५॥
श्रीचरणाचें आराधन । करावया भक्तांचें प्रेम गहन । कायावाचा मन धन । अनन्यशरण सद्भावें ॥८६॥
संसारसुखाची विरक्ति । स्वर्गापवर्ग तुच्छ करिती । ऐशी ज्यांची निःसीम भक्ति । करी श्रीपति अभ्युदय त्यां ॥८७॥
विरोधी भक्तांचें लक्षण । दृढ करोनि देहाभिमान । द्वेषें करिती भगवद्ध्यान । विषयचरण यथेष्ट ॥८८॥
त्यांसि विरोधें क्षोभोनि हरि । सर्वस्व हरूनि समरीं मारी । अपकीर्तीचें पात्र करी । मोक्षाधिकारी वैरेंशीं ॥८९॥
ऐशिया उभय भक्तांसाठीं । सगुणावतार धरिसी सृष्टीं । ते भजनीं येची परंतु कष्टी । न करवे गोष्टी जाणिवेची ॥६९०॥
नलगे गणना करितां अंत । न पुरे तर्काचाहि हात । ज्ञानेंद्रियें मनासहित । जासी म्हणत अगोचर ॥९१॥


References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP